सुधीर गजानन जोशी! शिवसेनेची एक बुलंद तोफ काल, १७ फेब्रुवारी २०२२ रोजी खऱ्या अर्थाने शांत झाली. गेल्या काही वर्षांपासून सुधीरभाऊ केवळ आपले शारीरिक अस्तित्त्व टिकवून होते. ज्यावेळी त्यांचा दुर्दैवी अपघात झाला, त्यानंतर ते फक्त शरीराने वावरत होते. तमाम शिवसैनिक असो, कामगार असो की बँक कर्मचारी, सुधीरभाऊंच्या मार्गदर्शनापासून वंचित राहिले होता. अर्थात, जुन्या शिवसैनिकाला, बँक कर्मचाऱ्याला, लोकाधिकारचा कार्यकर्ता, पदाधिकारी याला सुधीरभाऊंची जी शिदोरी लाभली होती त्या शिदोरीवर तो आजवर मार्गक्रमण करीत आला.
मराठी माणसाच्या न्याय्यहक्कांसाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी शिवसेना जन्माला घातली. त्यानंतर हटाव लुंगी, बजाव पुंगीचा नारा देत एका बाजूला दत्ताजी साळवी यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय कामगार सेना तर सुधीरभाऊ जोशी यांच्या नेतृत्त्वाखाली स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ यांची बाळासाहेबांनी स्थापना केली. गजानन कीर्तिकर, अनिल देसाई, विलास पोतनीस यांच्यापासून वामन भोसले, जी. एस. परब, शरद पवार, शरद एक्के आदींपर्यंत एकापेक्षा एक सरस कार्यकर्ते सुधीरभाऊंनी घडविले. मराठी माणूस ताठ मानेने आस्थापनांमध्ये आपला पाय रोवून उभा राहिला.
एका बाजूला स्थानीय लोकाधिकारचे काम सुरू असताना विधान परिषद आणि विधानसभा ही कायदेमंडळेसुद्धा आपण अभ्यासिली पाहिजेत म्हणून सुधीरभाऊंनी मुंबईच्या महापौरपदानंतर आपला मोर्चा विधिमंडळाकडे वळविला. मनोहर जोशी, सुधीर जोशी आणि प्रमोद नवलकर ही त्रिमूर्ती विधिमंडळात आपला जबरदस्त ठसा उमटवती झाली. आपल्या मिश्कील भाषण करण्याच्या स्वभावा/पद्धतीमुळे सुधीरभाऊ समोरच्या माणसाच्या अंगावर एक ओरखडाही येऊ न देता घायाळ करीत असत.
लातूर किल्लारी येथे भूकंप झाला. अनंत चतुर्दशीच्या दिवशी हा भयानक प्रसंग ओढवला. त्यानंतर महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून सुधीर जोशी सभागृहात उभे राहिले. मुख्यमंत्री शरद पवार होते. सुधीरभाऊंनी भूकंपप्रवण क्षेत्राचा नकाशा समोर ठेवून मुख्यमंत्री शरद पवार यांच्यावर हल्ला चढविला. हसत हसत भाऊ म्हणाले, “पाहिलंत? शरद पवार काय काय मॅनेज करू शकतात? या संपूर्ण भूकंपप्रवण क्षेत्रात बारामती नाही. म्हणजे भूकंपसुद्धा यांनी मॅनेज केला. काय किमया आहे… सुधीरभाऊंच्या या मिश्किल कोपरखळीमुळे संपूर्ण सभागृहात हास्याची कारंजी उसळली.
आमच्या साप्ताहिक ‘आहुति’च्या वर्धापनदिन विशेषांकाच्या प्रकाशन समारंभासाठी सुधीरभाऊ अंबरनाथ येथे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. पत्रकार नारायणराव हरळीकरसुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून भाऊंबरोबर होते आणि भाऊंचे ‘राम लक्ष्मण’ समान दोन सचिव, दिवाकर बोरकर आणि प्रवीण पंडितसुद्धा या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतून अंबरनाथ वगळण्यासाठी आम्ही नऊ वर्षे लढा दिला आणि त्या महापालिकेतून अंबरनाथ स्वतंत्र करण्यात आम्हाला यश मिळाले. परंतु मुंबईतील राणीच्या गळ्यातल्या हार असलेल्या क्वीन्स नेकलेसप्रमाणे अंबरनाथ येथे प्रभाकर नलावडे नगराध्यक्ष असताना ‘शिवदर्शन’ बंगला बांधण्यात आला होता. महानगरपालिकेतून अंबरनाथ जरी वेगळे केले असले तरी भारतीय प्रशासन सेवेच्या अधिकाऱ्यांनी शासन निर्णय काढताना अंबरनाथची मालमत्ता अंबरनाथ नगरपालिकेच्या ताब्यात देताना मखलाशी करीत ‘शिवदर्शन’ बंगला कल्याण महापालिकेच्याच ताब्यात ठेवला. हा मुद्दा सुधीरभाऊंच्या समोर उपस्थित केला तेव्हा सुधीरभाऊ शांत आणि मिश्कीलपणे म्हणाले, अहो त्रिवेदी, तुम्ही कशाला वाईट वाटून घेता? कल्याणचे आयुक्त अंबरनाथमध्ये ‘शिवदर्शन’ बंगल्यात राहून कल्याणचा कारभार हाकताहेत म्हणून का? अहो, दाऊद नाही का दुबईमध्ये राहून मुंबईत कारभार करतोय? मिश्कील पण वेगळाच संदेश सुधीरभाऊंनी आपल्या बोलण्यातून दिला होता. गृहिणी आपल्या घरात साखर, मीठ यांच्या डब्यांवर पट्टी लावून ठेवायच्या. पण मुंगीला थोडंच वाचता येतं की, मीठ कुठे लिहिलंय आणि साखर कोणत्या बरणीत आहे. ती वाचून थोडीच जाते. तिला बरोबर कळतं की कोणता जिन्नस कोणत्या बरणीत आहे. असे मिश्कीलपणे भाऊ बोलत असत.
