Tuesday, December 24, 2024
Homeडेली पल्सप्रेम तुमचे, आमचे...

प्रेम तुमचे, आमचे नि यांचे!

फेब्रुवारी महिन्याचे ते आठ दिवस! अनेकांच्या भावना तरल असतात. कोणी प्रेम मिळालं म्हणून, कोणी नाकारलं गेल्याचं दुःख, कोणी जुन्या आठवणी उगाळत, रडत बसतात. कोणाचं इतक्या जणांवर प्रेम जडलेलं असतं की त्याची गणती होत नसते. अशा या ना त्या कारणाने प्रेमाचं ‘सेलिब्रेशन’ करत असतात. खरे अभागी तेच ज्यांना सच्चे प्रेम जीवनभर मिळणे दुरापास्त झालेले असते. आताच्या काळात तर प्रेम म्हणजे चक्क देवाण-घेवाण. हा संपूर्ण आठवडा ऐकला, पाहिला तर कोणाकडून किती चॉकलेट आले, फुलं आली, भेटवस्तू मिळाल्या याची जंत्रीच सादर करतात. तरी याच्या-त्याच्याकडून काहीच मिळालं नाही याच्या तक्रारीही असतात. फारच कमी लटक्या रागानं केलेल्या, तू माझ्या जीवनात आहेस, हीच मोठी भेट! असं सांगत ते व्यक्त न करता स्पर्श, कृती यातून ते दर्शवणारे लोक कमीच. हे प्रेम समजून घेत तीच माया-ममता, आपुलकी परस्पर स्नेहभाव जपणारे थोडकेच. संपूर्ण आठवडा हा नात्यांचा उत्सव जणू! नंतर मग प्रेम नाही केलं तरी चालतं असाही काहींचा समज असू शकतो.

फार कमी लोक प्रेम म्हणजे शरीरापालिकडे जाऊन असते, याचा विचार करतात. आपल्याकडे विविध नाती असतात नि त्याची समजदारीने जपणूक हेदेखील प्रेमच असते. अनेकांना हेच कळत नाही. आता शिवजयंती येऊ घातलीय. स्वराज्य म्हणजे काय अनेक मावळ्यांना माहितीही नसेल. समोरचा माणूस आपला राजा नि आपल्या पोराबाळांसाठी देशासाठी काही  करू पाहतो हे लक्षात घेत बलिदान देणारेही प्रेमच! हक्क, कर्तव्य यांची सांगड यात हवीच. स्त्री-पुरुष प्रेमाचे तसे अनेक दाखले जगभरात आढळतात. त्यांच्या प्रेमाचे गोडवे सांगितले जातात. काहींनी तर या प्रेमाची स्मारके, शिल्पे उभारली. यातील काही काळाच्या ओघात पडझडले, काही भग्नावस्थेत आहेत, काहीच टिकून आहेत. भारतातही अशा वास्तू आहेत त्या पाहू!

मस्तानी महाल, पुणे

पुण्यातच असलेला शनिवार वाडा महाराष्ट्रात कोणाला माहिती नसेल असा शोधून कोणी सापडणार नाही. पेशवा बाजीराव यांनी बनवलेला हा महाल अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. सध्या पुण्यासह महाराष्ट्र नि देशभरातील लोक इथे आवर्जून येतात. पहिला बाजीराव नि त्यांची दुसरी पत्नी मस्तानी यांचे इथे वास्तव्य होते. पेशव्यांच्या घरच्या परंपरा नि रितीरिवाज, धर्म यात महदंतर असल्याने मस्तानीला कायदेशीर पत्नी म्हणून स्वीकारण्यात अडचणी होत्या नि तसा इन्कार केला गेला. त्यामुळे बाजीराव यांनी शनिवार वाड्यातच मस्तानी महालाची निर्मिती केली नि ते दोघे तिथेच एकत्र राहात. सद्यस्थितीत हा महाल अस्तित्त्वात नसला तरी त्याचे भग्नावशेष आहेत. याच किल्ल्यातील एका द्वारावर ‘मस्तानी दरवाजा’ अशी नोंद सापडते. काही पुरातन अभिलेख्यात नाटक शाळा, नटशाळा असा उल्लेख सापडतो. बुंदेलखंडातून आलेली बाजीरावची दुसरी पत्नी मस्तानी हिचा हा उल्लेख असल्याचेही म्हटले जाते.

