राज्य विधिमंडळाच्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या देवळालीच्या आमदार सरोज अहिरे आपल्या अडीच महिन्यांच्या बाळासमवेत विधान भवनात हजर झाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना तानुल्ह्यासह (प्रशंसक) बघताच लगेचच त्यांची भेट घेतली आणि दोघा मायलेकांची आस्थेने विचारपूसही केली.
विधानसभा सदस्य अहिरे आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी आल्या त्या आपल्या अडीच महिन्यांच्या प्रशंसक, या बाळासमवेत. याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांना माहिती मिळताच त्यांनी आमदार अहिरे यांची भेट घेऊन त्यांची आणि बाळाची विचारपूस केली.
विधिमंडळात लोकप्रतिनिधी म्हणून कायदे बनवणे आणि विधिमंडळाच्या बाहेर मातृत्वाची जबाबदारी पार पाडणे हे निश्चितच आव्हानात्मक आहे. या दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडणे म्हणजे स्त्रीमधील कर्तृत्त्वाचा आणि मातृत्वाचा अनोखा सन्मान असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्याच्या विधिमंडळात पहिल्यांदाच अशी घटना घडत असल्याने त्याबद्दल त्यांचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर कौतुक केले. यावेळी आमदार सरोज अहिरे यांचे पती डॉ. प्रवीण वाघ आणि सासुबाई कल्पना वाघ हेदेखील उपस्थित होते.

