Homeकल्चर +‘एप्रिल मे 99’ने...

‘एप्रिल मे 99’ने होणार मराठी चित्रपट महोत्सवाला सुरूवात

मुंबईच्या प्रभादेवीतल्या महाराष्ट्र कला अकादमीमधील पु. ल. देशपांडे सभागृहात येत्या २१ ते २४ एप्रिलदरम्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘मराठी चित्रपट महोत्सव – २०२५’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात ४१ चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. या महोत्सवाचे उद्घाटन २१ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता होणार आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर रात्री ८ वाजता रोहन मापुस्कर दिग्दर्शित ‘एप्रिल मे 99’ हा चित्रपट ओपनिंग फिल्म म्हणून दाखविण्यात येणार आहे. २४ एप्रिलला दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा चित्रपट क्लोजिंग फिल्म म्हणून दाखविण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.

सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या रविंद्र नाट्य मंदिर, मिनी थिएटर आणि प्रायोगिक रंगमंच येथे हे सर्व चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. यामध्ये २२ एप्रिलला अनुक्रमे सकाळी १० वाजता ‘पळशीची’, ‘बटरफ्लाय’ आणि ‘येरे येरे पावसा’ हे चित्रपट दाखविण्यात येणार असून दुपारी 1 वाजता ‘बाईपण भारी देवा’, ‘विषय हार्ड’ आणि ‘तिचं शहर होणं’, दुपारी 3 वाजता मराठी भाषेवर आधारित ‘इंटरनॅशनल फालमफोक’, ‘ग्लोबल आडगाव’ आणि ‘या गोष्टीला नावच नाही’, हे चित्रपट दाखविले जातील. सायंकाळी 6 वाजता ‘गोदाकाठ’, ‘पाणी’, आणि ‘झॉलिवूड’ तर रात्री 8 वाजता ‘भेरा’, विनोदी चित्रपट ‘चोरीचा मामला’ आणि ‘पॉडीचेरी’ हे चित्रपट दाखविण्यात येणार असल्याचे शेलार यांनी सांगितले.

२३ एप्रिलला सकाळी 10 वाजता ‘बार्डे’, ‘ छबीला’ आणि शेतकरी आत्महत्त्येवरील ‘तेरव’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. दुपारी 1 वाजता ‘पोटरा’, ‘गिरकी’ आणि स्वातंत्र्यसंग्रामावरील ‘शहिद भाई कोतवाल’ हे चित्रपट दाखविले जाणार आहे. दुपारी 3 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समतेवर आधारित ‘जयंती’, ‘गाभ’ आणि ‘फनरल’ तर सायंकाळी 6 वाजता ‘स्थळ’, ‘अमलताश’ आणि ‘कुलूप’ हे चित्रपट दाखविले जाणार आहेत. त्याचबरोबर रात्री ८ वाजता ‘मी वसंतराव’ हा बायोपिक, ‘बापल्योक’ आणि ‘गोदावरी’ हे चित्रपट दाखविले जातील. २४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता ‘स्वीट ॲण्ड शॉर्ट’, ‘रौंदळ’ आणि महेश मांजरेकर यांचा ‘जुनं फर्निचर’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. दुपारी 1 वाजता ‘मदार’, ऐतिहासिक असा ‘पावनखिंड’ आणि ‘कारखानिसांची वारी’ हे चित्रपट दाखविले जाणार आहेत. दुपारी ३ वाजता राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘वाळवी’, ‘जग्गू आणि ज्युलिएट’, आणि राज्य पुरस्कारप्राप्त ‘वाय’ हे चित्रपट दाखविले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वरील सर्व चित्रपट सामाजिक, ग्रामीण, ऐतिहासिक, पर्यावरणविषयक, स्त्री जीवनाविषयक प्रश्न मांडणारे, बालचित्रपट, विनोदी, एक्शन, व्यावसायिक यशस्वी झालेले चित्रपट असून रसिकांना ते विनामूल्य पाहता येतील. याकरिता ऑनलाईन नावनोंदणी सुरू करण्यात आली असून कार्यक्रमस्थळी ऑफलाईन नावनोंदणीदेखील सुरू आहे.

