प्युअर अँड अप्लाईड फिजीक्स विषयक संघाची ‘भौतिकशास्त्रातील महिलांविषयीची आठवी आंतरराष्ट्रीय परिषद’ कालपासून मुंबईत सुरू झाली. भारतीय भौतिकशस्त्र संघटनेच्या(IPA) अखत्यारीतील भौतिकशास्त्रातील स्त्री-पुरुष प्रमाण कार्यगट आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च टीआयएफआरने संयुक्तपणे आयोजित केलेली ही परिषद ऑनलाईन स्वरूपात मुंबईत सुरू झाली. होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन (HBCSE)-TIFR, मुंबईच्या परिसरात 10-14 जुलै 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने ही परिषद होत आहे. भौतिकशास्त्र क्षेत्रातील लिंगभावविषयक मुद्द्यांवर अशी आंतरराष्ट्रीय परिषद भारतात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली आहे.

परिषदेच्या उद्घाटन सत्रात बोलतांना, भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार आणि प्रख्यात कंडेस्ड मॅटर फिजिसिस्ट प्रा. ए. के. सूद यांनी सांगितले की, युवतींसाठी मार्गदर्शन कार्यक्रम, मध्यम वयोगटातील महिलांसाठी लवचिक कार्य धोरणे आणि नेतृत्व भूमिका तसेच ज्येष्ठांसाठी महत्त्वपूर्ण संशोधन अनुदान, अशा उपाययोजना विज्ञान संशोधनात अधिकाधिक महिलांना आणण्याचा एक उपयुक्त मार्ग ठरेल. प्रा.ए.के. सूद यांनी परिषदेच्या आयोजकांचे अभिनंदन केले आणि भौतिकशास्त्रातील महिलांच्या प्रतिनिधित्वाबाबतचे त्यांचे अनुभव सांगितले. भारतात विज्ञानाचे अध्ययन करत असतांना, मुली-महिलांचे प्रमाण वाढवत, लिंगभाव विषयक तफावत दूर करण्यासाठी, पीएए कार्यालयाने सुरू केलेल्या उपक्रमांची सूद यांनी माहिती दिली. अलीकडेच त्यांच्या कार्यालयाने प्रकाशित केलेल्या पुस्तकातून भौतिकशास्त्रात विशेष मिळविणार्या महिलांचे योगदान आणि लिंगभाव विषयक विविधतेला प्रोत्साहन देण्यात विज्ञान आणि तंत्रज्ञानाची भूमिका यावर भर देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे (TIFR) संचालक प्राध्यापक जयराम चेंगलूर यांनी TIFR मधील M.Sc भौतिकशास्त्राच्या विद्यार्थीनींसाठी असलेल्या विज्ञान विदुषी मार्गदर्शन कार्यक्रमाविषयी सांगितले आणि परिषदेच्या गोषवारा पुस्तकाचे उद्घाटन केले. अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे सचिव प्राध्यापक अजित के.मोहंती यांनी आपल्या संदेशात भारताच्या तंत्रज्ञान प्रगतीमधील महिलांच्या योगदानाविषयी माहिती दिली.

भारतीय भौतिकशास्त्र संस्था, आय पी ए चे अध्यक्ष डॉ एस एम युसूफ यांनी आय पी ए मधील कार्य, परिषदा आणि पुरस्कारांमध्ये महिलांच्या वाढत्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा आणि प्रतिनिधित्वाचा उल्लेख केला.
पार्टिकल फिजिक्स या विषयात संशोधन केलेल्या ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ प्रा. रोहिणी गोडबोले यांनी भौतिकशास्त्र क्षेत्रातील महिलांवरील आंतरराष्ट्रीय परिषद, आय सी डब्लू आय पी च्या परिषदांशी असलेल्या भारताच्या संबंधाविषयी चर्चा केली तसेच त्यामुळे भारतातील महिलांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM ) या शाखांमध्ये करिअर करण्यासाठी कशा प्रकारे प्रेरणा मिळाली त्याबद्दल माहिती दिली.

