Homeमुंबई स्पेशलराणी बागेतून पळवलेला...

राणी बागेतून पळवलेला आरव सीएसएमटीला सापडला!

मुंबईच्या भायखळा पोलीसठाण्याच्या हद्दीत असलेल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच राणीच्या बागेतून पळवण्यात आलेला आरव, हा साडेसात वर्षांचा मुलगा काही तासांतच सीएसएमटी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, या रेल्वेस्थानकाजवळच्या परिसरात सापडल्याचे कळते.

आरव विनोद राणा नावाचा हा साडेसात वर्षांचा मुलगा आपले काका व चुलतबहिणीसह भायखळ्याच्या राणीच्या बागेत चार नोव्हेंबरला दुपारी फिरायला आला होता. डोंबिवलीच्या भगवान काठे नगर परिसरात हे कुटूंब राहते. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ते राणीच्या बागेत फिरावयास गेले. तेथे आरव त्याच्या चुलतबहिणीबरोबर खेळत होता. तेव्हा कोणीतरी व्यक्तीने त्याला फूस लावून तेथून पळवून नेले. त्याचे काका संदीपकुमार राणा यांना हे कळताच त्यांनी जवळच असलेल्या भायखळा पोलीसठाण्यात धाव घेतली. तेथे त्यांनी आपल्या पुतण्याचे अपहरण झाल्याचा गुन्हा नोंदवला.

गुन्हा दाखल होताच पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देवरे यांच्या पथकाने आरवचा तपास चालू केला. सर्व पोलीसठाण्यांना याबाबतची सूचना देण्यात आली. याच तपासात पोलिसांना आरव आझाद मैदान परिसरात एकटाच भांबावलेल्या अवस्थेत मिळून आला. संध्याकाळ होईपर्यंत आरव सापडल्यामुळे त्याच्या परिवाराने सुटकेचा निःश्वास टाकला. भायखळा पोलीसठाण्याशी संपर्क साधला असता तेथील उपस्थित अधिकाऱ्याने आरव फिरतफिरत सीएसएमटी परिसरात पोहोचल्याचे सांगितले. मात्र, जाणकारांच्या माहितीनुसार पळवणाऱ्या व्यक्तीने आरवला सीएसएमटी रेल्वेस्थानकाकडे नेले होते. परंतु, पोलीस शोध घेत असल्याचे लक्षात आल्यामुळे आरोपीने आरवला एकटेच सोडून पोबारा केला.

Continue reading

दहावीतल्या निधी पावसकरचाही दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात

संकटाच्या काळात मदतीचा हात पुढे करण्यासाठी वयाचे कोणतेही बंधन नसते, याचा आदर्श नुकताच मुंबईत पाहायला मिळाला. दहावीत शिकणाऱ्या निधी पावसकर या मुलीने आपल्या पिगी बँकेत साठवलेली १०,००० रुपयांची पुंजी मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ निधीसाठी नुकतीच सुपूर्द केली. 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी...

आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेत खालसा कॉलेज चमकले!

महाराष्ट्रातल्या रत्नागिरी येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेत माटुंगा येथील गुरु नानक खालसा महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत ७ सुवर्ण, ३ रौप्य आणि ३ कांस्य अशी एकूण १३ पदके पटकावली. या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर...

पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या उपस्थितीने रंगला ‘आशाताई आणि मी’!

मुंबईतल्या बोरीवली पश्चिम येथील स्वररंग प्रतिष्ठान, या संस्थेने आयोजित केलेला भावगंधर्व पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा 'आशाताई आणि मी' हा कार्यक्रम नुकताच प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर, बोरिवली येथे संपन्न झाला. यावेळी नव्वदीच्या घरात पोहोचलेले पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या उपस्थितीने रसिकांच्या तुडूंब...
Skip to content