मुंबईला हादरवून सोडणाऱ्या १९९३ सालच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातले गुन्हेगार सरदार शाह वली खान तसेच कुविख्यात दाऊद याचा हस्तक सलीम पटेल यांच्याकडून राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी २० लाख रूपयांच्या कवडीमोल दराने मुंबईत तब्बल तीन कोटी रूपयांची तीन एकर जमीन खरेदी केली, असा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला. फडणवीस या सर्व प्रकरणांची कागदपत्रे योग्य अशा तपासयंत्रणेकडे सोपविणार असल्यामुळे आता अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) याची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे.
या मंत्र्यांनी केलेल्या या व्यवहारासह इतर चार व्यवहारांचा तपशीलही आपल्याकडे पुराव्यांनिशी आहे आणि हे सारे पुरावे आपण योग्य अशा तपासयंत्रणांकडे चौकशीकरीता सोपविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या तपासयंत्रणा पोलीस, सीबीआय, ईडी, अशा कोणत्याही असू शकतात, असे ते म्हणाले. आपल्या पक्षाचे मंत्री काय उद्योग करतात याची माहिती होण्यासाठी तसेच त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्यासाठी आपण याच कागदपत्रांचा एक संच नवाब मलिक ज्या पक्षाचे आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडेही सोपविणार आहोत, असे त्यांनी जाहीर केले.
सरदार शाह वली खान हा १९९३ सालच्या मुंबई बॉम्बस्फोटातला गुन्हेगार असून त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. सर्वोच्च न्यायालयानेही ही शिक्षा कायम केली असून सध्या तो तुरूंगात आहे. टायगर मेमनच्या नेतृत्त्वात तो फायरआर्म ट्रेनिंगमध्ये सहभागी झाला होता. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि मुंबई महापालिकेच्या इमारतीत कुठे बॉम्ब ठेवायचा याची पाहणी त्याने केली होती. टायगर मेमनच्या घरी शिजलेल्या कटात तो सहभागी होता. माहिमच्या अल हुसैनी बिल्डिंगमधल्या मेमनच्या घरी गाड्यांमध्ये आरडीएक्स भरण्याचे काम खान याने केले होते. माफीच्या साक्षीदारांनी तसेच इतर गुन्हेगारांनी दिलेल्या प्रत्यक्षदर्शी पुराव्याच्या आधारे त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली, असेही फडणवीस यांनी सांगितले.
मोहम्मद सलीम इशाक पटेल उर्फ सलीम पटेल, हा दाऊद इब्राहीमची बहीण हसीना पारकरचा सहकारी आणि फ्रंटमन म्हणून ओळखला जातो. २००७ साली तिच्यासोबतच याला पोलिसांनी पकडले होते. त्याला समोर करून हसीना संपत्ती बळकावण्याचे काम करायची, असेही ते म्हणाले.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर तसेच आमदार आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. ही सलीम जावेदची स्टोरी नाही तर भीषण वास्तव आहे, असे म्हणत फडणवीस यांनी नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला. सॉलीडस इन्व्हेस्टमेंट ही नवाब मलिक यांची कंपनी असून त्याद्वारे त्यांनी ही मालमत्ता खरेदी केली असेही ते म्हणाले.
राज्यातल्या याच महाविकास आघाडी सरकारवर पोलिसांच्या बदल्यांमध्ये कोट्यवधी रूपये उकळले गेल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता. तेव्हा राज्य सीआयडीच्या प्रमुख रश्मी शुक्ला यांनी काही अधिकाऱ्यांचे फोन टॅप करून हा सारा प्रकार उघडकीस आणला होता. तसा अहवालही त्यांनी सरकारला, खास करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला होता. परंतु सरकारने काहीही केले नाही. त्यामुळे आपण ही सारी संबंधित कागदपत्रे सीबीआयकडे तापासासाठी सोपवत आहोत, असे सांगत फडणवीस यांनी सीबीआयकडे हे प्रकरण सोपवले आणि सीबीआय त्याचा तपासही करत आहे.
राज्य सरकारनेही याप्रकरणी फडणवीस यांना शह देण्यासाठी रश्मी शुक्ला यांनी नियमबाह्य पद्धतीने आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप करत पोलिसांकरवी शुक्ला यांची चौकशी चालवली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सीबीआय तसेच ईडीने राज्यात धाडसत्र चालवले असून माजी गृहमंत्री अनिल देशमुख, आमदार प्रताप सरनाईक, खासदार भावना गवळी यांची चौकशी केली जात आहे. आयकर विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सुमारे एक हजार कोटींची बेनामी संपत्ती ताब्यात घेतल्याची चर्चाही सध्या सुरू आहे. फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या जमीनखरेदीची प्रकरणे योग्य त्या तपासयंत्रणेकडे सोपविण्याचे जाहीर केल्याने आता मलिक यांच्यामागेही सीबीआय, ईडीचा ससेमिरा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

