Friday, February 21, 2025
Homeचिट चॅटजामनेरच्या आंतरराष्ट्रीय कुस्तीत...

जामनेरच्या आंतरराष्ट्रीय कुस्तीत भारतीय पैलवानच भारी!

कुस्तीप्रेमींच्या जनसागरासमोर लाल मातीत झालेल्या संघर्षात भारतीय पैलवानच भारी ठरले. नमो कुस्ती महाकुंभ २ अंतर्गत देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महिला महाराष्ट्र केसरी अमृता पुजारी आणि ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीसह सर्वच भारतीय पैलवानांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील परदेशी पैलवानांना धूळ चारत आपले वर्चस्व दाखवून दिले.

देवाभाऊ केसरीच्या निमित्ताने रविवारी आयोजित आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी विजेत्यांनी जगभरातील 9 देशांमधून आलेल्या नामवंत पैलवानांना पराभूत करत कुस्तीच्या मैदानी परंपरेचा अभिमान वाढवला. कुस्तीत महिलाना समान सन्मान देताना या मैदानातील पहिली आणि शेवटची कुस्ती महिलांची लावण्यात आली. आपल्या तालुक्यात कुस्तीच्या मैदानात लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय पैलवान येणार असल्यामुळे पन्नास हजारांपेक्षा अधिक कुस्तीप्रेमींचा जनसागर पसरला होता. महाराष्ट्र केसरी विजेत्या अमृता पुजारीने रोमानियाच्या ऑलिम्पियन कॅटालिना क्सेन्टने हिच्यावर वर्चस्व गाजवत विजय मिळविला. शेवटच्या कुस्तीमध्ये अमृताने उत्कृष्ट डावपेच आणि चपळाईने गुण मिळवत आपला पराक्रम सिद्ध केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते विश्वविजेता व ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांची कुस्तीला सलामी देण्यात आली. सर्व विजेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मानाची गदा देऊन गौरविण्यात आले.

जामनेर नगरीत झालेल्या या दंगलीत विजय चौधरी ने दबदबा दाखवताना आशियाई विजेता उझबेकिस्तानच्या सुक्सरोब जॉनला केवळ दोन मिनिटांत चीतपट करत प्रेक्षकांची मने जिंकली. पहिली महिला महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बांगडीने फ्रान्सच्या वर्ल्ड चॅम्पियन अंजलीक गोन्झालेझ हिच्यावर सहज विजय मिळवला. तिच्या अचूक चालींमुळे तिने विरोधकाला गुण मिळवण्याची संधी दिली नाही. तसेच, महाराष्ट्र केसरी विजेती सोनाली मंडलिक हिने एस्टोनियाच्या मार्टा पाजूला हिला पराभूत करून प्रथम गुण घेत प्रभावी विजय मिळवला. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखने युरोपियन चॅम्पियन मोल्दोवाच्या घेओघे एरहाणला चितपट करत आपली ताकद सिद्ध केली. तसेच, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलने जॉर्जियाच्या वर्ल्ड चॅम्पियन इमामुकवर विजय मिळवत भारतीय कुस्तीतील स्वतःचे स्थान भक्कम केले. उप-महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाडने रोमानियाच्या युरोपियन चॅम्पियन फ्लोरिन ट्रिपोन याला पराभूत करत उत्कृष्ट कामगिरी बजावली. डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने वर्ल्ड चॅम्पियन गुलहिरमो लिमाला सहज चितपट केले. त्याच्या कुस्तीतील सफाईदार खेळाने उपस्थित प्रेक्षक भारावून गेले. महाराष्ट्र चॅम्पियन बाळू बोडके आणि मुन्ना झुंजुर्के यांनी अनुक्रमे हरियाणाच्या राष्ट्रीय विजेत्या मनजीत मेला व दिल्लीच्या हरिओमी ट्रॅक्टर यांना पराभूत करून आपली ताकद दाखवली. महाराष्ट्राचा राष्ट्रीय विजेता शिवा चव्हाण आणि हरियाणाच्या त्रिमूर्ती केसरी रजत मंडोथी यांची कुस्ती अत्यंत चुरशीची ठरली आणि अखेरीस बरोबरीत सोडवण्यात आली. पंजाबच्या भारत केसरी भूपिंदर सिंह याने हरियाणाच्या राष्ट्रीय विजेता युधिष्ठिर दिल्ली याला चितपट करत प्रभावी विजय नोंदवला. महाराष्ट्राचा भवानी केसरी वेताळ शेळके याने दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विजेता जॉन्टी गुज्जर याचा पराभव करून प्रेक्षणीय विजय मिळवला. तसेच, महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरने इराणच्या एशिया मेडालिस्ट जलाल म्हजोयूब याला चितपट करत जबरदस्त कौशल्य दाखवले.

