Tuesday, February 4, 2025
Homeन्यूज अँड व्ह्यूजआशियाई हॉकीत भारताचेच...

आशियाई हॉकीत भारताचेच वर्चस्व!

ओमान, मस्कत येथे झालेल्या ज्युनियर आशियाई कुमारांच्या हॉकी स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने आपले विक्रमी पाचवे विजेतेपद पटकावून सध्याच्या घडीला आशियाई खंडात भारतीय हॉकी संघाचेच वर्चस्व असल्याचेच दाखवून दिले आहे. याअगोदर बिहार येथे झालेल्या महिलांच्या याच स्पर्धेत भारतीय महिला संघाने बाजी मारली होती. तर त्याअगोदर झालेल्या आशियाई कप स्पर्धेत भारतीय पुरुष संघ अजिंक्य ठरला होता. त्यामुळे सध्याच्या घडीला आशियामध्ये भारतीय संघच अव्वल आहे हेच स्पष्ट होते. ओमान येथील स्पर्धेत भारतीय कुमार संघाने जेतेपदाला साजेसा खेळ करुन निर्णायक विजयाची मोहोर उमटविली. या संपूर्ण स्पर्धेत अपराजीत राहणारा भारत हा एकमेव संघ होता.

स्पर्धेसाठी भारताचा अ गटात समावेश करण्यात आला होता. भारताच्या गटात जपान, थायलंड, दक्षिण कोरिया, तैवान या इतर संघांचा समावेश होता. आपल्या सलामीच्या पहिल्याच लढतीत भारताने तैवानचा १६-० गोलांनी दणदणीत पराभव करून जोरदार विजयी सलामी दिली. दिलराज सिंगने ४ गोल करुन भारतीय विजयात मोठी भूमिका बजावली.  दुसऱ्या लढतीत मात्र जपानविरुद्ध विजय मिळवताना भारताला संघर्ष करावा लागला. अटीतटीच्या या सामन्यात अखेर भारताने ३-२ गोलांनी बाजी मारली. सामन्यातील ३९व्या मिनिटाला अरजीत सिंग हुंदाल याने केलेला गोल भारतासाठी निर्णायक ठरला. तिसऱ्या सामन्यात भारताने थायलंडवर ११-० असा सहज विजय मिळवला. अरजीत सिंग हुंदाल, सौरभ आनंद, गुरज्योत सिंगने प्रत्येकी २ गोल करुन भारतीय विजयात मोठी भूमिका बजावली. गटातील शेवटच्या सामन्यात भारताने दक्षिण कोरियाचा ८-१ गोलांनी लीलया पराभव करुन या गटात अव्वल क्रमांक पटकावून आपला उपांत्य फेरीतील प्रवेश पक्का केला. अर्शदीप सिंगने दक्षिण कोरियाविरुद्धच्या सामन्यात ३ गोल करुन भारताचा विजय सोपा केला.उपांत्य फेरीच्या सामन्यात मलेशियावर ३-१ गोलांनी मात करुन भारताने निर्णायक फेरी गाठली.

दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानने जपानचा ४-२ गोलांनी पराभव करुन अंतिम फेरीत मजल मारली. दोन पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारत-पाक संघातील अंतिम लढत अपेक्षेप्रमाणे रंगली. शेवटच्या सत्रात भारताने शानदार खेळ करुन ५-३ गोलांनी ही लढत जिंकून आपले गतवर्षीचे विजेतेपद कायम राखण्यात यंदादेखील यश मिळवले. अंतिम सामन्यातील भारतीय विजयाचा शिल्पकार ठरला तो अरजित सिंग हुंदाल. त्याने तब्बल ४ गोल करुन भारतीय विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने पेनेल्टी कॉर्नरवर ३ शानदार गोल केले. तसेच चौथा मैदानी गोलदेखील केला. सामन्याच्या तिसऱ्या मिनिटाला पाकिस्तानच्या शाहिदीने मैदानी गोल करुन पाकिस्तानचे खाते उघडले. परंतु त्यानंतर मात्र भारताने आक्रमक खेळ करुन पाकिस्तानला रोखण्यात यश मिळविले. भारताने आपली आक्रमणे अधिक जोरदार केली. त्यामुळे दुसऱ्या सत्रापासून खेळाची सूत्रे भारतीय संघाच्या ताब्यात आली.