१९९० साली शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीची सत्ता थोडक्यात हुकली. ती १९९५ साली मिळाली. डॉ. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि सुधीरभाऊंकडे महसूल खाते आले. एकदा त्यांच्याकडे एका प्रथितयश इंग्रजी वर्तमानपत्राचे मालक/भागीदार आले होते. योगायोगाने मी त्यांच्या दालनात बसलो होतो. त्या मालक/पार्टनर यांनी आपल्या सर्वाधिक खपाच्या इंग्रजी वर्तमानपत्रासाठी जागेची मागणी केली होती. भाऊंचा कडवट शिवसैनिक जागृत होताच. ती नस्ती (फाईल) डाव्या हाताने बाजूला करीत त्यांनी मिश्कीलपणे सवाल केला. अहो, ३५ वर्षे पूर्ण झाली शिवसेनेला. आज शिवसेना सत्तेत आहे आणि मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. एवढे असूनही शिवसेनेला तुमच्या वर्तमानपत्रात नऊ नंबरचे पान? आणि तिथेसुद्धा सिंगल कॉलम बातमी? पहिले पान आमच्या नशीबी नाही? काय बोलणार? त्या मालक/पार्टनरना माना खाली घालून बसण्याशिवाय गत्यंतर नव्हते. जे नियमानुसार असेल ते होईल. पण, माझा मुद्दा लक्षात आला काय? सुधीरभाऊ जोशी यांच्या बिनतोड सवालासमोर ते निरुत्तर झाले होते.
सुधीर जोशी यांची सांपत्तिक स्थिती मुळातच बऱ्यापैकी होती. त्यांच्या वडिलांचे नाव गजानन आणि त्यांच्या मामांच्या वडिलांचे नावही गजानन. मनोहर गजानन जोशी. मनोहर जोशी रायगड जिल्ह्यातील नांदवी येथून मुंबईत आले होते. ते गरीबीतून वर आलेले. मामा-भाचे दोघे समवयस्क. मनोहर जोशी यांची सख्खी मोठी बहिण सुधीरभाऊंची आई. ते सुरुवातीपासून दादर येथे राहत. मनोहर जोशी ग्रामीण भागातून दादर येथे आले. सुधीरभाऊंनी मनोहरपंतांना मोटार चालवायला शिकविली. मनोहर जोशी, सुधीर जोशी आणि प्रमोद नवलकर या त्रिमूर्तीने राजकीय क्षेत्रात अतीशय धमाल उडवून दिली असल्याच्या कहाण्या लोकं चवीने सांगतात. अनेक आमदारांना या त्रिमूर्तीने राजभवनावर ‘तुमची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे, उद्या सकाळी राजभवनावर शपथविधीला पोहोचा, असे निरोप दिले आहेत. मनोहर आणि सुधीर हे दोन जोशी समोर दिसले की समोरुन येणारे सहज बोलायचे, काय? आज दोन्ही जोशी एकत्र? तेव्हा नवलकर मिश्कीलपणे म्हणायचे की दोन जोशी आणि एक रामोशीपण आहे. आणि मग हास्याचा धबधबा उसळायचा.
तिघेही मिश्कील. आज सुधीरभाऊंच्या जाण्याने या त्रिमूर्तीमधील मनोहर जोशी एकाकी पडले. अर्थात मनोहर जोशी, सुधीर जोशी आणि प्रमोद नवलकर या तिघांनी मुंबई महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी फार मोठे योगदान दिले आहे. शिवसेनेच्या पहिल्या फळीतील एक बिनीचा शिलेदार सुधीरभाऊंच्या निधनाने आपण गमावला आहे. आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी सुधीरभाऊंनी विधान परिषदेत केलेल्या भाषणांचे निलेश मदाने यांच्या अधिपत्याखाली असलेल्या वि. स. पागे संशोधन केंद्रामार्फत उत्तम ग्रंथ निर्माण केले तर येणाऱ्या पिढीला संसदपटू सुधीर जोशी यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांचा पर्यायाने सुधीरभाऊंच्या राजकीय व्यक्तिमत्वाचा निश्चित परिचय होईल…