Homeटॉप स्टोरीशिवसेनेवरील वर्चस्वासाठी मुख्यमंत्री...

शिवसेनेवरील वर्चस्वासाठी मुख्यमंत्री ठाकरेंचा आटापिटा?

शिवसेनेत बंडाचा झेंडा फडकवणाऱ्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्षाच्या दोन तृतियांश आमदारांहून जास्त आमदारांचा ओघ लक्षात घेता मुख्यमंत्रीपदासाठी केविलवाणी धडपड करणारे उद्धव ठाकरे यांनी आता पक्षावरील वर्चस्व टिकविण्यासाठी आटापिटा चालविला असल्याची चर्चा आहे. आमदारांची इच्छा असेल तर आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहोत, असे जाहीर करण्यापर्यंतची मवाळ भूमिका आज शिवसेना पक्षप्रमुखांच्या वतीने घेण्यात आली.

संजय राठोड व दादा भुसेही रवाना

बुधवारी आपल्या गटातल्या शिवसेनेच्या आमदारांची संख्या दोनतृतियांश करण्याच्या प्रतीक्षेत गुवाहटीच्या हॉटेल रॅडिसन व्ह्यू हॉटेलमध्ये असलेले एकनाथ शिंदे यांची चिंता काल रात्रीच मिटली. काल रात्रीच शिवसेनेचे गुलाबराव पाटील, सदा सरवणकर, योगेश कदम आणि मंगेश कुडाळकर हे आमदार या हॉटेलच्या मुक्कामाला पोहोचले. आज सकाळी शिवसेना पुरस्कृत अपक्ष आमदार आशिष जैस्वाल यांच्याबरोबर शिवसेनेचे आमदार दीपक केसरकरही गुवाहटीला पोहोचले. संध्याकाळी तेथे जाण्यासाठी शिवसेनेचे कृषीमंत्री दादा भुसे तसेच संजय राठोड सूरत विमानतळावरून रवाना झाल्याचे समजते. सूरतच्या हॉटेलमध्ये शिंदे यांचे मन वळवण्यासाठी गेलेले रविंद्र फाटकही आज संध्याकाळी शिंदे गटात सहभागी झाले. संध्याकाळी शिंदे यांनी आपल्याबरोबर शिवसेनेच्या आमदारांसह मिळून ४६ आमदार असल्याचा दावा करणारा व्हिडिओ जारी करत शक्तीप्रदर्शन केले.

अडीच वर्षांनी वर्षाचे दार उघडले

कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान सोडून आपले बस्तान मातोश्रीवर हलवले. त्याआधी त्यांनी बंडखोर आमदारांना भावनिक साद घातली. आपल्यापैकी एकाही आमदाराने समोर येऊन सांगितल्यास आपण मुख्यमंत्रीपद सोडायला तयार असल्याची तयारी उद्धव ठाकरे यांनी दाखवली. त्या पदाचा आपल्याला मोह नाही, असे सांगायलाही ते विसरले नाहीत. त्यांच्या या भावनिक आवाहनावर प्रतिक्रिया व्यक्त करताना संजय शिरसाट यांनी एक पत्रच जारी केले. एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरून हे पत्रच सार्वजनिक केले. कालच्या आवाहनामुळे आमच्यासाठी वर्षाचे दार तब्बल अडीच वर्षांनी उघडले गेले. गेले अडीच वर्षे बडव्यांमुळे आमची मुख्यमंत्र्यांबरोबर भेट होत नव्हती. मंत्रालयात मुख्यमंत्री येत नसल्यामुळे तेथे भेटण्याचाही प्रश्न नव्हता, असे शिरसाट म्हणाले.

अजय चौधरीच शिवसेनेचे गटनेते

दरम्यान, शिवसेनेचे विधानसभेतले शिवसेनेचे गटनेते म्हणून उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अजय चौधरींच्या नावाला मान्यता दिली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी बोलावलेल्या आमदारांच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्याऐवजी अजय चौधरी यांची गटनेतेपदी नेमणूक केली. तसे पत्र झिरवाळ यांना देण्यात आले होते. शिंदे यांनी हे पत्र बेकायदेशीर असल्याचे सांगत गटनेते या नात्याने प्रतोद सुनील प्रभू यांच्याजागी भरत गोगावले यांची नेमणूक केली. त्यानंतर तसे पत्र झिरवाळ यांनी पाठवले. झिरवाळ यांनी हे पत्र फेटाळत पक्षप्रमुखांना गटनेता नेमण्याचा अधिकार असतो, म्हणून अजय चौधरी यांची गटनेते म्हणून केलेल्या नेमणुकीला मान्यता दिली.

