राज्य विधान परिषदेवर राज्यपालांकडून नियुक्त करण्यात येणाऱ्या यादीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे मान्य केले. त्यामुळेच गेल्या नऊ महिन्यांपासून राज्यपालांकडून ही यादी मंजूर होऊ शकली नाही, असेही यामुळे स्पष्ट झाले आहे.
राज्यात विधान परिषदेवर राज्यपालनियुक्त १२ सदस्यांची नेमणूक करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत १२ नावांची शिफारस करण्यास मान्यता देण्यात आली होती. यामध्ये एकनाथ खडसे, सचिन सावंत, उर्मिला मातोंडकर, राजू शेट्टी आदींच्या नावाचा समावेश होता. राज्य सरकारकडून या १२ नावांची शिफारस राज्यपालांकडे करण्यात आली.
या शिफारशींना साधारण नऊ महिने उलटून गेले. मात्र, राज्यपालांनी या यादीला मान्यता दिली नाही. त्यावर काही जण उच्च न्यायालयातही गेले. न्यायालयानेही राज्यपालांनी लवकरात लवकर नेमणुका करायला हव्यात, असे सुचविले. मात्र, त्यांनी, त्या कधी कराव्यात हा त्यांचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे राज्य सरकारचे राज्यपाल कोश्यारी यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते. परवाच मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राजभवनावर राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना पवार यांनी राज्यपालांना आम्ही या १२ नावांना मान्यता द्यावी अशी विनंती केल्याचे सांगितले.

आज अजितदादांनी या १२ नावांच्या मान्यतेबद्दल भाष्य केले. जी व्यक्ती विधानसभा निवडणुकीत पराभूत झाली असेल तिला राज्यपालनियुक्त सदस्य करता येत नाही, अशी माहिती आता पुढे आली आहे. या माहितीत काही तथ्य आहे का, याची पडताळणी चालू आहे. त्यात तथ्य असेल तर १२ नावांच्या यादीवर नव्याने विचार करावा लागेल, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे सहयोगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नावाचा या यादीत समावेश आहे आणि ते निवडणुकीत पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाला राज्यपालांनी आक्षेप घेतल्याचे अप्रत्यक्षपणे उघड झाले. परिणामी राष्ट्रवादीला आता राजू शेट्टी यांच्या नावाऐवजी नवे नाव द्यावे लागेल व तसा यादीत बदल करणारा ठराव मंत्रिमंडळापुढे मंजूर करून तो राज्यपालांना पाठवावा लागेल. त्यानंतर कदाचित राज्यपाल सरकारने पाठविलेल्या यादीला मान्यता देतील.
दरम्यान, पवार यांच्या या वक्तव्यावर राजू शेट्टी यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्हाला विधान परिषदेची जागा देऊन सरकार आमच्यावर कोणती मेहेरबानी करत नाही. लोकसभा निवडणुकीआधीच लोकसभेची सांगलीची जागा आम्हाला देण्यात येणार होती. मात्र, ऐनवेळी ती नाकारण्यात आली. त्याच्या मोबदल्यात आम्हाला विधान परिषदेची जागा देण्यात येत आहे, असे ते म्हणाले.

