कोरोना संकटात बेरोजगारी आणि आर्थिक बाजू अस्थिर झाल्याने सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. अशा परिस्थितीत शाळा, कॉलेज आभासी शिक्षणाच्या नावाखाली पालकांकडून शंभर टक्के शिक्षणशुल्क, फी वसुली करत आहेत. ही जाचक फी वसुली 50 टक्के कमी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई प्रदेश अध्यक्ष ऍड. अमोल मातेले यांच्या नेतृत्त्वाखाली लावून धरली आहे.
याप्रश्नी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची त्यांनी नुकतीच भेट घेतली. या भेटीत राज्य सरकारने शाळा, कॉलेज, अगदी केजी to पीजी स्तरावर शिक्षण शुल्क 50 टक्के कमी करावे, कोरोना संकटात पालकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करावा, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली. जयंत पाटील यांनी याप्रश्नी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून शाळा, कॉलेजचे शिक्षण शुल्क 50 टक्के कमी करण्याचे आश्वासन दिले आहे.
याप्रश्नी तोडगा न निघाल्यास मंत्रालयासमोर सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे अमोल मातेले यांनी दिला. जर हा प्रश्न सुटला नाहीतर मीदेखील आपल्यासोबत आंदोलनात उतरेन, असा शब्द जयंत पाटील यांनी दिला असल्याचे मातेले यांनी सांगितले.