देशाच्या दहा राज्यांमधील 37 राज्यसभा जागांसाठी सोमवारी मतदान झाले. यापैकी 26 उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. खरी चुरस बिहारच्या 5 जागा, ओडिशातील 4 जागा आणि हरियाणा (2 जागा) या तीन राज्यांपुरतीच उरली. या 2026 राज्यसभा निवडणुकीत ‘एनडीए’चा देशभर दबदबा दिसून आला. नितीश कुमार आता राज्यसभेत खासदार म्हणून दिसतील. दुसरीकडे, बिहारमध्ये महागठबंधनचे आमदारच बेपत्ता झाले, तर ओडिशात घोडेबाजाराचे आरोप होत आहेत.
सध्या राज्यसभेत ‘एनडीए’कडे 134 जागा आहेत, तर विरोधी इंडिया आघाडीकडे 80 जागा आहेत. या निवडणुकीनंतर ‘एनडीए’ची संख्या आणखी वाढणार असल्याने संसदेच्या वरिष्ठ सभागृहात सरकारचे बहुमत आणखी बळकट होणार आहे. एकूण ‘एनडीए’ला 4 ते 6 अतिरिक्त जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सभागृहात कृषी सुधारणा आणि सुरक्षाविषयक विधेयके सहज मंजूर करण्यास मदत होईल.
बिनविरोध विजेते- दिग्गजांची फळी
यापूर्वीच बिनविरोध निवडून आलेल्यांमध्ये भाजपाला सात, काँग्रेसला पाच, तृणमूल काँग्रेसला चार आणि डीएमकेला तीन जागा मिळाल्या आहेत. शरद पवार, अभिषेक मनू सिंघवी, तिरुची शिवा आणि विनोद तावडे हे काही प्रमुख बिनविरोध निवडले गेलेले नेते आहेत.
महाराष्ट्र- ‘एमव्हीए’ला एकच जागा
महाराष्ट्रातील सात जागांपैकी ‘एनडीए’ ने सहा जागा पटकावल्या. ‘एमव्हीए’कडून शरद पवार एकमेव विजेते ठरले. महाराष्ट्रातील ‘एनडीए”च्या या दबदब्याने विधानसभेनंतर आता राज्यसभेतही महायुतीच्या वर्चस्वावर शिक्कामोर्तब झाले.
तामिळनाडू- डीएमकेचा एकहाती कब्जा
तामिळनाडूत सहाही जागा बिनविरोध भरल्या गेल्या, ज्यातून डीएमके नेतृत्त्वाखालील आघाडीचे राज्यावर असलेले अभेद्य नियंत्रण अधोरेखित झाले.
पश्चिम बंगाल- तृणमूल बेधडक
पश्चिम बंगालमधील पाचही जागा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूलने बिनविरोध जिंकल्या, मात्र भाजपने सीपीएमची एकमेव जागा हस्तगत केली. मौसम नूर यांच्या काँग्रेसमध्ये परतण्याने एक जागा आधीच बदलली होती.
बिहार- सर्वात नाट्यमय अंक
बिहारने या निवडणुकीत सर्वाधिक नाट्य निर्माण केले. एका जागेसाठी 41 मते आवश्यक असताना ‘एनडीए’च्या पहिल्या चार उमेदवारांचा विजय सहज होणारच होता, मात्र पाचव्या जागेसाठी RLM चे उपेंद्र कुशवाह विरुद्ध RJD चे अमरेंद्र धारी सिंह यांच्यात चुरशीची लढत अपेक्षित होती. प्रत्यक्षात काँग्रेसचे तीन आमदार- वाल्मिकीनगरचे सुरेंद्र प्रसाद कुशवाह, फोर्बेसगंजचे मनोज बिश्वास आणि मनिहारीचे मनोहर प्रसाद सिंह- मतदानाच्या दिवशी संपर्काबाहेर गेले, तर RJD चे ढाकाचे आमदार फैसल अली मतदानालाच आले नाहीत. महागठबंधनने आमदार सुरक्षित राखण्यासाठी त्यांना वेगळ्या ठिकाणी ठेवण्याची धडपड केली होती. परंतु तरीही हे चार आमदार गायब झाल्याने NDA चा पाचव्या जागेवरही विजय निश्चित झाला.