चितोडगड किल्ला, उदयपूर

इ स सातव्या शतकात निर्माण करण्यात आलेला चितोडगड किल्ला देशातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक आहेच. शिवाय युनेस्कोच्या वारसा (हेरिटेज साईट) यादीतही समाविष्ट आहे. यातील मुख्य आकर्षण म्हणजे राणी पद्मावतीचा तीन मजली पांढरा शुभ्र महाल! हा कमल कुंडाजवळ बनवला गेला आहे. हा केवळ विशाल नसून त्याची शिल्पकला, वास्तुकला पर्यटकांना अचंबित करते. भूमिगत तळघर, नक्षीदार सजावटीयुक्त खांब, जलाशय, गुंतागुंतीची नक्षी असलेली जैन मंदिरे यासह अनेक मोहक वास्तुशिल्प इथे आढळून येतात, जी मोहित तर करतातच, शिवाय त्याकाळातील आरेखन प्रगत असल्याची साक्ष देतात. असा हा राजेशाही थाटाचा चितोडगड किल्ला राणी पद्मावती नि राजा रतन रावलसिंह यांच्या ऐतिहासिक प्रेमकथेचं प्रतीक मानला जातो. राजाने एका स्वयंवरात अत्यंत कठीण चाचण्या नि परीक्षा देत राणी पद्मावतीला जिंकलं होतं! त्यानंतरच आपली प्रिय राणी म्हणून चितोडगड किल्ल्यात तिला आणले. किल्ल्याच्या भिंती त्यांच्या प्रेमाच्या अनेक कहाण्या सांगतात. या किल्ल्याची भव्यता नि इतिहास प्रत्यक्ष पाहून कळतो, समजतो.

रुपमती मंडप, मांडू

मध्य प्रदेशातील इंदूर शहरापासून सुमारे शंभर किमीच्या अंतरावर नर्मदा नदी किनारी हा रुपमती मंडप आहे. या गावाचे नाव मांडू आहे. हा मंडप वारसा नि ऐतिहासिक वास्तुकलेचा प्रसिद्ध ठेवा आहे. भू सपाटीपासून ३६६ मीटर उंचीवरील रुपमती मंडपाची मनोहारी नि आकर्षक शिल्पकला रसिक पर्यटकांना मोहित करते. या रचनेत चौकोनी मंडप, विशाल गोलाकार महिरपी अन्य नक्षीकाम लोभसवाणे वाटते. याच मंडपाच्या जवळून ३६६ मीटर खाली वाहणारी स्थानिक श्रद्धेय मा नर्मदेचे पात्र इथे येणाऱ्यांना खिळवून ठेवते. २०१७ साली  ऐन नवरात्र काळात मंत्रालय वार्ताहर संघाने आयोजित महाराष्ट्र शासन अभ्यास दौऱ्यात इथे जाण्याचा योग आला. मांडू राजकुमार बाज बहादूर आणि राणी रुपमती हे पौराणिक अशा प्रेम कहाणीसाठी प्रसिद्ध आहेत. मांडूचे अंतिम शासक सुलतान बाज बहादूर माळवा प्रांताची राणी रुपमतीच्या मधुर बहारदार आवाजावर भाळले होते. त्यांनी थेट लग्नाचा प्रस्ताव दिला. पण उलट रुपमती यांनी एक अटच टाकली. ती होती की राजाने एका अशा महालाची निर्मिती करावी, जिथून मला माझी प्रिय नर्मदा नेहमीच दिसत राहील. तसे झाल्यासच ती लग्न करेल. प्रेमात पडलेल्या या सुलतानाने ही अट मान्य करून या रुपमती मंडपाची निर्मिती केली. अशाप्रकारे त्यांच्या प्रेमाची शाश्वत निशाणी आजही पाहण्यास मिळते.

ताज महाल, आग्रा

या अजरामर कलाकृतीत उत्तर प्रदेशातील ताज महाल याचा समावेश न झाल्यास या देशातील प्रेम महाल हा लेख पूर्ण होणार नाही, भले त्याबाबत कितीही वाद असले तरी! आंतरराष्ट्रीय स्तरावर विख्यात असलेल्या या वास्तूच्या भेटीला परदेशी हमखास हजेरी लावतातच. पांढऱ्या शुभ्र संगमरवरने बनवलेल्या या महालाची निर्मिती मोघल सम्राट शाहजहानने केली ती १६३१ ते १६४८ या कालखंडात. आपली पत्नी मुमताज महल हिच्या स्मृतीसाठी एक मकबरा म्हणून याची निर्मिती झाली. तिचे निधन गर्भार असताना झाले होते. शाहजहान नि मुमताज महल यांची आठवण करून देणाऱ्या या मकबऱ्यात मुमताज हिच्या शवाचे दफन झाले आहे. त्याच बाजूला शाहजहानचीही कबर आहे. ताजमहालच्या बाहेर एक विशाल अशी बाग आहे, जी हल्ली नीटशी पाहायला मिळत नाही. प्रेमाची अमूल्य निशाणी समजल्या जाणाऱ्या या वास्तूला जगातील सातवे आश्चर्य समजले जाते.

