Thursday, November 21, 2024
Homeमाय व्हॉईस‘देवाचा न्याय.. ते...

‘देवाचा न्याय.. ते बदला पुरा..’ एक राजकीय बनाव?

बदलापूरमध्ये दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा संशयित आरोपी अक्षय शिंदे पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत मारला गेला आणि महाराष्ट्रातल्या राजकारणात एकच खळबळ उडाली. येत्या दोन महिन्यांत राज्यात विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे मिळेल ते निमित्त घेऊन विरोधी पक्षांचे नेते सरकारवर तुटून पडले नाहीत तरच नवल. याच लैंगिक अत्याचाराची घटना जेव्हा उघड झाली तेव्हा बदलापूरच्या रहिवाशांनी दिवसभर रेल्वे रोखून धरली होती. याच लोकांच्याआडून विरोधकांनी सरकारची गेमचेंजर ठरणारी लाडकी बहीण योजना निष्प्रभ ठरवण्याचा प्रयत्नही केला. शरद पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार अशा अनेक नेत्यांनी लाडक्या बहिणीऐवजी महाराष्ट्रात बहिणी सुरक्षित कशा राहतील, हे सांगण्याचा आटापिटा केला. तशा आशयाचे बॅनरही तयार करून बदलापूरमध्ये निदर्शकांच्या माध्यमातून प्रसिद्धीमाध्यमांपुढे आणले गेले. त्याचवेळी पोलिसांनी संशयित आरोपी अक्षय शिंदेला अटक केली होती. मात्र, बदलापूरमधले प्रक्षुब्ध लोक अक्षयला ताब्यात देण्याची आणि त्याला तत्काळ फाशी देण्याची मागणी करत होते. जनतेच्या भावना चिथावण्याचे काम हेच विरोधी पक्षांचे नेते करत होते. आणि आता हा आरोपी पोलीस चकमकीत मारला गेल्यानंतर हेच नेते आरोपीच्या बाजूने हळहळ व्यक्त करत गळे काढत आहेत, हे दुर्दैव म्हटले पाहिजे.

पोलीस चकमकींचा इतिहास पाहिला तर जम्मू-काश्मीरमध्ये सध्या होत असलेल्या अतिरेक्यांबरोबरच्या चकमकी वगळल्या तर बहुतांशी चकमकी बोगसच असतात. परंतु पोलीस त्या चकमकी खऱ्या असल्याचा परिस्थितीजन्य पुरावा तयार करण्यात यशस्वी ठरतात आणि चौकशीत सुटतातही. मुंबईत संघटित गुन्हेगारी बोकाळली होती तेव्हा ८० आणि ९०च्या दशकातही अनेक पोलीस चकमकी मुंबईकरांनी अनुभवल्या आहेत. काही ठराविक पोलीस अधिकारी चकमकफेम म्हणून ओळखलेही गेले. काहींवर चित्रपटही काढले गेले आणि काही जनतेपुढे मानाने मिरवलेही गेले. गुन्हेगारांवर पोलिसांची जरब बसवण्यासाठी चकमक म्हणजेच एनकाऊंटर हा एक प्रभावी मार्ग पोलिसांकडून सर्रास अवलंबला जातो. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त जे. एफ. रिबेरो निवृत्तीनंतर पंजाबचे पोलीस महासंचालक होते. पंजाबमध्ये तेव्हा शीख अतिरेक्यांच्या कारवायांनी उच्छाद मांडला होता आणि त्या नियंत्रणात आणण्याची जबाबदारी रिबेरोंवर होती. तेव्हा पंजाबमध्येही मोठ्या प्रमाणात पोलीस चकमकी झाल्या होत्या. रोजच्या रोज किंवा दर दिवसाआड वृत्तपत्रांमधून संशयित शीख अतिरेकी पोलीस चकमकीत मारले गेल्याच्या बातम्या येत असायच्या. कालांतराने पंजाब अतिरेक्यांच्या कारवायांतून मुक्त झाला व तो आजही मुक्त आहे. उत्तर प्रदेशातही सध्याच्या योगी आदित्यनाथ सरकारने तिथली गुन्हेगारी मोडून काढताना पोलीस चकमकींचाच आधार घेतल्याचे पाहयला मिळते.

