Homeमाय व्हॉईसठाणे न्यायालयात तब्बल...

ठाणे न्यायालयात तब्बल सव्वा लाख खटले पडून!

काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात फेरफटका मारला असता चार चाकी गाड्यांची एकच झुंबड आणि जनता आडवी झालेली पाहिली होती. तेव्हा एक ज्येष्ठ वकील मित्र म्हणाले विजयराव, एकदा जरा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या जिल्हा न्यायल्याला ही भेट द्या की? जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय गलथानपणा जागोजागी दिसेल. परंतु जिल्हा न्यायालयात न्यायाचा मुडदाच पाहायला मिळेल. न्यायाचे कलेवर व्हेंटिलेटरवर नाही दिसले तर नाव बदलून घेईन! मी म्हटले पाहू, मला आधी ठाण्यात स्थिर तरी होऊ दे, नक्की भेट देईन. त्यानंतर बरेच दिवस गेले. ठाणे रेल्वेस्थानकाकडे जाताना रोज न्यायालयाचे दर्शन होत असे. पण कालच्या बुधवारी न्यायालयाच्या भेटीचा योग जुळून आला. कोर्ट नाका बसथांब्याला उतरून रस्ता ओलांडल्यानंतर गल्लीवजा रस्त्यावरून चालत असताना हा काही न्यायालयात जाण्याचा प्रशस्त मार्ग नव्हे असे मनाशी बोलत असतानाच माणसांची गर्दी, बाईक्सची बेसुमार संख्या, तशातच एका शाकाहारी हॉटेलसमोरील माणसांचा जत्था आणि बाजूलाच असलेल्या बँकेतून आतबाहेर जाणारे ‘काळे कोट’.

बाईक्सची रांग काही पाठ सोडत नव्हती. तेथेही मिळेल तेथे आणि जमेल तशा बाईक्स पार्क केलेल्या दिसत होत्या. तेथे मोजक्याच गाड्या ही दिसल्या (बहुतेक बड्या वकिलांच्या किंवा बड्या आरोपींच्या). कसाबसा न्यायालयाच्या दरवाजाजवळ गेलो. सरळ रेषेत उभा राहिलो. नाहीतर बसथांब्यापासून शरीर वाकडे करूनच चालत होतो. कोणीही काही विचारले नाही. एक महिला हवालदार मोबाईलवरील इंटरेस्टिंग क्लिप पाहण्यात दंग होती. मी आपला संथ गतीने फुलझाडे व कितपत हिरवळ बचावली आहे हे पाहत होतो. इतक्यात समोरच मुख्य न्यायमूर्तींची गाडी सावली खात उभी असलेली दिसली. इतक्या उन्हात कोणतरी सावली खातंय हीच समाधानाची बाब होती. तेथे असलेल्या कुंड्या हतबल झालेल्या दिसल्या. त्यातील रोपेतर पार सुकून गेलेली दिसली. एक सफेद गणवेशधारी व्यक्ती त्या कुंड्या घेऊन जाताना दिसत होता. बाजूला जो हरित पट्टा असायला हवा होता तो तर साफ सुकून गेलेला दिसला. बहुतेक कोरोनाच्या सहा महिन्यांत कोणी पाणीच दिले नसावे! इमारतीत शिरण्याचे दोन मार्ग दिसले. एक मुख्य दरवाजा व दुसरा पुन्हा एक चिंचोळी जागा. त्याचेही दोन भाग केलेले. म्हणजे येथेही शरीर वाकडे करूनच प्रवेश!

तळमजल्यावर काही कोर्ट रूम व लिपिक बसतात. त्याच्या मागील बाजूस एक खंडहरवजा लॉकअप रूम दिसला. बहुतेक त्याचा वापर होत नसावा असे त्याच्या हालावरून वाटले. कोर्ट रूमच्या बाहेर जरा बऱ्यापैकी वर्दळ होती. लिपिक कक्षात मात्र सर्व आनंदीआनंदच दिसला. तरी बापडे खाली मान घालून चुपचाप काम करत होते. मला एकदम स्थितप्रज्ञच आठवला! कारणही तसेच आहे अहो या कक्षाच्या मधोमध कचऱ्याचा भला मोठा ढीग होता. धुळीचे साम्राज्य तर इतके आहे की, न्यायालयाच्या इमारतीत सर्वत्र जागा मिळेल तेथे

‘रुमाल’ कोंबून ठेवलेले दिसतात. बाबा आदमच्या काळापासून ते असावेत, इतकी धूळ त्यांच्यावर साठली आहे. सरकारी कार्यालयात कागद कसे धूळ खात असतात हे नव्याने उमगले. या इमारत पाहण्याचा नादात माझे मूळ काम तसेच राहू नये म्हणून एका व्यक्तीस या कोर्टाचे रजिस्ट्रार कुठे बसतात असे विचारले. त्याला सांगता आले नाही. मग काही जणांना विचारत विचारत एका अधिकाऱ्याकडे गेलो. त्याला विचारले की ठाणे न्यायालयात किती खटले प्रलंबित आहेत याची माहिती मला हवी आहे. त्या अधिकाऱ्याला मी काय वाटलो हे सांगता येत नाही. मग त्यांनी माझे कार्ड दोनदा-तीनदा बघितले व ठामपणे म्हणाले- आम्ही अशी माहिती देऊ शकत नाही.

