मुंबईतल्या अंधेरी भुयारी मार्गाजवळून वाहणाऱ्या मोगरा नाल्यातून वाहून आलेला १६५ लीटरचा फ्रीज तसेच कपाट, पलंग, ताडपत्री, रबरी पाईप आणि यासारख्या इतर साहित्यांनी काल, (दिनांक २४ जून २०२३) सायंकाळी अंधेरी भुयारी मार्गाची पावसाळी पाणी उदंचन करणारी यंत्रणा विस्कळीत करून टाकली. असे असले तरी, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे तसेच के पूर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी अवघ्या तासाभरात सर्व यंत्रणा पूर्ववत करून साचलेल्या पाण्याचा वेगाने निचरा केला.
अंधेरी भुयारी मार्ग हा मुंबईतील अतिसखल परिसरांपैकी एक आहे. या मार्गाचा भौगोलिक आकार बशीसारखा आहे. या भुयारी मार्गाला लागूनच मोगरा नाला वाहत जातो. मोगरा नाल्याच्या उगम स्थळापासून अंधेरी भुयारी मार्गापर्यंत सुमारे अडीच किलोमीटर लांबीपर्यंत हा नाला वाहत येतो. विशेष म्हणजे नाल्याचा हा प्रवाह उगमस्थळापासून अंधेरी भुयारी मार्गाकडे येताना तब्बल १३ मीटरचा उतार आहे. म्हणजेच नाल्याचा प्रवाह अत्यंत जोरात येतो. त्यातही जोरदार पाऊस कोसळत असल्यास या भागातील पावसाच्या पाण्याचा निचरा करणे अत्यंत मोठे आव्हान ठरते. त्यातच काल फ्रीज, कपाट आदी वस्तू तेथे अडकून पडल्या.

या आव्हानावर मात करण्याकरिता, अंधेरी भुयारी मार्ग परिसरासाठी एकूण तीन ठिकाणी मिळून पाणी उपसा करणारे सहा पंप आणि पूर प्रतिबंधक दरवाजे (फ्लड गेट) यंत्रणा उभारण्यात आली आहे. अंधेरी परिसरातील मिलेनियम इमारत, विरा देसाई मार्ग, अंधेरी भुयारी मार्ग या तीन ठिकाणी ही यंत्रणा उभारली आहे. ताशी ३ हजार मीटर क्युबिकचे सहा पंप तीन ठिकाणी लावण्याचे काम पर्जन्य जलवाहिन्या विभागाने पूर्ण केले. अतिरिक्त उपाययोजना म्हणून १ हजार मीटर क्युबिकचे २ पंप लावले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ही यंत्रणा भर पावसात सुरळीत सुरू राहवी, त्यात कचरा अडकून पंप बंद पडू नयेत, यासाठी नाल्यात पूर्व बाजूला पोलादी जाळीदेखील लावली आहे. जेणेकरून तरंगता कचरा रोखून प्रवाह पुढे जाऊ शकेल.
पावसाळापूर्वक कामांचा भाग म्हणून नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे पूर्ण करण्यात आली. त्यानंतरदेखील नाल्यांमध्ये नागरिकांकडून टाकला जाणारा कचरा तरंगताना आढळत असल्याने तोदेखील पालिकेच्या यंत्रणेने वारंवार काढून नाल्यांचा प्रवाह वाहता राहील याची पुरेपूर दक्षता घेतली आहे. असे असताना, काल (दिनांक २४ जून २०२३) सायंकाळी जोरदार पाऊस होत असताना मोगरा नाल्यातील प्रवाह सोबत अतिशय मोठ्या प्रमाणावर तरंगता कचरा अंधेरी भुयारी मार्गाच्या दिशेने आला. त्यामध्ये १६५ लीटर क्षमतेचा फ्रीज, कपाट, पलंग, इतर अवजड साहित्य तसेच ताडपत्री, रबरी पाईप, नायलॉन चटई इत्यादी अनेक वस्तू होत्या.

हे सर्व अवजड साहित्य अंधेरी भुयारी मार्गालगत नाल्यामध्ये कचरा रोखण्यासाठी लावलेल्या जाळीत अडकले. त्यापाठोपाठ येणारा इतर सर्व कचरादेखील जाळीत अडकला. परिणामी नाल्याचा प्रवाह पुढे न जाता ओसंडून रस्त्यावर आला आणि भुयारी मार्ग तुंबला. सदर अवजड साहित्य, तरंगता कचरा आणि त्यावरून पाण्याचा प्रचंड दबाव यामुळे सदर पोलादी जाळी तुटली. दरम्यान, हे सर्व घडत असताना, दुसऱ्या बाजूला पाणी उपसल्यानंतर त्याचा प्रवाह आपल्या भागात सोडण्यात येत असल्याची हरकत घेऊन काही स्थानिक नागरिकांनी उदंचन व्यवस्थादेखील बंद पाडली. या सगळ्यांचा परिपाक म्हणून सदर परिसरात पाणी साचले.
या बिकट परिस्थितीतदेखील गोंधळून न जाता पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे तसेच के पूर्व विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी जलद हालचाली करून संयमाने परिस्थिती हाताळली. नाल्यातील जाळी ताबडतोब काढून, तसेच शक्य तेवढा तरंगता कचरा काढून पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यात आला. तसेच संबंधित स्थानिक नागरिकांचा गैरसमज दूर करून उदंचन यंत्रणा सुरू करण्यात आली. त्यामुळे अवघ्या तासभराच्या आत अंधेरी भुयारी मार्गातील पाण्याचा निचरा करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

अतिरिक्त पालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी आज सदर ठिकाणी पाहणी करून परिस्थितीचा, झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. स्थानिक नागरिकांनादेखील सर्व परिस्थिती त्यांना समजावून सांगितली आणि गैरसमज दूर केले. त्याचप्रमाणे, पोलादी जाळीची पुनर्रचना करून ती लवकरात लवकर लावावी, भविष्यात अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिले.