त्या काळात मुंबईतही शीख अतिरेक्यांच्या कारवाया सुरू झाल्या होत्या. मुंबई पोलिसांनी भांडुपच्या खिंडीपाडा तसेच विक्रोळीच्या टागोर नगर येथे केलेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत या संशयित शीख अतिरेक्यांना यमसदनी पाठवले होते. कोणतीही पोलीस चकमक झाली की त्याची चौकशी होते. ही चौकशी किती महत्त्वपूर्ण असते हे चौकशीच्या अंतीच कळते. एन्काऊंटरफेम पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा अशाच एका लखनभैय्या एन्काऊंटरमध्ये अडकला होता. पोलीस निरीक्षक सचिन वाझेही मनसुख हिरेनच्या मृत्यू प्रकरणात असाच अडकला. या प्रकरणातही प्रदीप शर्मा फसला. मुकेश अंबानी यांच्या मुंबईतल्या अँटेलिया इमारतीजवळ स्फोटकाच्या कांड्या ठेवण्यापासून तेव्हाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासाठी खंडणी उकळण्याचा आरोप असलेल्या सचिन वाझेला अटक करण्याची मागणी तेव्हाचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस लावून धरत असताना तेव्हाचे महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माध्यमांसमोर ही मागणी उडवून लावताना, वाझे काय ओसामा बिन लादेन आहे का, असा सवाल करत होते. आणि आता त्यांचीच सेना चकमकीत मारला गेलेल्या अक्षय शिंदेच्या बाजूने गळा काढत काढत आहे.

बदला

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी याप्रकरणी सरकारवर टीका केली आहे. या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तुस्थिती समोर येणे अपेक्षित आहे. या आरोपीने केलेले कृत्य जरी गंभीर असले तरी त्याला अशा पद्धतीने संपवणे योग्य नाही, असे ते म्हणाले. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, सत्य बाहेर येण्याआधीच दडपले गेले. पोलिसांचा तपास चुकीच्या दिशेने होता. या प्रकरणामागे कोण आहे हे जाणून घेण्याआधीच मुख्य आरोपीला संपवण्यात आले. फरार आरोपींना वाचविण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केला का? शिंदेला संपवून प्रकरण दाबण्याचा वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न केला जातोय का? सत्य समोर येण्यासाठी एन्कांऊटरची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

बदला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांच्या भूमिकेचे जाहीर समर्थन केले. जर आरोपी पोलिसांचीच बंदूक घेऊन पोलिसावरच हल्ला करत असेल तर पोलीस बघ्याची भूमिका घेणार का, असा सवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे. जे विरोधक या नराधमाला भरचौकात फासावर लटकवा, असे म्हणत होते, आता तेच नेते या एन्काऊंटरवर प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांना साध्य काय करायचे आहे, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलिसांनी स्वरक्षणार्थ गोळीबार केला. विरोधकांनी आरोपीची बाजू मांडण्यापूर्वी सगळ्या गोष्टी पडताळून पाहिल्या पाहिजेत. हे न पाहता विरोधकांनी आरोपीची बाजू घेणे चुकीचे आहे. दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, एखादा आरोपी पोलिसांवरच हल्ला करत असेल तर पोलीस स्वरक्षणार्थ गोळीबार करणारच. आणि या पोलीस चकमकीची चौकशी होतच आहे. त्यात दूध का दूध, पानी का पानी होईलच.

बदला

मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी तर आरोपी अक्षय शिंदेच्या बाजूने आरडणाऱ्या विरोधकांची सालपटेच काढली. अक्षय शिंदेला पोलिसांनी ठोकला. पण एनकाऊंटर विरोधकांचा झाला. विरोधकांची वक्तव्ये हा बेशरमपणा आहे. अफजल गुरुची बरसी करणारे आता अक्षय शिंदेचीपण बरसी करणार का? काय सांगायचे आहे तुम्हाला? कुठल्या थराला गेला तुम्ही? तो लिंगपिसासू आरोपी, त्याची माळ जपता? असे सवाल त्यांनी केले.