मनाशी म्हटले आपली खेप फुकट जाणार! मग तो अधिकारी म्हणाला ही माहिती तुम्हाला वकील देऊ शकेल. मी म्हणालो- तो त्याच्याकडील खटल्याची माहिती देईल. अस करत बसलो तर मला 500 वकिलांशी बोलावे लागेल. त्यावर तो थोडा हसला. मी माझा प्रयत्न सोडणार नव्हतो. मी सांगितले- मला फक्त आकडा हवा आहे. बाकी मला काहीही नको. तरीही हा अधिकारी बधेना. त्यांनी एक-दोन अधिकाऱ्यांना फोन केले. पण मनासारखे काही होत नव्हते. मी त्या अधिकाऱ्याचा नाद सोडला. मी माझा फेरफटका सुरू केला. मी ग्रंथालयाजवळ आलो. मी आत शिरू लागलो आणि मला सुरक्षा दिसली. आपण वकील आहात का? वकील असाल तर आत जाऊ शकाल. माझी ओळख त्याला द्यायची नव्हती. कारण मग माझे काम झालेच नसते. पण दुसरा विचार मनात आला की एखादा वकील बरोबर असता तर मी त्या ग्रंथालयात जाऊ शकलो असतो, अगदी वकील नसतानाही! तितक्यात माझ्या पाठीमागून एक कर्मचारी आला. मगाशी आपण अमुकतमुक अधिकाऱ्यांकडे होतात. तुम्हाला खटल्यांचा आकडा हवा आहे ना? मी मान डोलावली. त्याने झटकन कागदाच्या पानाचा एक तुकडा हातात ठेवला आणि तो क्षणात जणू अंतर्धानच पावला!

मी तो कागद पाहिला आणि चक्रावूनच गेलो गुन्हेगारी स्वरूपाचे 75 हजार तर दिवाणी स्वरूपाचे 48 हजार खटले ठाणे न्यायालयात पडून आहेत. म्हणजे जवळजवळ सव्वालाख खटले प्रलंबित आहेत. याला जशी प्रशासकीय कारणे आहेत तसेच ठाणे जिल्ह्यात असलेल्या पाच महापालिकाही कारणीभूत आहेत. या सर्व महापालिका व ग्रामीण भागातील छोटेमोठे खटले ठाणे न्यायालयातच येतात. लोकसंख्याही प्रचंड आहे. “Justice : a commodity  which in a more or less adultrated the state sells to the citizens as a reward for his allegiance, taxes and personal service” हे विधान पटू लागतं. ठाणे न्यायालयातच नाही तर देशभरातील न्यायव्यवस्था या प्रलंबित खटल्याच्या प्रचंड संख्येने त्रस्त आहे. आंध्र प्रदेशच्या मुख्य न्यायमूर्तींनी एकदा या प्रचंड संख्येचा उल्लेख करून हे प्रलंबित खटले संपायला 200हून अधिक वर्षे लागतील असे उदगार काढले होते. ठाणे न्यायालयात न्यायमूर्तींची संख्या वाढली पाहिजे तसेच कर्मचारी, कामगार यांची संख्याही तातडीने वाढवली पाहिजे. गुन्हेगारी स्वरूपाचे खटले कधीच पुढे सरकत नसल्याने शिक्षाही होत नाही. त्यामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढते व तपास चांगला करूनही दोषींना शिक्षा होत नसल्याने पोलीसही हताश होतात. पालकमंत्री एकनाथ शिंदे तसेच कायदा मंत्री अनिल परब यांनी यावर लवकरच तोडगा काढावा असे आवाहन करून निरोप घेतो. “there is no such thing as justice, in or out of court” ही भावना वाढीस लागू नये इतकेच!

1 COMMENT

  1. ✨ नमस्कार काळेसर, खरेच परिस्थिती फारच गंभीर व चिंतनीय आहे..! असो…
    पण तुमची बातमी लिहायची शैली एकदम झक्कास. आवडली.

Comments are closed.

Continue reading

न्यायालयाने काढली म्हाडाची सालटी!

महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण मंडळ (म्हाडा) आणि मुंबई घरदुरुस्ती मंडळ या दोघांच्याही कारभार व कार्यशैलीबाबत न बोललेच बरे, असे मुंबईकरांना वाटले तर त्यात काहीच नवल नाही. गृहनिर्माण मंडळ व घरदुरुस्ती मंडळाच्या बांद्रा येथील कार्यालयात एकदा नुसती भेट दिली तरी तेथील...

ठाणे शाहरातल्या व्यापाऱ्यांचा देवपिता आहे तरी कोण?

ठाणे शहरातील सर्व सरकारी व नीमसरकारी यंत्रणानी राममारुती रोडवरील व्यापारी संघ तसेच ठाण्याच्या समस्त व्यापाऱ्यांना राममारुती रोडवरील पदपथ 'आंदण' दिलेले आहेत काय? हे जाहीरच करून टाकले तर बरे होईल. कारण, उठसुठ काही नियम आले की बंडाचा झेंडा हातात घेणारे...

तुमचे श्रीराम तर माझी सीतामैय्या! नितीशबाबूही लागले भजनी!!

सुमारे दोन वर्षांपूर्वी भारतीय जनता पार्टीने उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे भव्यदिव्य राममंदिर बांधून देशातील मतदारांचे डोळे दिपवले होते, हे सर्वजण जाणतात! आता काही दिवसांतच बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहेत. नेमका हाच मुहूर्त साधून बिहारचे मुख्यमंत्री नितीशबाबूंनी 'जानकी जन्मस्थल...
Skip to content