Homeमाय व्हॉईसकालातीत स्वर... म्हणजेच...

कालातीत स्वर… म्हणजेच गानसम्राज्ञी लता मंगेशकर!!

साधारण 1964ची गोष्ट. नंतर प्रचंड गाजलेल्या `गाईड` या चित्रपटाची जुळवाजुळव सुरू होती. त्याबरोबरच गाण्यांची तयारीही. गीतकार शैलेंद्र, संगीतकार एस. डी. बर्मन. नेहमीप्रमाणे किशोरकुमार, महम्मद रफी आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर बर्मनदांच्या दिमतीला होतेच. यावेळी दादा (बर्मनदा) नेमके आजारी पडले. तोपर्यंत एकच गीत ध्वनिमुद्रित झालं होतं. पण आपलं आजारपण लांबलेलं जाणवून दादांनी निर्माता, अभिनेता देव आनंद यांना सांगितलं, `देव, माझ्याकडून यावेळी हे काम होईलसं वाटत नाही, तू अन्य संगीतकाराला हे काम सांग.` त्यावर देव आनंद यांनी त्या प्रस्तावाला स्पष्टपणे नकार देत `मी कितीही वाट बघायला तयार आहे. पण गाईड तुम्हीच करायचा, हा माझा शब्द आहे`, असं दादांना बजावलं. त्यावर दादांनी निर्वाणीचा सूर काढला. `माझं काही बरंवाईट झालं तर`? देवसाहेब म्हणाले, `देव करो, तसं काही न होवो, होणारही नाही. पण तशीच वेळ आली तर या एका गाण्यावरच गाईड निघेल!`…

त्यावर दादांना नवा हुरूप आला. नवं चैतन्य आलं. त्यामधूनच निर्मिती झाली, `गाईड`च्या अजरामर गीतांची. नव्या सृजनाला तरुण धुमारे फुटले की कशी कसदार निर्मिती होते, याचं मूर्तीमंत उदाहरण होतं, `गाईड` चित्रपटातली 10 अजरामर गाणी. वर म्हटल्याप्रमाणं दादांना साथ होती, लतादीदी, रफीसाहेब आणि किशोरकुमार यांची. `गाता रहे मेरा दिल`, `तेरे मेरे सपने अब एक रंग हैं..`, `दिन ढल जाएं, रात न जाएं..`, `पिया तोसे नैना लागे..`, `मोसे छल किये जा..`, `क्या से क्या हो गया..’, `वहां कौन हैं तेरा..` यासह आणखी तीन गीतं. सगळीच गीतं उत्तम. परंतु गाजली ही सात गीतं. तरल काव्य, संवेदनाक्षम संगीत आणि त्याला तशाच दर्जेदार स्वरांची युती झाली की दिव्य निर्मिती कशी एका उंचावर जाते, याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे, `गाईड`ची आजही लोकप्रिय असलेली गाणी. या गीतांपैकी एका जबरदस्त गाण्याची हकीगत!

गाण्यांची जुळवाजुळव सुरू होती. लतादीदींच्या स्वरात दादांनी एक सोलो गीत ध्वनिमुद्रित केलं. या गीतावरचं चित्रिकरण जयपूर इथं तातडीनं करायचं होतं. परंतु देवसाहेब आणि दिग्दर्शक विजय आनंद यांना हे गीत काही तितकंसं आवडलंच नव्हतं! त्यावर दादांनी बजावलं. `हे गीत तुम्ही नीट ऐका. पुन्हा एकवार ऐका. नाहीच पसंत पडलं तर ठीक आहे. परंतु लक्षात ठेवा, हे गीत असं तयार केलंय की आताच्याच नव्हे, तर पुढच्याही काही पिढ्यांना हे गीत प्रचंड आवडेल. 50 वर्षांनंतरही हे गीत आजच्याएवढंच लोकप्रिय ठरेल, ही काळ्या दगडावरची रेघ आहे!’ दादा आत्मविश्वासानं ठामपणे सांगत होते, आनंद मंडळींना ते ऐकण्यावाचून गत्यंतरच नव्हतं. दादांच्या बाजूनं कौल पडला. हे अजरामर गीत होतं, `काटोंसे खींच के ये आँचल, तोड के बंधन बांधी पायल..` हे गीत नेहमीच्या धाटणीतलं मुळीच नव्हतं, नाही. कडव्यानं सुरू झालेल्या या गीतानं लोकप्रियतेचे असंख्य उच्चांक मोडले. बर्मनदादांच्या दूर्दम्य आत्मविश्वासाचं प्रतीक ठरलेल्या `काटोंसे खीच के ये आँचल..` या गीतात शब्द आहेत, `आज फिर जीने की तमन्ना है…’ जवळपास वर्षभराच्या आजारातून उठलेल्या दादांसाठी हे गीत म्हणजे जणू एक `THEME SONG` ठरलं. पुढचा इतिहास सर्वश्रुत आहे.