परिसंवाद, मुलाखत आणि बरंच काही…

दिनांक २२ रोजी १२ ते २ वाजेपर्यंत ख्यातनाम संगीतकार कौशल इनामदार यांची “काल-आज-उद्याचे मराठी चित्रपट गीत-संगीत“ शब्द, सूर आणि तंत्र या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी ३ वाजता दिग्दर्शक हंसल मेहता यांची मुलाखत अभिनेते आणि कवी किशोर कदम घेतील. सायंकाळी ६ वाजता ‘चित्रपटाचे तंत्र आणि सध्याच्या संधीं या विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला असून यामध्ये उज्वल निरगुडकर, पंकज सोनावणे, सुप्रिया पाटणकर सहभागी होणार असून सौमित्र पोटे संवादक असतील.

२३ एप्रिलला दु. १२ वाजता सिने पत्रकारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार, गणेश मतकरी, हरी मृदुल मार्गदर्शन करतील. सूत्रसंचालन डॉ. संतोष पाठारे करतील. दुपारी ३ वाजता भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी चित्रपटांचे स्थान, या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून यामध्ये ज्येष्ठ समीक्षक अशोक राणे, नितीन वैद्य, गजेंद्र अहिरे, मृणाल कुलकर्णी सहभागी होणार आहेत. मनीषा कोरडे संवादक असतील. संध्याकाळी ६ वाजता मराठी चित्रपटांचे प्रसारण, प्रसिद्धी, वितरण या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून यामध्ये रोहन म्हापूस्कर, दिग्पाल लांजेकर, श्रीकांत भिडे, नानूभाई जयसिंगांनी, सादिक चितळीकर, गणेश गारगोटे, अमृता माने सहभाग घेतील. संवादक अमित भंडारी असतील.

२४ एप्रिल रोजी दु. १ वाजता मराठी चित्रपटांचे व्यावसायिक गणित, या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून यामध्ये ज्येष्ठ दिग्दर्शक महेश मांजरेकर, रवि जाधव, श्रीरंग गोडबोले, अभिजित पानसे सहभागी होणार असून विजू माने संवादक असतील. दुपारी ३ वाजता “कालचा, आजचा आणि उद्याचा मराठी चित्रपट आणि OTT व्यवसायाचे गणित“ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादामध्ये आदिनाथ कोठारे, जयंत सोमळकर, सुऱ्ह्द गोडबोले, वरुण नार्वेकर, अर्चना बोराडे, रोहन कानवडे, महेंद्र तेरेदेसाई सहभागी होणार आहेत. सायंकाळी ६ वाजता समारोपसोहळा आयोजित करण्यात आला आहे, असेही आशिष शेलार यांनी नमूद केले.

Continue reading

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...

आयुष्मान खुरानाला ‘द अकादमी’चे आमंत्रण!

बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना, ज्यांनी भारतामध्ये आपल्या विघटनात्मक आणि प्रगतीशील सिनेमाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यांना यंदा ऑस्कर पुरस्कार प्रदान करणाऱ्या ‘द अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’कडून सदस्यत्वासाठी आमंत्रित करण्यात आले आहे! या प्रतिष्ठित...

आता ‘एटीएम’मध्ये जाऊन झटपट मिळवा ‘हेल्थ रिपोर्ट’!

"हेल्थ रिपोर्ट्स" मिळविण्यासाठी वाट पाहायचा जमाना आता जुना झालाय. "एटीएम"मध्ये जाऊन आपण पैसे काढतो, तितक्याच सहजतेने आणि झटपट आता "हेल्थ रिपोर्ट" मिळू लागले आहेत. राज्य सरकारच्या योजनेमुळे हे शक्य झाले आहे. सध्या नंदुरबार आणि चंद्रपूर जिल्ह्यात "हेल्थ एटीएम" मशीन...
Skip to content