Homeटॉप स्टोरीरोहित पवारांनी एमआयडीसीसाठी...

रोहित पवारांनी एमआयडीसीसाठी आंदोलन केलेली जमीन निरव मोदीची?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातले आमदार रोहित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी भर पावसात विधानसभेच्या प्रांगणात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली ज्या जमिनीवर एमआयडीसी मंजूर करावी म्हणून आंदोलन केले होते, ती जमीन कोट्यवधी रुपयांचा घपला करून लंडनमध्ये पळालेल्या निरव मोदीची असल्याची शंका असून शासनाने याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आज सकाळी विधान परिषदेमध्ये एका अल्पकालीन चर्चेत भारतीय जनता पार्टीचे सदस्य आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी ही जागा निरव मोदीची असल्याचा गौप्यस्फोट केला. कर्जत-जामखेडमधल्या कर्जत भागात एमआयडीसी केली जावी याबद्दल कोणाचेच दुमत नाही. येथील बेरोजगाराला काम मिळाले पाहिजे याबद्दल कोणाचेच दुमत नाही. मात्र या जागेवर, याच ठिकाणी एमआयडीसी व्हावी असा आग्रह काहीजण का करतात, असा सवाल त्यांनी केला. येथील जमिनींचे मालक असलेल्या शेतकऱ्यांची नावे निरव दीपक मोदी, मनीषा कासोले, नयन अग्रवाल, कमलेश शाह, पंकज विनोद खन्ना, गणेश अग्रवाल आदी असून आपण येथील बेरोजगारांना काम मिळावे यासाठी एमआयडीसी करत आहोत की येथील उद्योजक आणि इन्वेस्टर यांच्या कल्याणासाठी एमआयडीसी करत आहोत, असा सवालही राम शिंदे यांनी केला.

एमआयडीसी

काहीजण समाज माध्यमांतून कर्जत एमआयडीसीसाठी जिंदाल, एशियन पेंट्स, अदानी आदी कंपन्यांबरोबर चर्चा झाल्याचे म्हणणे प्रसारित करत आहेत. ही मंडळी जर कर्ज मध्ये भविष्यात होणाऱ्या एमआयडीसीमध्ये यायला तयार आहेत तर मग त्यांना जामखेडचा रस्ता सापडला नव्हता का असा सवालही त्यांनी केला. जामखेडमध्ये एमआयडीसी होऊन 25 वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला. परंतु आजपर्यंत तेथे एकही उद्योग आलेला नाही, याकडेही शिंदे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या चर्चेला सविस्तर उत्तर दिले. 1986मध्ये जामखेडमध्ये एमआयडीसी उभारण्यात आली. मात्र अजूनही तेथे उद्योग आलेले नाहीत. याठिकाणी उद्योग कसे येतील यादृष्टीने प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. कर्जत एमआयडीसीसाठी 27 एप्रिल 2016 ला पहिली बैठक झाली. त्यानंतर स्थळपाहणी झाली. भूनिवड समितीनेसुद्धा सकारात्मकता दाखवली. 16 जानेवारी 18 ला तत्कालीन मृद् व जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी पत्र दिले. कर्जत, पाटेगाव, खंडाळा या भागाची भूनिवड समितीने पाहणी केली. मात्र जर येथील जमिनीचे मालक निरव मोदी आणि अग्रवाल असे असणार असतील तर हे सगळे  धक्कादायक आहे. त्यामुळे ही जागा नेमकी कोणाची आहे? हे निरव मोदी कोण आहेत?  लंडनला पळालेले निरव मोदी आहेत का, या सर्वांची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. या जागेला जलसंपदा विभागाने पाणीपुरवठा करण्याबाबत ठोस निर्णय घेतलेला नाही. याच भागात माळढोक पक्षी अभयारण्य तसेच त्याची बफर जागाही आहे. ही जागा वगळता वन्यजीव संरक्षणाचा कायदा लक्षात घेऊन उरलेली जमीन सलग आहे का, याचीसुद्धा तपासणी होणे गरजेचे आहे. या साऱ्याचा विचार करून त्यानंतरच येथील एमआयडीसीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही उद्योग मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.

एमआयडीसी

चर्चेत भाग घेताना सत्यजित तांबे म्हणाले की, अहमदनगरमध्ये एमआयडीसीने दोन हजार हेक्टर जागा ताब्यात घेतली आहे. त्यावर 45 मोठे उद्योग आणि 3752 इतर उद्योग आहेत. मात्र यामुळे फक्त 80 हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. आपण एमआयडीसी करतो. परंतु तिथे उद्योग यायला तयार होत नाहीत. मग अशा एमआयडीसी करण्यात काय साध्य होणार आहे? राहुरी येथे पंचवीस वर्षांपूर्वी एमआयडीसी झाली अजून तेथे पाणी दिलेले नाही. त्यामुळे सरकार आधी उद्योग आणि मग एमआयडीसी असे धोरण स्वीकारणार का?

सचिन अहिर यांनीही या चर्चेत भाग घेतला. तळोजा एमआयडीसीमध्ये पाण्याअभावी एक वर्ष तेथे उत्पादन होत नाही. पैठण एमआयडीसी ही एक फाईव्ह स्टार एमआयडीसी आहे. आपण स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव शेतकऱ्यांना जास्त पैसे देऊन जमिनी घेतो, त्यावर विकासदर लागतो. हे सर्व करून ज्या किमतीत आपण जमीन देतो ही जमीन घ्यायला कोणी उद्योजक तयार होत नाही. त्यामुळे आपण उद्योगांना आकर्षित करण्यासाठी एक निश्चित असे धोरण तयार करून मगच एमआयडीसी तयार करावी असे ते म्हणाले. शशिकांत शिंदे यांनी कर्जत एमआयडीसीची फाईल मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात असल्याचे सांगत त्यावर कधी सही होणार, असा सवाल केला.

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कर्जतमध्ये एमआयडीसी उभी करण्यासाठी कोणाचा नकार नाही, मात्र ही जमीन कोणाची आहे हे स्पष्ट होणे गरजेचे आहे असे नमूद केले. गेल्या काही दिवसांपूर्वी सरकारने एक धोरण हाती घेतले आहे. कोणीही शेतकरी ज्याची 100 हेक्टर व त्यापेक्षा जास्त जमीन आहे, ते कोणत्याही दलालाशिवाय मध्यस्थाशिवाय एमआयडीसीला जमीन विकू शकतात. मात्र या जमिनीवर खड्डे, डोंगर असता कामा नये. ही जागा इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये असता कामा नये. तसेच ती सलग असावी, असे निकष ठरवण्यात आले आहेत. या निकषांमध्येही कर्जत येथील एमआयडीसीची प्रस्तावित जागा बसते की नाही, हे पाहावे लागेल असेही उद्योगमंत्र्यांनी स्पष्ट केले.

या चर्चेत पुन्हा सहभागी होताना राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड हा परिसर दुष्काळी अवर्षणग्रस्त असल्यामुळे येथे एमआयडीसी हवी याची जोरदार मागणी केली. मात्र या जमिनीची जागा अमुकच हवी असा आपला आग्रह राहणार नाही, असेही ते म्हणाले. यासाठी विधानभवनाच्या आवारात उपोषणाला बसलेल्या उच्च घराण्याचे सदस्य असलेल्या लोकप्रतिनिधींनी मला तसेच मंत्री व सरकारला विधिमंडळाच्या आवारातच धमकी दिली असल्यामुळे या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे, असेही ते म्हणाले.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content