`पिया तोसे नैना लागे..` या नितांत सुंदर गाण्याचा इतिहास फारसा ठाऊक नाही. परंतु अनेक शास्त्रीय रागांचं अचूक मिश्रण करून तयार केलेल्या या गाण्यात लतादीदींनी तेवढ्याच उत्कटपणे जीव ओतलाय. आज आपण रेडिओ किंवा अन्यत्र हे गीत दोन कडव्यांचं ऐकतो. परंतु प्रत्यक्षात चार कडव्यांचा समावेश असलेलं हे दीर्घ गीत तब्बल आठ मिनिटांचं आहे. असो.

माणूस वयानं मोठा होत असतो. त्याच्यात नित्याचे बदल होत असतात. परंतु त्याच्या कलाकृती कालातीत असतात, अजरामर असतात. काळही त्यांना धक्का लावू शकत नाही. याचा निखळ पुरावा म्हणजे, लतादीदींची असंख्य गीतं. दीदींची गीतं हा तमाम भारतीय, संगीताची भाषा समजून त्याचा मनमुराद आनंद लुटणारे जागतिक स्तरावरचे कानसेन यांच्या आनंदाचा अक्षय ठेवा आहे आणि हा ठेवा त्याच्या संवेदनाक्षम मनाच्या कुपीतून हटेल, असं वाटत नाही. जिवंतपणीच दंतकथा ठरलेल्या लतादीदी आणि त्यांची गीतं, त्यांचं सांगितिक जीवन, त्यांच वैयक्तिक जीवन, त्यांची एकूणच वाटचाल याबद्दल आता सर्वांनाच ठाऊक आहे. त्याची इथं पुनरावृत्ती करावीशी वाटत नाही.

त्यांच्या स्वराची वैशिष्ट्यं, गाण्यांप्रती असलेली त्यांची PASSION, FRATERNITY आणि त्या अनुषंगानं काही मुद्द्यांकडे लक्ष वेधायचंय. त्यांच्या एका चाहत्याच्या नजरेतून केलेलं हे धाडस (!) अर्थातच जाणकारांची क्षमा मागून! दीदींबद्दलची ही वैशिष्ट्यं नोंदवताना वैयक्तिक काही अनुभवांची जोड देत आहे. काही वर्षं त्यांच्याशी थेट संवाद करायला मिळाला, हा माझा भाग्ययोग. दीदी आज गेली आठ दशकं `लता मंगेशकर` या अढळपदी आरूढ का झाल्या, याचं दर्शन काही प्रमाणात तरी त्यानिमित्तानं आहे. परंतु त्या, गाण्यातला अभिनय या गोष्टी आपल्याला थक्क करून सोडतात!

खरं म्हणजे, लतादीदींच्या गाण्यांचा एकूण परामर्ष घेणं तसं धारष्ट्याचंच मानायला हवं. परंतु, लतादीदींनी गाणी गाताना कायम साभिनय गायली आहेत. त्यामुळे त्यांचं गाणं कायमच अतिशय परिणामकारक ठरलं आणि `हे गाणं जणू आपल्यासाठीच त्या गायल्या आहेत`, अशी अनुभूती प्रत्येकाला येत राहते. त्यांच्या स्वरात ताजेपणा, तरुणपणा कायमच राहिलाय, हे आणखी एक कारण…

लतादीदींचा स्वर `पिकालो` जातीचा मानला गेला. म्हणजे, त्यांचा दिव्य स्वर मायक्रोफोनवर योग्य जागी, योग्य प्रमाणात आदळत राहतो. त्यामुळे त्याची परिणामकारकता, तीव्रता तशीच जबरदस्त राहते. त्याला जोड त्यांना असलेला जबरदस्त `माईक सेन्स`. याचं वैशिष्ट्य म्हणजे, त्या माईकवरून गात असताना तुम्ही त्यांच्या जवळून त्यांचं गाणं ऐकायचा प्रयत्न केला तरी, ते महत्प्रयासानं ऐकावं लागतं. याचबरोबर संगीत, वाद्यांमधला असलेला त्यांचा जबरदस्त कान… एखाद्या वादकानं जरा जरी गफलत केली तरी, त्याला जवळ जाऊन ते सांगण्याची क्षमता दीदींमध्ये असे. त्याचबरोबर दीदींची तीव्र स्मरणशक्ती आणि गाणं गाण्यापूर्वी त्या गाण्याची पार्श्वभूमी समजावून घेण्याची त्यांची कायमची सवय आणि कोणत्याही कामात, म्हणजेच गाण्यात बनचुकेपणा न करता त्या गाण्याला 100 टक्के न्याय देण्याची हातोटी.

