राज्य सरकारने पोलिसांमार्फत आपली चौकशी केली आणि चुकीची कारवाई केली तरी आपण घाबरत नाही, हे सांगताना माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आपल्या वडिलांना इंदिरा गांधींनी काहीही चूक नसताना दोन वर्षे तुरुंगात डांबले होते, याची आठवण करून दिली. त्याच पद्धतीने काहीही चूक नसताना आपल्या काकूला इंदिरा गांधींनी दीड वर्षे तुरुंगात घातले होते आणि त्यामुळे भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवताना प्रसंगी आम्ही तुरुंगात जायलाही घाबरत नाही, अशा शब्दात फडणवीस यांनी महाविकास आघाडीला आव्हान दिले.
फडणवीस यांना पोलिसांनी दिलेली नोटीस, आपण पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात जाऊन जबाब देऊ, हे फडणवीस यांनी जाहीर केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन केलेली चौकशी, हे विषय रविवारी दूरचित्रवाणी माध्यमांमध्ये गाजले होते. त्यानंतर सभागृहात हा विषय उपस्थित करताना फडणवीस यांनी गृहमंत्र्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.
विधानसभेत फडणवीस यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना निदर्शनास आणून दिले की, गृहमंत्र्यांनी त्यांना दिलेले प्रश्न एखाद्या साक्षीदाराला विचारतात, त्या स्वरूपाचे होते. त्याची उत्तरेही आपण गृहमंत्र्यांना पाठवली होती, हे सांगून फडणवीस म्हणाले की, प्रत्यक्षात मात्र पोलिसांनी आपल्याला आरोपीला विचारतात, त्या स्वरूपाचे प्रश्न विचारून चौकशी केली. त्यामुळे हे प्रश्न कोणी बदलले, हा सवाल उपस्थित करत फडणवीस म्हणाले की, दिलीपराव (गृहमंत्री) तुम्ही मला इतकी वर्षे ओळखता… त्यावर वळसे-पाटील म्हणाले की तुम्हीही मला ओळखता. त्यावर फडणवीस म्हणाले की, मी तुम्हाला ओळखतो म्हणूनच मला माहीत आहे की हे प्रश्न कोणी बदलले. मला माहीत आहे कोणी बदलले ते पण… तरीही हे सांगतो की आम्ही भ्रष्टाचाराविरुद्ध लढताना प्रसंगी तुरुंगात जायलाही घबरत नाही.
विधानसभेत गेल्या आठवड्याच्या शेवटी माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांनी पेनड्राइव्ह बॉम्ब टाकून सरकार पक्षाची कोंडी केली होती. त्यावर आज गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील उत्तर देणार असल्याने त्याबद्दल उत्कंठा होती. पण गृहमंत्र्यांचे उत्तर म्हणजे खोदा पहाट, निकली चुहिया… स्वरूपाचे होते. विशेष म्हणजे फडणवीस यांच्या आरोपांचे खंडन करताना गृहमंत्र्यांच्या उत्तरात तडफदारपणा तर दिसलाच नाही, उलट त्यांनीच फडणवीस यांना राज्याच्या भल्यासाठी तुम्ही सहकार्य करा, अशी विनंतीही केली.
देवेन्द्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात व्हिडियो क्लिप्सच्या पेनड्राइव्हने विधानसभेत खळबळ माजवून दिली होती. त्या व्हिडियो क्लिप्ससह त्यांनी केलेल्या भाषणाला उत्तर देताना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी याप्रकरणी सीआडी चौकशी जाहीर केली. व्हिडियो क्लिप्समधे दिसणारे विशेष सरकारी वकील प्रवीण पंडित-चव्हाण यांनी पदाचा राजीनामा दिला असून तो स्वीकारण्यात आल्याची माहितीही वळसे-पाटील यांनी विधानसभेत जाहीर केली.
फडणवीस यांनी याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. ती मान्य केली जाणार नाही, याची फडणवीस यांनाही कल्पना होतीच. त्यामुळे आज विधानसभेत गृहमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानंतर राईट टू रिप्लाय या अधिकारात फडणवीस यांनी गृहमंत्र्यांच्या उत्तरावर भाष्य केले. ते करताना राज्य सरकारच विरोधकांविरुद्ध कारस्थानं करून त्यांना खोट्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याचे पुरावे व्हिडियो क्लिप्सच्या पेनड्राइव्हमध्ये दिलेले असल्याने राज्यातली सीआयडी सरकारविरुद्ध तपास कसा करू शकेल, असा प्रश्न उपस्थित केला. गृहमंत्र्यांनी सीबीआय चौकशीला नकार दिलेला असल्याने त्याचा निषेध करून विरोधकांनी या मुद्द्यावर सभात्याग केला.

केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाने कारवाई केलेले राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना मंत्रिपदावरून दूर करण्याची मागणीही फडणवीस यांनी केली होती. मात्र, ती मान्य केली गेली नाही आणि गृहमंत्री वळसे-पाटील यांनी नवाब मलिक यांची पाठराखण केली. ती करताना गृहमंत्र्यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेने २०२१मध्ये गुन्हा दाखल करण्यापूर्वी मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट २८ वर्षे आधी झाले होते. त्या प्रकरणांचे न्यायालयीन निकाल लागून आरोपींना शिक्षाही झाली होती. त्यानंतर केंद्रीय तपासयंत्रणा केवळ नवाब मलिक यांना राजकीय हेतूने अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसे असूनही फडणवीस राज्य सरकारवरच कारस्थाने केल्याचा आरोप करत आहे, याबद्दल वळसे-पाटील यांनी आश्चर्य व्यक्त केले.
एकीकडे राज्यातल्या पोलीस खात्याचे फडणवीस कौतुक करतात आणि त्याच पोलीस खात्यावर विश्वास न ठेवता, सीबीआय चौकशीची मागणी करतात, हेही न समजण्यासारखे आहे, असे सांगतानाच वळसे-पाटील म्हणाले की, फडणवीस यांनी न्यायालयात दाद मागू, असेही सांगितले आहे. किमान, त्यांचा न्यायालयासारख्या एखाद्या यंत्रणेवर तरी विश्वास आहे, हे चांगले आहे. वळसे-पाटील यांनी ही टिप्पणी करताच सत्ताधारी पक्षातल्या सर्व आमदारांनी बाके वाजवून विरोधकांची हुर्यो उडवली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण करत वळसे-पाटील यांनी सांगितले की, एका अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून गृहमंत्र्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मात्र, आपल्या राईट टू रिप्लायच्या प्रतिवादात फडणवीस यांनी निदर्शनास आणून दिले की, माजी गृहमंत्र्यांवर गुन्हा दाखल झालाय तो उच्च न्यायालयाच्या आदेशावरून आणि त्यामुळे आमचा न्यायालयावर विश्वास आहेच. पण तुमच्या विधानांवर बाके वाजवणाऱ्या तुमच्या आमदारांना हे नीट समजावून सांगा, अशी टोलेबाजी फडणवीस यांनी केली.
दिवसभरात प्रश्नोत्तरांमध्ये दम होता तो कामकाज झाले, हे सांगण्यापुरताच. त्यानंतरच्या शून्य प्रहरात फडणवीस यांना दिलेल्या नोटिशीच्या विषयाने जान आणली. पण त्यानंतर एकूण कामकाजात असलेल्या १२ लक्षवेधी सूचना राज्याच्या विविध भागातल्या असल्याने त्या काळात पत्रकारांनी पाय मोकळे करून घेतले. तीन लक्षवेधी सूचना उद्यासाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत.
गृहमंत्र्यांचे उत्तर आणि फडणवीस यांच्याबरोबर त्यांची झालेली जुगलबंदी, हाच विधानसभेतल्या कामकाजातला चर्चेचा विषय होता. एरवी सत्ताधाऱ्यांना सुपात ठेवणारेही महाविकास आघाडीकडे डँशिंग मंत्री नाहीत, अशी हळहळ व्यक्त करत होते, तर फडणवीस समर्थक मात्र दरवेळी फडणवीस कसे एकटा टायगरसारखे संपूर्ण महाविकास आघाडीला भारी पडताएत, याची चर्चा करत होते.
अर्थसंकल्पावरील चर्चेलाही आज फडणवीस यांच्या भाषणाने सुरुवात झाली. अर्थमंत्री अजित पवारांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे लेबल बदललेली दारू आहे, अशी टीका करून फडणवीस यांनी या सरकारला मद्य या विषयात विशेष रस असल्याने आपण ही उपमा वापरतोय, असेही स्पष्ट केले. तसेच, अर्थसंकल्पात १९५२ आणि १९६२च्या योजनाही या सरकारने जणू सुरू केल्यात असे दावे करण्यात आल्याचे सांगून फडणवीस यांनी टिप्पणी केली की, बहुधा रेशनदुकानात मद्यविक्रीचा शासकीय अध्यादेश काढणाऱ्यानेच बहुधा या लोकांची भाषणे लिहून दिलीत की काय, अशी शंका येते. फडणवीस यांनी सुरू केलेली चर्चा आज अर्धवट असून ती उद्या पुढे सुरू राहील आणि महाविकास आघाडीचे अधिवेशन काळात होत असलेले दैनंदिन वस्त्रहरणही…