भारतीय भौतिकशास्त्र संघटनेचा भौतिकशास्त्र क्षेत्रातील लिंगभाव कार्यगट (GIPWG) हा भौतिकशास्त्रातील लिंगभाव विषयक असमानता आणि लिंग प्रतिनिधीत्व या संकल्पना दूर करण्यासाठी शिफारस केलेल्या उपायांचा अवलंब करण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ असल्याचे त्यांनी सांगितले.
वर्ष 2019 मध्ये भारतातील भौतिकशास्त्रातील पहिली लिंगभाव विषयक परिषद (प्रेसिंग फॉर प्रोग्रेस) आयोजित केल्याचे आणि त्यानंतर भारतात 8 व्या आय सी डब्लू आय पी चे आयोजन, हे भारतातील लिंगभाव विषयक समानता प्राप्त करण्याच्या दिशेने अनेक भौतिकशास्त्रज्ञांनी सातत्यपूर्ण प्रयत्नांद्वारे साध्य केलेली प्रगती दर्शवते, असे प्राध्यापक गोडबोले म्हणाल्या.
स्थानिक आयोजन समितीच्या सहअध्यक्ष असणा-या टीआयएफआरच्या प्रा. वंदना नानल, यांनी भारतात आयसीडब्ल्यूआयपी परिषद आयोजित करण्यामागची भूमिका मांडली. आययूपीएपीच्या कायर्कारी गट – 5 च्या अध्यक्षा प्रा.लिलिया मेझा मॉन्टेस यांनी आपल्या प्रारंभीच्या निवेदनामध्ये पॅरिसमध्ये 2002 मध्ये सुरू झालेल्या आयसीडब्ल्यूआयपीच्या इतिहासाची माहिती सांगितली आणि भौतिकशास्त्रामध्ये कार्यरत असलेल्या महिलांवर त्याचा जागतिक परिणाम कसा झाला याची माहिती दिली. स्थानिक आयोजन समितीच्या सहअध्यक्ष प्रा. श्रुबाबती गोस्वामी यांनी सहभागींची आकडेवारी, बैठकीचा एकूण कार्यक्रम सादर केला आणि आयसीडब्ल्यूआयपी-2023 मध्ये आयपीए-जीआयडब्ल्यूपीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या उपग्रह कार्यक्रमांचा आढावा दिला. सर्व मान्यवरांनी आयसीडब्ल्यूआयपीच्या शिफारशींचे महत्त्व लक्षात घेतले आणि आशा व्यक्त केली की, आयसीडब्ल्यूआयपी-2023 मुळे लिंगभाव विषयक समानता निर्माण होण्यासाठी नवीन मार्ग प्रशस्त होवू शकतील. आजच्या उद्घाटन सत्राला जगातील विविध भागांतून 150 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.

अग्रगण्य भौतिकशास्त्रज्ञ, भारतातील आणि इतर देशांतील प्रख्यात महिला शास्त्रज्ञ त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल माहिती सामायिक करतील. त्याचबरोबर विज्ञान क्षेत्रामध्ये लिंगभाव विषयक समानतेला समर्थन देण्यासाठी भारत आणि जगभरातील देशांनी घेतलेल्या पुढाकारांबाबतही चर्चा करतील. भारतात होत असलेल्या आयसीडब्ल्यूआयपी- 2023 ही परिषदेमुळे वैविध्य, समानता आणि सर्वसाधारणपणे भौतिकशास्त्र आणि विज्ञानातील समावेशाला प्रोत्साहन देण्यासाठी भारताची वचनबद्धता पुढे नेण्यासाठी एक संधी मानली जात आहे. परिषदेला नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (एनआयएसईआर – नायसर), तिन्ही राष्ट्रीय विज्ञान अकादमी, इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टीचर्स (आसएपीटी) आणि भारत सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागाराचे कार्यालय यांचे समर्थन आहे.