या झाल्या शारीरिक आकर्षणाच्या प्रेम कहाण्या! हल्ली हा प्रेम दिवस याचसाठी आठवणीत ठेवला जातो नि बऱ्याच कंपन्या बाजारीकरण करून बक्कळ पैसाही कमावतात. यातून व्यापारउदीम वाढून काहींना रोजगारही मिळत असेल, पण नको त्या परंपरा जोपासल्या जात आहेत. घराचे संस्कार कमी पडत आहेत. काही देणं-घेणं म्हणजेच प्रेम हे बिंबवले जात आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात,

प्रेम नये सांगता, बोलता, दाविता|

अनुभव चित्त जाणे|

प्रत्येकवेळी आपले प्रेम आहे हे दाखवलेच पाहिजे असे नव्हे तर ते अनुभवताही आले पाहिजे. तिरस्कारात, अगदी दुर्लक्षातही प्रेम असते. समोरची व्यक्ती आपली होणार नाही हे माहीत असताना प्रेम करणे, तिच्या सुखाकरिता आनंदकरिता तिच्यापासून दूर राहणे हेदेखील प्रेमच! हल्ली प्रेयसीला जाळणे, खून करणे असे प्रकार सर्रास वाचायला मिळतात. असो. यावर इलाज आहे तो स्वनियंत्रण! घातपात करून साध्य काहीच होत नाही. तेव्हा प्रेम शरीरावर नको, तर प्राणीमात्र, आई-वडील, भाऊ-बहीण, सगेसोयरे, सर्वांवर प्रेम करा. सर्व धर्मांची शिकवण हीच आहे. माणसाचा वापर करून फेकू नका. वेळेला किंमत करू नका. या पलीकडे प्रेम काय असते हो? सोडून तर सर्व इथेच जायचे आहे..

Continue reading

भारत-ऑस्ट्रेलियात व्यापारवृद्धीसाठी झाली बैठक

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सेंद्रिय उत्पादनांवरील एमआरए, भेंडी, डाळिंब, द्राक्षे, कॉटेज चीज, मॅकॅडॅमिया नट्स, मसूर आणि एवोकॅडो यासारख्या उत्पादनांशी संबंधित बाजारपेठ प्रवेशसमस्या, प्रशुल्क दर कोटाव्यवस्था, ऑस्ट्रेलियातील औषधविषयक विशेषतः जेनेरिक औषधांचे किंमत नियंत्रण, व्हिस्की आणि वाईनच्या व्यापाराला चालना देण्याकरीता दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये नुकतीच बैठक झाली. वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांच्या...

सलमान शूटआऊट प्रकरणात छोटा शकीलचे पंटर्स?

सुमारे 15 दिवसांपूर्वी सलमान खान शूटआऊटप्रकरणी व्यक्त केलेली भीती आता हळूहळू खरी ठरत असल्याचे दिसत आहे. लॉरेन्स बिष्णोई याच्या पंटर्सनी हल्ला केल्याची जबाबदारी घेतली असल्याचे जाहीर झाले असले तरी लॉरेन्सचा मुंबईत बेस नाही. मुंबईत बेस नसल्याने तो अन्य टोळ्यांचे...

येत्या बुधवारी ‘सीहॉक्स’ हेलिकॉप्टर्स, भारतीय नौदलात!

भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस गरुड, कोची येथे येत्या बुधवारी, 6 मार्चला एमएच 60 आर सीहॉक (ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरची सागरी आवृत्ती) हे नवीन बहुउद्देशीय हेलिकॉप्टर दाखल होणार आहे. भारताच्या संरक्षणविषयक आधुनिकीकरणाच्या प्रवासात हा एक महत्त्वाचा क्षण ठरणार आहे. भारतीय नौदलात या हेलिकॉप्टर्सचे पथक, 'आयएनएएस 334' या नावाने कार्यरत होणार...
Skip to content