दीदींच्या यशाचं इंगित त्यांच्या या स्वभावधर्मात असल्याचे दाखले असंख्यवेळा संबंधितांनी अनुभवले आहेत. कामात झोकून देण्याची वृत्ती आणि समर्पितता यामुळे दीदींची असंख्य गाणी अजरामर झाली आहेत. त्या गाण्यांवर त्यांचा एवढा जबरदस्त ठसा उमटलेला आहे आणि ती गाणी त्यांनी एवढ्या ताकदीनं गायली आहेत की इतरांनी ती गायचं धाडस कधी केल्याचं ऐकिवात किंवा पाहण्यात नाही. `जाहल्या काही चुका..`, `अजिब दास्ता हैं..`, `नाही कशी म्हणू तुला..`, `रस्में उल्फत तो उठाएं..` आदी गाणी असे पुराव्यादाखल नोंदविता येतील.

अशा या लतादीदींना आपण ज्येष्ठ, श्रेष्ठ गायिका म्हणून गेली अनेक दशकं ओळखतो, त्या जणू आपल्या जीवनाचाच एक अविभाज्य घटकच ठरल्या. `अतिपरिचय` होऊनही कधीच `अवज्ञा` ज्याची झाली नाही, असा सच्चा, विशुद्ध स्वर म्हणजे लतादीदींचा स्वर… खरं म्हणजे, आपण त्यांना गायिका म्हणूनच ओळखत असल्यामुळे त्यांचे इतर गुण काही प्रमाणात झाकले गेले किंवा त्यांना गाण्यांपुढे या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नसावा. परंतु दीदी यांच्याकडे अतिशय कसदार अशी लेखनकला होती. रूढार्थानं शालेय शिक्षण झालेलं नसलं तरी, दीदींनी ही उणीव प्रचंड वाचन करून भरून काढली. त्याचंच फळ म्हणजे त्यांना अनेक भाषा चांगल्या अवगत होत्या. त्यांनी लिहिलेल्या लेखांचं संकलन `फुले वेचिता` या `ग्रंथाली`नं प्रकाशित केलेल्या लेखसंग्रहामध्ये करण्यात आलं आहे. या लेखसंग्रहात दीदींनी आपल्या वाटचालीचा धावता आढावा तर घेतला आहेच, परंतु पिताश्री मास्टर दीनानाथ, श्रीनिवास खळे, आशा भोसले, नरेंद्र शर्मा आदींची व्यक्तीचित्रं अत्यंत परिणामकारकपणे रंगवली आहेत. मोजक्या शब्दांद्वारे व्यक्तींचं सूक्ष्म अवलोकन कसं करावं, याचं दर्शन त्यामधून होतं.

वडिलांची नाटक कंपनी असल्यामुळे नाट्यव्यवसाय, तिथल्या घडामोडी दीदींना फार सुरूवातीपासून अनुभवायला मिळाल्या. त्या क्षेत्रातल्या अनेक घडामोडींच्या असंख्य आठवणींचा साठा दीदींकडे आहे. परंतु दुर्देवानं दीदींना त्याबद्दल कोणी फारसं बोलतं केल्याचं आढळत नाही. अशा या अष्टपैलू दीदी. पत्रकारितेत असताना त्यांच्याशी संपर्क साधण्याची जवळपास दशकभर संधी मिळाली. त्यावेळी त्यांच्याशी बोलण्यातून अनेक गोष्टींचा उलगडा होत असे. काहीवेळा गाण्यांचा अज्ञात इतिहासही त्या सांगत. (`मदभरी ये हवाएं..` हे गीत प्रथम बंगालीत गायले होते, असं त्यांनी एकदा सांगितलं होतं.) त्यांच्या मधुर गाण्याइतकंच त्यांच्याशी संवाद साधणंही मधुरपणाचंच वाटत असे. कारणपरत्वे, त्यांच्याशी दूरध्वनीवरूनच संपर्क साधला जात असे. परंतु दूरध्वनीवर आल्या नाहीत, असं सहसा कधी झालं नाही. त्यांचं बोलणं अतिशय घरंदाज आणि त्याला आपुलकीची कायम जोड. मला गाण्यांची असलेली प्रचंड आवड त्यांच्याशी संपर्क साधायला मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरली. काहीवेळा वृत्तांकनाच्या मुद्द्यावरून किंवा सांगितलेल्या वेळी दूरध्वनी न केल्यामुळे माझ्यावर त्या काहीवेळा संतापतही. परंतु त्यांनी कधीही प्रतिष्ठेचा मुद्दा केला नाही. एका वृत्तासंबंधी त्यांनी स्वत: मोबाईलवर संपर्क साधून आपलं म्हणणं स्पष्ट केलं होतं. आपल्या मोठेपणाचं ओझं लादून समोरच्या व्यक्तीवर दबाव आणण्याचाही त्यांचा कधीच प्रयत्न नसे. त्याचमुळे कधी त्यांच्याशी बोलण्याचं टेन्शन आलं नाही. त्यांच्या संवादाला एका आपुलकीचं अस्तर असे. अशाप्रकारे, सन 2002 ते 2011 हा कालखंड अतिशय सुंदर, अविस्मरणीय ठरला! लतादीदी आपल्याला ओळखत असत, ही भावना काळीज सुपाएवढं करायला पुरेशी ठरली होती. नंतर मात्र त्यांच्याशी संपर्क झाला नाही. असो.