बदला

शरद पवारसाहेब, आरोपीने पोलिसांवर हात टाकल्यावर त्यांनी भजन करायचे का? कुठे आहेत उद्धव ठाकरे? त्या लिंगपिसासूविरोधात बोलताना त्यांची का जीभ अडकत आहे? आदित्य ठाकरे आता ट्विट करीत आहेत. त्यांच्याकडे माहिती होती तर ते पोलिसांत का गेले नाहीत? नागरिक म्हणून चिमुकलीला न्याय मिळावा म्हणून ते पोलिसांकडे का गेले नाहीत? बरं ज्याला ठोकला, तो कोण आहे? ज्या चिमुरडीसोबत अश्लिल प्रकार झाला त्या कुटुंबाची काय मानसिक अवस्था असेल? पोलीस आणि तपासयंत्रणांनी काही पुरावे गोळा केले आहेत. ते सगळे खोटे ठरवताय? अशी प्रश्नांची सरबत्तीही शेलार यांनी केली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी काल माध्यमांशी बोलताना या पोलीस चकमकीबद्दल पोलिसांचे अभिनंदन केले आहे. एक महिला म्हणून मी याबद्दल पोलिसांचे अभिनंदन करते. त्यांनी जाणूनबुजून अक्षय शिंदेला ठार मारले असेल तर त्यांचे डबल अभिनंदन.. असे त्या म्हणाल्या. महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. अशावेळी अशा नराधमांना धाक बसण्यासाठी अशा चकमकी वरचेवर व्हायलाच हव्या, असेही त्या म्हणाल्या.

बदला

अक्षय शिंदे मारला गेल्यानंतर बदलापूरमध्ये लोकांनी फटाके फोडले. हे कसले द्योतक आहे? आरोपी अक्षय शिंदेला आनंद दिघेस्टाईल न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली आहे. या घटनेनंतर काही ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उंचावलेल्या हातात बंदूक असल्याचा फोटो प्रदर्शित करत बदला पूरा, असे म्हणणारे होर्डिंग लावले. या चकमकीनंतर देवाचा न्याय, असा हॅशटॅग समाजमाध्यमांवर ट्रेंडिंग होता. यावरूनही लोकांची काय मानसिकता आहे, हे स्पष्ट होते. या चकमकीची पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण खात्याकडून चौकशी केली जात आहे. मृत अक्षय शिंदेच्या वडिलांनी पोलिसांनी केलेला हा खून असल्याचा दावा करत मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. उच्च न्यायालयाने याप्रकरणी पोलिसांवर कडक शब्दांत ताशेरेही ओढले आहेत. सर्वसाधारणपणे पोलीस चकमकीची दंडाधीकारीय चौकशी होते. या सर्व चौकशीत ही पोलीस चकमक खरी होती की नाही, की राजकीय लाभासाठी मुख्यमंत्री शिंदे तसेच उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा हा बनाव होता, हे स्पष्ट होईलच. पण, या चकमकीमुळे महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींवर जरब बसेल हे नक्की! आणि महाराष्ट्रात महिला असुरक्षित असल्याचा कांगावा करणाऱ्या विरोधकांचीही बोलती बंद होईल!!

2 COMMENTS

  1. किरणजी सुंदर आणि रोखठोक लेख… अशाच किंवा यापेक्षाही अजून कठीण शिक्षा व्हायला पाहिजेत. तरच अशा गोष्टींना आळा बसेल…

  2. सर्व सामान्य लोकांच्या मते तो सरळ सरळ एन्काऊंटर होता व.तो कायद्याने मरावयास हवा होता. पण काही जणांना वाचविण्यासाठीच एन्काऊंटर केला गेला. सगळे राजकारण.

Comments are closed.

Continue reading

आता शरद पवार आळवताहेत उद्धव ठाकरेंचा राग!

महाराष्ट्रात निवडणूक प्रचार आता शिगेला पोहोचू लागला असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा राग आळवायला सुरूवात केली आहे. नुकत्याच केलेल्या एका जाहीर भाषणात थोरल्या पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...

राज ठाकरेंच्या सहमतीनेच सदा सरवणकर मैदानात?

मुंबईतला माहीम मतदारसंघ आज सर्वात जास्त चर्चेचा आहे. याचे एकमेव कारण म्हणजे तेथून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसेचे युवा नेते अमित ठाकरे या मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. याच मतदारसंघातून महायुतीच्या वतीने शिवसेनेकडून विद्यमान...

यंदाच्या निवडणुकीत ठाकरे-पवार राहणार परिवारात दंग!

महाराष्ट्र विधानसभेच्या आता होत असलेल्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे परिवारवादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्व पक्षांचे प्रमुख आपापल्या परिवाराला जपण्यामध्ये कार्यमग्न राहणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत ते पक्षाला जपण्यात किती वेळ देतात आणि परिणामी या निवडणुकीत नेमके कोण बाजी मारते याकडे...
Skip to content