महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद सोडण्यासाठी उत्सुक असलेले अजित पवार यांनी पक्षसंघटनेत मानाचे स्थान मिळवण्यासाठी पाऊल टाकले असले तरी पक्षाध्यक्ष शरद पवार आणि त्यांचे समर्थक दादांना एकाकी पाडण्याचा कामाला लागले आहेत, असे कळते.
अलीकडेच भाकरी फिरवण्याची भाषा करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतःच राजीनामा सादर करून आपल्या अध्यक्षपदाचा खुंटा हलवून बळकट केला. त्यानंतर लगेचच त्यांनी आपल्या कन्या खासदार सुप्रिया सुळे आणि अन्य विश्वासू सहकारी खासदार प्रफुल्ल पटेल यांची पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून नेमणूक केली. त्याचबरोबर त्यांनी इतर काही नेत्यांनाही विविध जबाबदारीची पदे दिली. मात्र, यावेळी शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर कोणतीही जबाबदारी टाकली नाही. अजित पवार विधानसभेत विरोधी पक्षनेते आहेत. ही जबाबदारी फार मोठी आहे आणि त्यामुळे त्यांना पक्षसंघटनेत कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही, असे स्वतः शरद पवार तसेच कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. तेव्हापासून अजितदादा यांना एकाकी पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसू लागले.

काल मुंबईत राष्ट्रवादीचा वर्धापनदिनाचा एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी आपल्याला विरोधी पक्षनेतेपदामध्ये कोणतेही स्वारस्य नव्हते, असे स्पष्ट सांगितले. आमदारांचा आग्रह होता आणि वरिष्ठ नेत्यांनी आपल्याला अनुमती दिली, त्यामुळेच आपण ही जबाबदारी स्वीकारली. आता एक वर्ष पूर्ण झाले आहे, त्यामुळे ही जबाबदारी सोडायला आपल्याला आनंद वाटेल. पक्षसंघटनेत मला कोणती जबाबदारी द्यावी, मी ती जबाबदारी अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडीन, असे ते म्हणाले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद तीन वर्षांचे असते. जयंत पाटील गेल्या पाच वर्षांपेक्षा जास्त काळ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, याची आठवण करून देताना अजित पवार म्हणाले की, जयंत पाटील गेल्या पाच वर्षांपासून प्रदेशाध्यक्ष आहेत. भाकरी फिरवायचीच असेल तर मग ती सर्वच बाजूने फिरवली पाहिजे. जयंत पाटील यांनीही अजितदादांचा प्रदेशाध्यक्षपदाचा दावा उधळून लावताना आपल्या भाषणात असे सांगितले की, मी फक्त मी पाच वर्षे नाही तर पाच वर्षे आणि एक महिना प्रदेशाध्यक्ष आहे, अजितदादांनी माझा एक महिना कमी करू नये.
आज राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी दादांची इच्छा लवकर पूर्ण होवो, अशी इच्छा व्यक्त केली. दादांनी पक्षसंघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याने आनंदच वाटला, असेही त्या म्हणाल्या. त्यापाठोपाठ पक्षातले ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांचे विश्वासू सहकारी छगन भुजबळ माध्यमांसमोर आले. पक्षाने प्रदेशाध्यक्ष बदलायचे ठरवलेच असेल तर हे पद बहुजन समाजाला द्यावे, असा आपला आग्रह राहील. सुनील तटकरे, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड असे अनेकजण ही जबाबदारी पार पाडू शकतात. मला संधी मिळाली तर मीही हे पद सांभाळू शकतो, असे भुजबळ म्हणाले. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी आपली वर्णी लावण्यासाठी प्रयत्नशील असलेले अजित पवार यांची पुरती कोंडी झाली आहे. प्रदेशाध्यक्षपद बदलायचे असेल तर अजितदादांना तेथे संधी न मिळता तिथे अन्य कोणालातरी संधी मिळू शकते. त्याचवेळेला विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद जयंत पाटील यांच्याकडे जाऊ शकते, असे जाणकारांना वाटते. या सर्व खेळीत अजितदादा नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे मात्र आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

