नवी मुंबईच्या तळोजा जेलमधून सुटल्यानंतर शोभयात्रेने पुणे शहरात प्रवेश करणाऱ्या गजानन ऊर्फ गजा मारणेला माध्यमे आणि समाज माध्यमात झालेल्या तीव्र टिकेनंतर अटक झाली खरी, परंतु जामीन मिळाल्यानंतर गजाने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन सुबाल्या केल्याचे जाहीर झाले आहे. नवी मुंबई ते पुणे दरम्यानच्या सुमारे 40 पोलीसठाण्यात त्या शोभयात्रेविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आल्याचे समजते. गजा आणि त्याच्या चार साथीदारांना जामीन मिळाल्यानंतर पुन्हा अटकेची तयारी सुरू असतानाच गजा व त्याचे साथीदार फरार झाल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी लगेचच गजाच्या विविध अड्ड्यांवर फिल्डिंग लावली असली तरी पोलिसांच्या हाती काहीच लागणार नाही, असे माहितगार सांगतात. फरार झाल्यावर गजा आता पोलिसांना माहीत असलेल्या ठिकाणी जाणार नाही हे उघड आहे.
दरम्यान, पुणे पोलिसांच्या शामळू धोरणामुळेच अट्टल गुंड पोलिसांच्या समोरून फरार झाला असे ज्येष्ठ अधिकाऱ्यांशी बोलताना समजले. आजकाल गुंड असोत वा त्रासदायक समाजसेवक असोत, त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता मानवाधिकारवाल्यांना सहानुभूतीचा पान्हा फुटतो व पोलिसी अत्याचाराच्या खोट्यानाट्या कथा पसरविल्या जातात. त्यामुळे न्यायालयात पोलीस प्रशासनाची बरीच दमछाक होत असल्याने पुणे पोलिसांनी हल्ली सबुरीचे धोरण अवलंबिले असल्याचे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर मला सांगितले. आता जरी कितीही अट्टल गुन्हेगार असला तरी त्याची चौकशी तीन फूट लांबून करायची असा भन्नाट नियम पुणे पोलिसांनी लागू केल्याची पुस्तीही या अधिकाऱ्याने जोडली. मानवाधिकार वगैरे सर्व ठीक आहे, पण पोलिसी खाक्या दाखवल्याशिवाय गुन्हेगार गुन्हा कबूल करतो का? हा साधा सवाल न्यायमूर्ती महोदयांच्या लक्षात कसा येत नाही? असे सर्वत्र झाले तर गुन्हेगाराला गुन्हा मंजूर नाही असे दोन-तीन ओळींचेच आरोपपत्र न्यायालयात सादर करावे लागेल, कारण कोठलाच गुन्हेगार आपण गुन्हा केला हे कबूलच करत नाही. पोलिसांचा हा तीन फूट लांब नियम तसेच गजावर एका बिल्डर कम राजकीय नेत्याचा कृपाशिर्वाद असल्याने फावले, असे गुन्हेगारी वर्तुळात बोलले जात आहे.
आताच हाती आलेल्या माहितीनुसार गजा वा त्याच्या साथीदारांपैकी एक-दोघांचा ‘गेम’ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे ढगात पाठवणे ग्रामीण भागातच होईल असा विश्वास काहींनी व्यक्त केला. राजकीय सुत्रांनुसार गजाला भरपूर पळू देतील. त्याची पुरती दमछाक झाली की त्याला कायमचा झोपवतील! मात्र हुकमी राजकीय कळ दाबली तर गेम बदलू शकतो, असेही जाणकाराने सूचित केले.