Homeएनसर्कलकोरियाच्या बौद्ध यात्रेकरूंची...

कोरियाच्या बौद्ध यात्रेकरूंची भारतात 1100 किमीची पदयात्रा!

दक्षिण कोरियाच्या सांगवोल सोसायटीने आयोजित केलेल्या पदयात्रेचा एक भाग म्हणून, कोरिया प्रजासत्ताकमधील 108 बौद्ध यात्रेकरू 43 दिवसांत 1,100 किलोमीटर अंतराची पदयात्रा करतील, असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी सांगितले.

भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील राजनैतिक संबंधांच्या स्थापनेची 50 वर्षे साजरी करत असताना या पदयात्रेला महत्त्व प्राप्त झाले आहे. उभय देशांमधील मैत्री आणि सहकार्य वृद्धींगत करणे हा या यात्रेचा उद्देश आहे. यात्रेकरू भारतातील उत्तर प्रदेश आणि बिहारमधील बौद्ध तीर्थक्षेत्रांना भेट देतील आणि त्यानंतर नेपाळला जातील.

भारतातील बौद्ध पर्यटन सर्किट अर्थात मंडल जगासमोर आणण्याचा दृष्टीकोन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडला आहे. हे मंडल पर्यटकांना भगवान बुद्धांच्या शिकवणीची अनुभूती घेण्यास आणि बुद्धांच्या जीवनकाळातील त्यांच्या पाऊलखुणा शोधण्यास मदत करते. या तीर्थयात्रेदरम्यान बुद्धाच्या जन्मापासून ते त्यांच्या परिनिर्वाणापर्यंतचे आयुष्य याच्याशी संबंधित ठिकाणांना यात्रेकरू भेट देणार आहेत. सचिवांनी येणाऱ्या यात्रेकरूंचे स्वागत केले आणि भारत सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. या तीर्थक्षेत्रांच्या भेटीच्या माध्यमातून यात्रेकरूंना बौद्ध तत्त्वज्ञानाची सखोल माहिती मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

हे यात्रेकरू 9 फेब्रुवारी ते 23 मार्च 2023 या कालावधीत भारत आणि नेपाळमधील बौद्ध पवित्र स्थळांच्या 43 दिवसांच्या दौऱ्यावर असतील. ‘ओह, वुई! ओह, लव्ह! ओह, लाइफ!’ या घोषवाक्यासह बुद्धांचे जीवन आणि पाऊलखुणा जतन केलेल्या भारतातील तीर्थस्थळांच्या माध्यमातून भक्तीपर बौद्ध संस्कृतीच्या कार्यांचा प्रसार करणे हा सांगवोल सोसायटीने आयोजित केलेल्या यात्रेचा उद्देश आहे.

दोन्ही देश राजनैतिक संबंधांच्या 50 वर्षांचा हा ऐतिहासिक टप्पा साजरा करत आहेत. त्यामुळे 2023 हे वर्ष उभय देशांमधील द्विपक्षीय संबंधांसाठी विशेष आहे, असे भारतातील कोरिया प्रजासत्ताकचे राजदूत चांग जे-बोक यांनी सांगितले. भारताकडे जी 20 समुहाचे अध्यक्षपद असताना ही पदयात्रा भारतात येत आहे आणि जी 20मध्ये भारताच्या यशासाठी दक्षिण कोरिया वचनबद्ध आहे, असेही ते म्हणाले. बौद्ध शिकवणीसारखेच भारताचे जी 20 अध्यक्षपदाचे ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ हे ब्रीदवाक्य आहे, असे राजदूतांनी सांगितले.

भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील धार्मिक संबंधांवर बोलताना राजदूत म्हणाले की, हे संबंध दृढ भावना जागृत करतात आणि दोन्ही देशातील लोकांमध्ये प्रचंड सद्भावना निर्माण करतात यामुळे हे द्विपक्षीय संबंधांना बळ देणारे आहे. कोरियातून दरवर्षी हजारो पर्यटक भारताला भेट देतात आणि कोरियन बौद्ध धर्माच्या जोग्ये ऑर्डरच्या माध्यमातून या तीर्थक्षेत्र पदयात्रेचे आयोजन केले जात आहे. वाराणसीतील सारनाथ येथून ही तीर्थक्षेत्र पदयात्रा सुरू होईल आणि नेपाळमधून मार्गक्रमण करून श्रावस्ती येथे या पदयात्रेचा समारोप होईल.  

ही भव्य बौद्ध तीर्थयात्रा ही आपल्या सामायिक बौद्ध वारशासाठी योग्य आदरांजली आहे. लोकांशी संपर्क अधिक दृढ करण्यासाठीच्या प्रयत्नांना या पदयात्रेमुळे अधिक चालना मिळेल असे राजदूतांनी या पदयात्रेचे महत्त्व आहे. यात्रेकरू भिक्षू आठ प्रमुख बौद्ध पवित्र स्थळांवर  आदरांजली अर्पण करतील. भारतीय बौद्ध धर्म आणि संस्कृतीचा अनुभव घेतील आणि धर्मगुरूंशी द्विपक्षीय बैठक घेतील आणि जागतिक शांततेसाठी प्रार्थना सभा आणि जीवन सन्मानासाठी आशीर्वाद सोहळा आयोजित करतील.

Continue reading

महाराष्ट्राला मिळणार ४८ऐवजी ७२ खासदार?

भारतीय लोकशाहीत एक ऐतिहासिक बदल घडण्याच्या उंबरठ्यावर आहे. केंद्र सरकार "नारी शक्ती वंदन अधिनियम"मध्ये महत्त्वपूर्ण संशोधन करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित संशोधन विधेयकाद्वारे लोकसभेतील जागांची संख्या सध्याच्या ५४३वरून ८१६पर्यंत वाढवण्यात येईल. या ८१६ जागांपैकी एक तृतीयांश म्हणजे तब्बल २७३...

इराणसोबतचे युद्ध हा अमेरिकेने खेळलेला जुगार!

आज जागतिक भू-राजकारण अशा वळणावर उभे आहे जिथे लष्करी संघर्षाचा धूर थेट सामान्य माणसाच्या किचन आणि उद्योगांच्या ताळेबंदापर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेचे इराणसोबतचे युद्ध केवळ लष्करी वर्चस्वाची लढाई राहिलेली नाही, तर ती जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी धोक्याची घंटा ठरत आहे....

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...
Skip to content