Homeएनसर्कलपाकला लोळवल्यानंतर बारामुल्लातही...

पाकला लोळवल्यानंतर बारामुल्लातही जल्लोष तर लाहोरमध्ये मातम!

दुबईत सुरू असलेल्या वन डे क्रिकेटच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून पाकिस्तान आणि बांगलादेशचा संघ बाद झाले असून त्यांना त्यांच्या देशात परतण्याशिवाय कोणताही पर्याय राहिला नाही. रविवारी भारताबरोबरचा सामना हरल्यानंतरच पाकच्या संघाने सामान बांधले होते. परंतु एक अंधूकशी आशा उराशी बाळगत पाक संघ दुबईत थांबला होता. काल रात्री बांगलादेश आणि न्यूझिलंड संघात सामना होणार होता. हा सामना बांगलादेश जिंकला तर.. पुढे कदाचित आपल्याला संधी मिळू शकेल, असे पाक संघाला वाटले होते. परंतु न्यूझिलंडने बांगलादेशच्या संघाला लोळवले आणि पाकिस्तान व बांगलादेश संघाला हात हलवत घरचा रस्ता धरावा लागला. दरम्यान, रविवारी भारताने पाकिस्तानच्या संघाला लोळवले त्या क्षणी जम्मू आणि काश्मीरमधल्या बारामुल्ला भागात फटाक्यांची आतषबाजी झाली तर पाकिस्तानमध्ये कराचीपासून लाहोरपर्यंत ठिकठिकाणी क्रिकेटप्रेमींनी घरातले टीव्ही फोडले.

विराट कोहलीच्या नाबाद शतकाने भारताने या सामन्यावर विजयाची मोहोर लावली आणि पाकिस्तानच्या अनेक भागात विराटच्या चाहत्यांनी जल्लोष केला. त्याचवेळी विविध माध्यमातून पाकिस्तानचे फॅन्स, पाकिस्तानच्या पंतप्रधानांना तसेच पाक क्रिकेट संघाला शिव्यांची लाखोली वाहत होते. रस्त्या-रस्त्यावर शिवीगाळ केली जात होती. पाकिस्तानचा संघ आता परतेल तेव्हा त्याचे सडलेले टोमॅटो आणि अंडी फेकून स्वागत करायला हवे अशी प्रतिक्रिया उमटत होती. पाकिस्तानात सध्या टोमॅटो दोन हजार रुपये किलो दराने विकले जातात हे लक्षात घेतले पाहिजे. पाकिस्तानचा संघ बॅटिंग, बॉलिंग आणि फील्डिंग या तिन्ही ठिकाणी कमकुवत ठरला. साधे कॅचही त्यांना पकडता येत नाही. 50 ओव्हरही पूर्ण खेळू शकत नाही. त्यातच पूर्ण संघ बाद होतो. अडीचशे धावांचा टप्पाही ओलांडता येत नाही. कर्णधार रिझवान, शाहिद हे खेळाडू दुबईत फक्त टीआरपी मिळवण्यासाठी आणि फोटो काढून घेण्यासाठी गेले होते, का असे सवाल पाकिस्तान क्रिकेटप्रेमींकडून केले जात होते.

सामना हरल्यानंतर पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार शोएब मलिक गाण्याच्या ओळी गुणगुणत होता… दिल के अरमान आसूँओ में बह गए.. तर अनेक माजी क्रिकेटपटूंनी पाकिस्तानच्या संघावर अत्यंत कडक शब्दांत टीका केली. रावलपिंडी एक्स्प्रेस म्हणून ओळखला जाणारा पाकिस्तानचा तेज गोलंदाज शोएब अख्तर म्हणाला की, पाकिस्तान संघ गेल्या दहा वर्षांपासून सतत हरतोय. यांना जिंकायचं हा शब्दच माहीत नाही. नुसतं गेलं आणि खेळलं म्हणून सामना जिंकता येत नाही. त्यासाठी टॅलेंट दाखवावे लागतात आणि टॅलेंट दाखवण्यासाठी कडी मेहनत करावी लागते. संघातून वगळण्यात आलेला खेळाडू अहमद शहजाद म्हणाला की, पाकिस्तान संघांमध्ये ज्या काही गोष्टी सध्या घडत आहेत त्याने माहोल फार खराब झाला आहे. यासाठी मोठ्या सर्जरीची गरज आहे. वसिम अक्रमनेही पाक संघावर टीकास्त्र डागले.

पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी ही ट्रॉफी पाकिस्तान जिंकणार अशी खात्री व्यक्त केली होती. पाकिस्तान जिंकला नाही तर मी नाव बदलून टाकीन, असे ते म्हणाले होते. तो धागा पकडत पाकिस्तानच्या माध्यमातून अनेक समीक्षकांनी, आता पंतप्रधान शरीफ कुठे गेले असा सवाल केला. त्यांनी नाव बदलले का, अशी विचारणाही ते करू लागले. सध्या जेलमध्ये असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान क्रिकेटमध्ये असतानाच पाकिस्तानने वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर कोणतीही जागतिक स्पर्धा पाकिस्तान क्रिकेट संघ जिंकू शकला नाही, याकडेही अनेकांनी लक्ष वेधले.

भारतीय संघ रविवारचा पाकविरूद्धचा सामना सामना म्हणूनच खेळले. पाकिस्तानच्या एका फलंदाजाच्या बुटाची लेस सुटली तेव्हा भारतीय खेळाडूने ती बांधताना प्रेक्षकांनी पाहिले. मात्र, पाकिस्तानचे काही खेळाडू जसं भारताविरुद्ध युद्धच लढतोय अशा आविर्भावात वावरत होते. शुभमन गिलला बाद केल्यानंतर पाकिस्तानचा गोलंदाज अबरार अहमद याच्या चेहऱ्यावरचे भाव बघितल्यानंतर पाकिस्तानी संघ हरल्यानंतर रविवारची रात्र पाक क्रिकेटप्रेमींनी कशी काढली असेल याची कल्पनाच केलेली बरी…

बारामुल्ला

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content