वित्त मंत्रालयाने वर्ष 2023साठीच्या महिला सन्मान बचत प्रमाणपत्रासंबंधी राजपत्रित अधिसूचना जारी करून ती 1.59 लाख टपाल कार्यालयात त्वरित प्रभावाने उपलब्ध करून दिली आहेत. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी वर्ष 2023-24च्या अर्थसंकल्पात ‘आझादी का अमृत महोत्सव’च्या स्मरणार्थ या योजनेची घोषणा केली होती. मुलींसह महिलांच्या आर्थिक समावेशन आणि सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
दोन वर्षांच्या कालावधीची ही योजना गुंतवणुकीच्या विविध पर्यायांसह आणि दोन लाख रुपयांच्या कमाल मर्यादेसह तसेच आंशिक पैसे काढण्याच्या पर्यायांसह तिमाही चक्रवाढ पद्धतीने 7.5 टक्के दराने आकर्षक आणि निश्चित व्याज देते. ही योजना ३१ मार्च २०२५ पर्यंत दोन वर्षांच्या कालावधीसाठी वैध आहे.
राष्ट्रीय बचत (मासिक उत्पन्न खाते) योजना, 2019मध्ये राष्ट्रीय बचत (मासिक उत्पन्न खाते) (सुधारणा) योजना, 2023द्वारे सुधारणा करण्यात आली आहे आणि एका खात्यासाठी कमाल गुंतवणूक मर्यादा चार लाख पन्नास हजार रुपयांवरून नऊ लाख रुपये एव्हढी करण्यात आली आहे आणि 1 एप्रिल 2023पासून संयुक्त खात्यासाठी नऊ लाख रुपयांवरून 15 लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे त्याचप्रमाणे, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, 2019मध्ये ज्येष्ठ नागरिक बचत (सुधारणा) योजना, 2023द्वारे सुधारणा करण्यात आली आहे आणि गुंतवणूकीची कमाल मर्यादा 15 लाख रुपयांवरून 30 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
बचत ठेव आणि पीपीएफ अर्थात कर्मचारी भविष्य निधी (PPF) वगळता सर्व लहान बचत योजनांवरील व्याजदरांमध्ये 1 एप्रिल 2023पासून सुधारणा करण्यात आली आहे. या उपायांमुळे टपाल खात्यामधल्या लहान बचत करणाऱ्या ग्राहकांना खूप फायदा होईल आणि टपाल कार्यालयाद्वारे या योजनांमध्ये अधिक गुंतवणूक आकर्षित करता येईल. विशेषतः ग्रामीण भागात आणि मुली, महिला, शेतकरी, कारागीर, ज्येष्ठ नागरिक, कारखानदार, सरकारी कर्मचारी, छोटे व्यापारी आणि समाजातील इतर घटक यांना लहान बचत योजनांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल. अधिक माहितीसाठी www.indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.