या वर्षीच्या मे महिन्यात 76व्या कान चित्रपट महोत्सवातील यशस्वी सहभागानंतर, आजपासून, 7 सप्टेंबर 2023पासून सुरू होणाऱ्या 48व्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (टीआयएफएफ) आपले चित्रपट घेऊन जाण्यासाठी भारत सज्ज आहे. यावर्षी, भारताला प्रतिभा, आशय आणि मनोरंजनाचे केंद्र म्हणून प्रदर्शित करण्यावर विशेष भर दिला जाईल.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सहसचिव (चित्रपट) आणि भारतीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पृथुल कुमार, टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होत असलेल्या भारताच्या अधिकृत शिष्टमंडळाचे नेतृत्त्व करतील. भारतीय चित्रपट विकास महामंडळ ही माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये भारताचा सहभाग आयोजित करणारी नोडल एजन्सी आहे.
आपल्या सहभागादरम्यान, भारत देशाच्या सृजनशील आणि तांत्रिक सामर्थ्याचे प्रदर्शन करण्यासाठी अनेक सत्रे घेईल आणि आंतरराष्ट्रीय भागधारकांना भारताबरोबर सह-निर्मिती करण्यासाठी आणि भारतामधील विविध स्थळांवर चित्रिकरण करण्यासाठी आमंत्रित करेल. ‘या, भारतात चित्रपट बनवा’, या विषयावरील विशेष सत्राच्या माध्यमातून भारताची चित्रपटविषयक धोरणे, आंतरराष्ट्रीय समुदायासमोर प्रदर्शित केली जातील. भारतामधील चित्रिकरण सुलभ करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायासाठी भारतात एक खिडकी यंत्रणा करण्यात येईल. भारत आणि कॅनडाचे चित्रपट निर्मिती क्षेत्रातील यश साजरे करण्यासाठी दोन्ही देश फीचर, शॉर्ट फिल्म्स, अॅनिमेशन प्रोजेक्ट्स, ओटीटी कंटेंट आणि वेब प्रोजेक्ट्स यासारख्या माध्यमांमध्ये चित्रपट निर्मितीची क्षमता आजमावण्याचा आणि त्यांना प्रोत्साहन देऊ इच्छितात. यामध्ये एनएफडीसी ओंटारियो क्रिएट्स, टेलिफिल्म कॅनडा, भारतीय निर्माते आणि कॅनेडियन निर्माते सहभागी होतील.
अहमदाबाद इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनने तयार केलेल्या इंडिया पॅव्हेलियनच्या उद्घाटनाने टीआयएफएफमधला भारताचा सहभाग सुरू होईल. स्पॉटलाइट सत्राव्यतिरिक्त, भारत ही कथाकारांची भूमी आहे, या संकल्पनेवरील सत्र आणि आंतरराष्ट्रीय मान्यवरांसह अनेक बैठकींचे आयोजन करण्यात आले आहे.
या वर्षी टीआयएफएफसाठी सहा भारतीय चित्रपटांची अधिकृतपणे निवड करण्यात आली आहे. यामध्ये तरसेम सिंग धंडवार दिग्दर्शित डिअर जस्सी, निखिल नागेश भट्ट दिग्दर्शित किल, करण बुलानी दिग्दर्शित थँक यू फॉर कमिंग, किरण राव दिग्दर्शित लॉस्ट लेडीज, जयंत दिगंबर सोमलकर दिग्दर्शित स्थळ/ए मॅच, आनंद पटवर्धन यांचा वसुधैव कुटुंबकम / जग हे कुटूंब आहे, या चित्रपटांचा समावेश आहे. सुसी गणेशन दिग्दर्शित ‘दिल है ग्रे’ हा चित्रपट मार्केट विभागाअंतर्गत प्रदर्शित होणार आहे.