नितीन देशमुख, कैलास पाटील यांचा आरोप फेटाळला

आपल्याला फसवून तसेच दमदाटी करून सूरत तसेच गुवाहटीला नेल्याचा आरोप नितीन देशमुख यांनी केला होता. हा दावा फेटाळताना शिंदे गटाने एक व्हिडिओच जारी केला. आपल्या पत्नीची प्रकृती ठीक नसल्याचे सांगितल्याने आमदार शरद कणसे यांनी आणखी एका सहकाऱ्याच्या मदतीने चार्टर्ड विमानाने देशमुख यांना नागपूर विमानतळावर सोडले, असे यात स्पष्ट दिसत आहे. आपण सहीच केली नाही. अन्य कोणीतरी आपल्या नावाने सही केल्याचा देशमुख यांचा दावा फेटाळणारे दृष्यही या व्हिडिओत आहे. त्यात देशमुख स्वतः सही करताना दिसत आहे. कैलास पाटील यांनीच आपल्याला सूरतकडे नेले. गुजरातच्या सीमेवर त्यांनी विचार बदलला. त्यानंतर मीच स्वतः त्यांच्या परतीची व्यवस्था केली. परतल्यावर मात्र त्यांनी आपल्याला मारहाण झाल्याचा आणि मध्यरात्री रस्त्यावरून चालत गेल्याचा आरोप केला, असे स्पष्टीकरण तानाजी सावंत या बंडखोर आमदाराने केले.

महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार

आजही मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या आमदारांची बैठक मातोश्री निवासस्थानी बोलावली. त्यानंतर नितीन देशमुख तसेच कैलास पाटील यांनी बंडखोरांवर केलेल्या आरोपांनंतर संजय राऊत यांनी शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासाठीही तयार असल्याचे जाहीर केले. बंडखोरांनी पत्र व समाजमाध्यमांच्या माध्यमांतून व्यक्त न होता उद्धव ठाकरे यांच्यासमोर बसून चर्चा करावी. आमदारांची इच्छा असेल तर आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहोत. पण, २४ तासांत या आमदारांनी ठाकरे यांच्या समोर येऊन बसावे, असे राऊत म्हणाले. त्यावर शिंदे गटाकडून याला आता बराच उशिर झाल्याचे सांगण्यात आले.

काँग्रेस-राष्ट्रवादीकडून तीव्र प्रतिक्रिया

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमचा पाठिंबा आहे, असे जाहीर केले आहे. महाविकास आघाडीमध्ये राहायचे की नाही हे आम्ही त्यांना सांगणार नाही. त्यांनी याबाबत भूमिका घ्यायला हवी. राष्ट्रवादीचे अजित पवार यांनीही आमच्या आमदारांना त्रास दिला आहे, निधी देण्याबाबत त्यांनी नेहमीच आखडता हात घेतला, असे ते म्हणाले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बंडखोरांना परत आणण्याच्या प्रक्रियेत राष्ट्रवादी मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी आहे, असे स्पष्ट केले. सरकार पडले तर आम्ही विरोधात बसू, असेही ते म्हणाले. छगन भुजबळ यांनी मात्र, राऊत यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या भूमिकेवर व्यक्त होण्यापूर्वी आपल्या सहकारी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करायला हवी होती, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. संध्याकाळी या दोन्ही पक्षांच्या नेत्यांची स्वतंत्र बैठकांमध्ये चर्चा झाली होती.

अपक्ष आमदार विनोद अग्रवाल भाजपाकडे

दरम्यान, अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन भाजपाला आपला पाठिंबा जाहीर केला. आज दिवसभर फडणवीस यांच्याकडे त्यांच्या पक्षातल्या सहकाऱ्यांचीही रेलचेल होती. विविध बाबींवर यावेळी चर्चा झाल्याचे कळते.

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content