मुंबईतल्या “पार्लेश्वर फायनान्स”च्या बचत योजनांत साडेसात कोटी रुपयांहून अधिक पैसे गुंतविलेले जवळजवळ ३०० गुंतवणूकदार गेल्या दोन दशकांहून (२० वर्षांहून) अधिक काळ आपले पैसे परत मिळतील या आशेवर जगत असून या बुडालेल्या कंपनीकडून पैसे परत मिळण्याची शक्यता फारच कमी आहे.
१ ऑक्टोबर १९८७ रोजी स्थापन झालेल्या (नोंदणी क्रमांक ४४८५८) “पार्लेश्वर फायनान्स एण्ड इन्हेस्टमेंट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड”ची मान्यता रिझर्व बॅंकेने २८ जून २००४ला रद्द केली आणि कंपनीने गाशा गुंडाळला. “पार्लेश्वर फायनान्स एण्ड इन्हेस्टमेंट सर्विसेस प्राईवेट लिमिटेड”च्या अंतर्गत “पार्लेश्वर फायनान्स”, “अर्थवर्धन” आणि “युनिटी इन्हेस्टमेंट सोयायटी” अशा संलग्न कंपन्यादेखील स्थापन करण्यात आल्या होत्या आणि त्यांची कार्यालये विलेपार्ले पूर्व येथून चालत होती. सुरुवातीच्या काळात गुंतवणूकदारांना त्यांच्या ठेवींवर १४% व्याज देण्यात येऊन मॅच्युरीटीनंतर वेळच्यावेळी त्यांचे पैसे परत केल्यामुळे, गुंतवणूकदारांची संख्या वाढत गेली.

गुंतवणूकदारांच्या ठेवींना विमा योजनेच सुरक्षाकवच असल्यामुळे ठेवी सुरक्षित असल्याची हमीही देण्यात आली होती. मात्र नंतर कंपनीने गुंतवणूकदारांच्या पैशातून काही लघु उद्योगांना कर्ज दिले. परंतु बऱ्याच उद्योजकांनी पैसे बुडविले आणि पार्लेश्वर फायनान्स डबघाईला आली. शेवटी कंपनीने ठेवी परत देण्यास टाळाटाळ केल्यामुळे गुंतवणूकदारांनी “महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपोझिटर्स इन फिनॅन्शियल इस्टाब्लिशमेंट १९९९” कायद्या अंतर्गत, विलेपार्ले पोलीसठाण्यात (सीआर 1/190/2004) आणि आर्थिक गुन्हे शाखा (सीआर 1/36/2004)अशी गुन्ह्यांची नोंद केली. याशिवाय एमपीआयडी कोर्ट (प्रकरण क्रमांक 28/04), मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात तक्रार केली.
मधल्या काळात कंपनीचे कांही संचालक आणि भागीदारांना शिक्षा होऊन त्यांना तुरुंगवासदेखील भोगावा लागला. कंपनीची काही मालमत्ता जप्त करण्यात आली तर काही मालमत्ता कंपनीचे संचालक व भागीदारांनी स्थानिक लोकांच्या मदतीने विकून टाकली. आज कंपनीने गाशा गुंडाळल्यामुळे गुंतवणूकदार हतबल झाले आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पण पुढे सरकत नाही आणि कंपनीला टाळे ठोकण्यात आले आहे. बरेच गुंतवणूकदार वृद्ध झाले आहेत तर काही हयात नाहीत. जे हयात आहेत ते आज ना उद्द्या आपले पैसे परत मिळतील, या आशेवर जगत आहेत.