या सर्व कुस्त्यासाठी पंच आणि संयोजक म्हणून हिंदकेसरी रोहित पटेल यांनी काम पाहिले. शेवटच्या ३ कुस्त्यांसाठी पंच म्हणून मंत्री गिरीश महाजन यांनी काम पाहिले. ९ देशांच्या या स्पर्धेत भारत, फ्रान्स, मोल्दोवा, उझबेकिस्तान, रोमानिया, एस्टोनिया, इराण, ब्राझील आणि जॉर्जिया या देशाचे खेळाडू सहभागी झाले होते. राजू आवळे, कोल्हापूर यांच्या हलगीच्या आवाजाने मैदान दुमदुमले होते.

कुस्तीत महाराष्ट्राचा दबदबा – मुख्यमंत्री

“जागतिक पटलावर महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपली छाप पाडली आहे, ही अभिमानास्पद बाब आहे,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. त्यांनी ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ व एशियन गेम्समध्ये भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले. “मागील काही काळात मॅटवरील कुस्तीला अधिक प्राधान्य मिळाले होते, मात्र आता मातीवरील कुस्तीने दमदार पुनरागमन केले आहे. कुस्तीच्या माध्यमातून भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव होते. आज विजय चौधरी, सोनाली मंडलिक यांसारखे खेळाडू परदेशी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत आहेत,” असे त्यांनी सांगितले. या स्पर्धेत नऊ देशांतील आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू सहभागी झाल्याने ती अधिक रोमांचक ठरली. तसेच, “गिरीश महाजन यांनी विद्यापीठ स्तरावर कुस्तीमध्ये चांगली कामगिरी केली होती. आज राजकारणातही त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना चित केले आहे!” असे मिश्कील टिप्पणी करत त्यांनी गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

सलग ११ तास चाललेल्या या कुस्तीदंगलमध्ये आयोजन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे, खासदार स्मिताताई वाघ, आ. अनिल पाटील, आमदार सुरेश भोळे (राजूमामा), मंगेश चव्हाण, संजय कुटे, चंद्रकांत सोनवणे, चंद्रकांत पाटील, अमोल पाटील, अमोल जावळे, अनुपभैय्या अग्रवाल, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह कुस्तीगीर संघटनेचे रामदास तडस, जामनेरच्या माजी नगराध्यक्ष साधनाताई महाजन, कुस्तीगीर संघटनेचे पदाधिकारी, विविध देशांतून आलेले कुस्तीपटू आणि ५० हजारांपेक्षा अधिक कुस्तीप्रेमींनी उपस्थिती लावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

भारतीयांना अमेरिकेत दुसऱ्या कुणालातरी निवडून आणायचे होते!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडेन कार्यकाळात भारतातील मतदान प्रक्रियेसाठी अमेरिकेने दिलेल्या 21 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या निधीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. फ्लोरिडातील मियामी येथे झालेल्या एफआयआय प्रायोरिटी शिखर परिषदेला संबोधित करताना ट्रम्प यांनी अमेरिकन निवडणुकांमध्ये परकीय हस्तक्षेपाबद्दल चिंता...

असे ओळखा तोतया विमा एजंट!

विम्यातील फसवणुकीचे प्रमाण वाढत चालले आहे आणि घोटाळेबाज अधिकाधिक चलाख होत चालले आहेत. तुम्ही जर बनावट विमा एजंटचे शिकार झालात, तर जेव्हा तुम्हाला विम्याची निकड असेल तेव्हा तुम्हाला त्याचे कव्हरेज मिळणार नाही. विमा फसवणुकीच्या वाढत्या प्रमाणाचे गांभीर्य लक्षात घेऊन इन्शुरन्सदेखो, या...

चुनाभट्टीत २३ फेब्रुवारीपासून रंगणार हिंदुहृदयसम्राट चषक कबड्डी स्पर्धा

मुंबईतल्या चुनाभट्टीत येत्या २३ ते २६ फेब्रुवारीदरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभाग क्रमांक ६ शाखा क्रमांक १७०, १७१ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि दत्तात्रय संघ, चुनाभट्टी यांच्यावतीने हिंदुहृदयसम्राट चषकासाठी प्रथम श्रेणी पुरुष गट आणि महिला गटाच्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे‌ आयोजन...
Skip to content