Monday, December 23, 2024
Homeटॉप स्टोरीमहाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीला...

महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीला घरघर?

पाच वर्षांच्या कारभाराचे आश्वासन देणाऱ्या राज्यातल्या सत्ताधारी महाविकास आघाडीला अवघ्या दीड वर्षात घरघर लागण्यास सुरूवात झाली आहे. सत्तेतला तिसरा पक्ष म्हणून कायम हिणवला जात असलेल्या काँग्रेसने राहुल गांधींच्या वाढदिवसाचे औचित्य साधत स्वबळाचा नारा दिला तर त्यापाठोपाठ आज केंद्र सरकारच्या विविध तपासयंत्रणांच्या कारवाईमुळे बेजार झालेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भारतीय जनता पार्टीशी जुळवून घेण्याची विनंती केली आहे.

ज्या दिवशी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आपला २२वा वर्धापनदिन साजरा करत होते, पक्षाध्यक्ष शरद पवार, शिवसेना कसा निष्ठावान पक्ष आहे, याचे तोंड भरून कौतुक करत होते, नेमके त्याचदिवशी म्हणजे १० जूनला प्रताप सरनाईक यांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले असल्याचे समजते.

या पत्रामध्ये सरनाईक यांनी मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. सध्याच्या परिस्थितीत जे राजकारण सुरू आहे, त्यात सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी आपलेच कार्यकर्ते फोडत असतील, आपला पक्ष कमकुवत करत असतील, तर पुन्हा एकदा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे, असे माझे वैयक्तिक मत आहे. निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल, अशी विनंती सरनाईक यांनी या पत्रात केली आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांबद्दल तक्रार

सरनाईक यांनी या पत्रात केंद्रीय तपास यंत्रणांबद्दल तक्रारही केली आहे. कोणताही गुन्हा किंवा चूक नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला नाहक त्रास सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा दलाल व शिवसेनेमुळे माजी खासदार झालेल्या नेत्याकडून जी बदनामी सुरू आहे, त्यालाही यामुळे कुठेतरी आळा बसेल. आम्हाला टार्गेट करत असताना आमच्या कुटुंबियांवरही सतत आघात होत आहेत. खोटे आरोप होत आहेत. एका केसमधून जामीन मिळाला, की दुसऱ्या केसमध्ये जाणीवपूर्वक गुंतवणे असे प्रकार होत आहेत. आपल्या एका निर्णयामुळे हे सारे थांबेल, असे त्यांनी म्हटले आहे.

नेत्यांचे वैयक्तिक संबंध चांगले

प्रताप सरनाईक यांनी या पत्रामध्ये युती तुटल्यानंतरही शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांचे संबंध चांगले असल्याचे नमूद केले आहे. पुढील वर्षी मुंबई, ठाणे आणि अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. राज्यात आपली युती तुटल्यानंतरही नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. तो तुटण्याआधी जुळवून घेतले तर बरे होईल. त्याचा फायदा आमच्यासारख्या काही कार्यकर्त्यांना आणि शिवसेनेला भविष्यात होईल, असेही ते या पत्रात म्हणातात.

काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे करण्यासाठी आघाडी?

काँग्रेस राष्ट्रवादीला मोठे करण्यासाठी आपण आघाडी केली का? असा सवालही त्यांनी पक्षप्रमुखांना विचारला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीमुळेच शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, असे त्या पक्षांच्या लोकांना वाटत आहे. काँग्रेसने स्वबळाची भूमिका घेतली आहे तर राष्ट्रवादी शिवसेनेचे नेते-कार्यकर्ते फोडत असल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीतले काही मंत्री, नेते केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा पाठिशी लागू नये, म्हणून केंद्रातील सत्ताधारी पक्षासोबत छुपी हातमिळवणी करत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे लगेच होतात, पण आपला मुख्यमंत्री असूनही शिवसेनेच्या आमदारांची कामे होत नाहीत, अशी तक्रारही प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

एकीकडे आपण राजकारण बाजूला ठेऊन फक्त आणि फक्त आपल्या मुख्यमंत्रीपदाला प्रामाणिकपणे न्याय देत आहात तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, असे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांना वाटत आहे. महाविकास आघाडीतील काही मंत्री व सनदी अधिकारी केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा आपल्या पाठीमागे लागू नये म्हणून केंद्रातील सत्ताधारी पक्षाशी छुपी हातमिळवणी करीत आहेत, हेही आपल्या निदर्शनास आणून देत आहे, असेही ते या पत्रात म्हणतात.

आमचा तुमच्या नेतृत्त्वावर अढळ विश्वास आहे. कोरोना काळात आपण प्रचंड मेहनत घेऊन, कुटुंबप्रमुख म्हणून महाराष्ट्राचा संभाळ केला आहे. त्याबद्दल आपले कौतुक करावे तितके कमी आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसविणार हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना दिलेला शब्द व त्यांना दिलेले वचन पूर्ण झाले आहे. आपण या पदाला न्याय दिला आहे व देत आहात. पण या परिस्थितीत जे राजकारण सुरू आहे, सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी आपलेच कार्यकर्ते फोडत असतील, आपला पक्ष कमकुवत करत असतील तर या स्थितीत पुन्हा एकदा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे, असे माझे वैयक्तिक मत आहे, असेही सरनाईक यांनी या पत्रात म्हटले आहे.

Continue reading

कर्तबगार अधिकाऱ्याची सत्यकथा ‘आता थांबायचं नाय’!

बृहन्मुंबई महानगरपालिका, आशियामधील सर्वात श्रीमंत समजली जाणारी भारतातील मानाची महानगरपालिका, याच महापालिकेच्या सहकार्याने आणि प्रेरणेने तयार होत आहे, 'झी स्टुडिओज'चा आगामी मराठी चित्रपट, 'आता थांबायचं नाय'! 'झी स्टुडिओज', 'चॉक अँड चीज' आणि 'फिल्म जॅझ' प्रॉडक्शनची एकत्र निर्मिती असलेल्या 'आता थांबायचं...

परभणीतील सूर्यवंशी मृत्यूप्रकरणीही न्यायालयीन चौकशी

परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. संविधानाच्या प्रतिकृतीच्या कथित विटंबनेवरून परभणीमध्ये १० डिसेंबरला हिंसाचार उसळला होता आणि त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू ओढवला होता. विधानसभेत या विषयावर गेले दोन...

सन्मित्र क्रीडा मंडळ अजिंक्य

मुंबईत कांदिवली येथे झालेल्या मुंबई उपनगर कबड्डी संघटनेच्या ४२व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पूर्व विभागाच्या द्वितीय श्रेणी पुरुष गटात सन्मित्र क्रीडा मंडळ, घाटकोपरने जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत सन्मित्रने साई स्पोर्ट्स क्लब, भांडूप यांच्यावर ७ गुणांनी विजय मिळवला. सन्मित्र...
Skip to content