भाजपाचे रवी शंकर प्रसाद म्हणाले, “मी आधीच भाजपाच्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन करतो. एकही काँग्रेस आमदार विधानसभेत उपस्थित नाही- अशा पक्षाबद्दल काय बोलणार?”
दुसरीकडे, शिवसेना (UBT)चे संजय राऊत म्हणाले, “पक्षांनी आमदारांना लपवले आहे, प्रत्येकजण घाबरलेला आहे- ही लोकशाहीतील भयंकर भयकथा आहे.”
नितीश कुमार- मुख्यमंत्रीपदावरून थेट राज्यसभेत
या निवडणुकीतील सर्वात मोठी राजकीय घटना म्हणजे बिहारचे दोन दशकांहून अधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवलेले 75 वर्षीय नितीश कुमार आता राज्यसभेत जाणार आहेत. गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत नामांकन भरताना नितीश म्हणाले, “मी राज्यसभेचा सदस्य व्हायचो आहे. नवीन सरकारला माझे पूर्ण सहकार्य आणि मार्गदर्शन मिळत राहील.” बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा आता दुसऱ्यावर सोपवून नितीश राष्ट्रीय राजकारणात नवी भूमिका स्वीकारत आहेत.
ओडिशा- घोडेबाजाराचे गंभीर आरोप
ओडिशाच्या चार जागांसाठीच्या मतदानात बिजू जनता दलाने सत्ताधारी भाजप वर ‘घोडेबाजार’ आणि आमदारांना प्रलोभन दाखवल्याचे गंभीर आरोप केले. BJD ने आपल्या निलंबित आमदारांनाही कठोर इशारा दिला. ओडिशात BJP ने तीन जागा जिंकण्याचा, तर BJD ने एक जागा टिकवण्याचा प्रयत्न केला.
हरियाणा- INLD चा मतदान बहिष्कार
हरियाणातील दोन राज्यसभा जागांसाठीच्या मतदानात INLD ने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. हरियाणात BJP चे दोन्ही उमेदवार किरण चौधरी आणि रामचंद्र जांगरा निवडून येण्याचा अंदाज होताच. विशेष म्हणजे, हरियाणाचे मंत्री अनिल विज व्हीलचेअरवर बसून मतदानासाठी आले आणि म्हणाले, “मतदान करणे महत्त्वाचे आहे- स्ट्रेचरवर यावे लागले असते तरी आलो असतो.”
इतर राज्ये- NDA चा सहज मार्ग
आसाममध्ये तीन जागा, छत्तीसगडमध्ये दोन जागा आणि हिमाचल प्रदेशात एक जागा- या सर्वांवर NDA चे वर्चस्व स्पष्ट होते. तेलंगाणातून अभिषेक मनू सिंघवी आणि के. आर. सुरेश रेड्डी हे आधीच बिनविरोध निवडून आले आहेत.
राजकीय परिणाम काय?
या निवडणुकीनंतर NDA चे राज्यसभेतील एकूण बळ 135हून अधिक होणार असून यामुळे घटनादुरुस्ती विधेयके आणि महत्त्वाचे सुरक्षाविषयक कायदे मंजूर करणे सरकारसाठी आणखी सोपे होणार आहे. विरोधी पक्षांसाठी मात्र हे निकाल चिंताजनक असतील- बिहारात स्वतःचे आमदारच बेपत्ता, ओडिशात घोडेबाजाराचे आरोप करतानाच स्वतःच्या आमदारांवर संशय आणि महाराष्ट्रात सातपैकी फक्त एक जागा- हे चित्र INDI आघाडीच्या राज्यसभेतील घसरणीचे स्पष्ट संकेत देते.

