आजची तरुण पिढी मोबाईलमध्ये मश्गुल आहे, ही खेदाची बाब आहे. तरुणांनो, मोबाईल बाजूला ठेवून जमिनीवर या आणि देशाचा विचार करा, अशा शब्दांत राष्ट्रपती शौर्य चक्राने सन्मानित मेजर मधुसूदन सुर्वे यांनी मोबाईलमध्ये गुंतून पडलेल्या युवक-युवतींची कानउघाडणी केली.
मुंबईत बोरीवलीच्या जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना डॉ. सुचिता पाटील यांनी मेजर मधुसूदन सुर्वे यांच्या चित्तथरारक अनुभवसंपन्न मुलाखतीने गुंफले. यावेळी ऑपरेशन विजय कारगिल यासह विविध ठिकाणी असंख्य दहशतवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या मेजर सुर्वे यांनी आपले चित्तथरारक अनुभव सांगितले. दोन्ही पाय गमवावे लागलेल्या मेजर सुर्वे यांनी आपल्या चार पिढ्या भारतीय लष्करात होत्या असे सांगत आपले चिरंजीव मंदार यांच्या रुपाने पाचवी पिढीसुद्धा लवकरच भारतीय लष्करी सेवेत रुजू होणार असल्याचे अभिमानाने सांगितले.

डॉ. पाटील यांनी ध्वनीचित्रमुद्रित केलेली छोटी डॉक्युमेंटरीसुद्धा यावेळी ओंकार देशमुख यांनी सादर केली. लवकरच मेजर सुर्वे यांच्या लष्करी सेवेतील चित्तथरारक घटनांवर आधारित पूर्ण लांबीचा चित्रपट २६ जानेवारी २०२५पर्यंत प्रदर्शित होणार असून रणविर सिंह मेजर मधुसूदन सुर्वे यांची तर आलिया भट्ट त्यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी राष्ट्रपती शौर्य चक्र प्रदान केल्यानंतर रात्रीच्या भोजनासाठी जेव्हा आमंत्रित केले तेव्हा आपली काय मनोभावना झाली हा प्रसंग मेजर सुर्वे यांनी कथन केला.
हे संपूर्ण प्रसंग ऐकताना मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या रसिक श्रोत्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. या कार्यक्रमात मेजर सुर्वे यांच्या हस्ते राकेश वायंगणकर यांना जय महाराष्ट्र नगर भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. म्हाडाचे माजी सभापती विनोद घोसाळकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल आव्हाड, सुविद्या प्रसारक मंडळाचे माजी पदाधिकारी महादेव रानडे आदी मान्यवर उपस्थित होते. सचिन वगळ यांनी मानपत्राचे वाचन केले. सूत्रसंचालन प्रा. नयना रेगे यांनी केले. विजय वैद्य यांनी व्याख्यानमालेचा आढावा घेतला.