अगदी सुरुवातीस दादा चांदेकरांपासून दत्ता डावजेकर, गुलाम हैदर, दत्ता कोरगावकर, अनिल विश्वास, सी. रामचंद्र, सज्जाद हुसेन, मदन मोहन, नौशाद, शंकर जयकिशन, एस. डी. बर्मन, नंतरच्या काळात लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी, आर. डी. बर्मन, उत्तमसिंग, आदी असंख्य संगीतकारांच्या गाण्यांना न्याय देणारा प्रतिभावान कालातीत स्वर म्हणजेच लता मंगेशकर ही बाब साधीसुधी नव्हे… या तमाम संगीतकारांच्या मांदियाळीत एकच संगीतकार असा ठरला, ज्यानं कधीही लतादीदींना एकही गाणं दिलं नाही आणि ते प्रतिभावंत संगीतकार म्हणजे, ओ. पी. नय्यर. `सगळे संगीतकार लताचा आवाज घेतात. मग असा एखादा संगीतकार असा का असू नये, की जो तिच्या आवाजाशिवाय यशस्वी ठरेल आणि मग तो संगीतकार मीच का असू नये,` अशा विलक्षण जिद्दीपोटी नय्यर यांनी आपल्या संगीत जीवनात लतादीदींना तसूभरही जागा दिली नाही. ही जिद्द योग्य की अयोग्य, हा मुद्दा वेगळा. परंतु ओ. पी. नय्यर यांनी आपल्या जिद्दीला कधीच तडा जाऊ दिला नाही. ओ. पी. नय्यर आणि लतादीदी एकत्र आले असते तर काय झालं असतं, हा प्रश्न विचारल्यावर किमान 10 जणांनी तरी `या दोघांनी इंडस्ट्री गाजवून सोडली असती, कहर केला असता, इतर संगीतकारांची वाट लावली असती,` असं सहजपणे सांगितलं होतं. मात्र ओ. पी. नय्यर हे लतादीदींच्या आवाजाचं महत्त्व जाणून होते आणि दीदींनीही ओ.पी. नय्यर यांची काही गीतं आपल्याला आवडत असल्याचं त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना आवर्जून नमूद केलं होतं.

ओ. पी. नय्यर यांचा विषय निघालाच आहे, तर लतादीदींविषयी त्यांच्या अतिशय मार्मिक प्रतिक्रियेनं या लेखाचा समारोप करावासा वाटतो… ओ. पी. नय्यर एकदा म्हणाले होते, `आर. डी. बर्मन यांनी भले आशाजींना उडत्या किवा लोकप्रिय चाली दिल्या. परंतु त्यांनी आपल्या सर्वोत्तम चाली लताजींनाच दिल्या आणि लताजींनीही त्या चालींचं सोनं केलं!` हे सांगताना ओ. पी. नय्यर यांनी `अमर प्रेम` आणि `कटी पतंग`मधल्या गाण्यांकडे लक्ष वेधलं होतं. लतादीदींना मनापासून अभिवादन आणि शतश: प्रणाम…

संपर्क-9987157766

Continue reading

प्रदीप भिडेंमुळे ‘दूरदर्शन’ अनुभवले!

ख्यातनाम वृत्तनिवेदक प्रदीप भिडे स्वर्गवासी झाले आणि मनात त्यांच्यासंबंधीच्या अनेक आठवणींनी रुंजी घातली. मोठ्या पदावर काम करूनही अत्यंत साधे, निगर्वी प्रदीपजी आदर्श वर्तनाचा वस्तुपाठ होते. दूरदर्शनवर वृत्तसंपादनाच्या निमित्तानं (जी संधी त्यांच्याचमुळे मिळाली) एक वेगळंच विश्व अनुभवता आलं. त्याचं श्रेय...
Skip to content