दुसऱ्या सत्रात २ मिनिटात २ गोल करुन भारताने आघाडी घेतली. त्यानंतर सुफयान खानने गोल करुन भारताची आघाडी कमी केली. तिसऱ्या सत्रात पुन्हा सुफयानने गोल करुन पाकिस्तानला आघाडी मिळवून दिली. मात्र त्यानंतर अरजीतने २ गोल करुन भारताला पुन्हा आघाडी मिळवून दिली. मग हिच आघाडी भारताने भक्कम बचाव करून शेवटपर्यंत टिकवण्यात यश मिळविले. भारतातर्फे धीरज सिंगने या अंतिम सामन्यात एक गोल केला. अंतिम फेरीत पाकिस्तानला चौथ्यांदा नमविण्यात भारताला यश आले. याअगोदर २००४मध्ये ५-२, २०१५मध्ये ६-२ आणि २०२३च्या अंतिम लढतीत २-१ असा विजय भारतीय हॉकी संघाने पाकविरुद्ध मिळविला होता. ब गटात असलेल्या पाकिस्ताननेदेखील आपले प्रतिस्पर्धी बांगलादेश, मलेशिया, ओमान, चीन यांना सहज नमवून या गटात अव्वल क्रमांक पटकावला. त्याच्यापाठोपाठ मलेशियाचा संघ दुसऱ्या स्थानावर होता. अ गटात जपान दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्यामुळे उपांत्य फेरीत बलाढ्य पाकिस्तानशी मुकाबला करावा लागला. पाकिस्तानने ही लढत ४-२ गोलांनी जिंकून अंतिम फेरी गाठली.

भारताने या स्पर्धेत भक्कम बचाव आणि धारदार आक्रमण याची सुंदर झलक पेश करुन जेतेपदाला गवसणी घालण्यात यश मिळविले. भारताने या स्पर्धेत तब्बल ४६ गोल प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध नोंदवले. तर अवघे ७ गोल भारताविरुद्ध झाले. भारताचा आघाडी फळीतील युवा खेळाडू हुंदालने या स्पर्धेत १० गोल करून आपल्या चमकदार खेळाचा ठसा उमटवला. गेल्यावेळी झालेल्या या स्पर्धेतील विजेत्या भारतीय संघात हुंदालचा समावेश होता. खासकरुन पेनेल्टी कॉर्नरवर गोल करण्यात त्याची क्षमता वाखाणण्यासारखी आहे. ज्युनियर विश्वचषक स्पर्धेतदेखील त्याने भारताचे प्रतिनिधित्त्व केले. २०२३चा हॉकी इंडियाचा प्रगतीकारक हॉकीपटूचा जुगराज सिंग पुरस्कार हुंदालला मिळाला होता. सध्या पंजाब-सिंध बँक या बलाढ्य संघातून तो खेळतो. भारतीय आघाडी संघातील बहुतेक सर्वच खेळाडूंनी आपली कामगिरी चोख बजावली. तसेच त्यांना बचाव फळीतील खेळाडूंची योग्य साथ लाभली. भारतीय संघाचा कर्णधार आमीर अली यानेदेखील चांगले नेतृत्त्व करताना भारताची बचाव फळी अधिक सक्षम केली.

अत्यंत गरीब कुटुंबातून पुढे आलेला आमीर अलीचा प्रवास प्रेरणादायी आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असतानादेखील आमीरने संघर्ष करून मिळविलेले यश कौतुकास्पद आहे. भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रित सिंग हे त्याचे प्रेरणास्थान आहे. त्याच्यासारखा खेळ भविष्यात त्याला करायचाय. त्यासाठी अथक मेहनत आणि परिश्रम करण्याची आमीरची तयारी आहे. लवकरच सुरु होणाऱ्या एचआयएल हॉकी लीगमध्ये गोनासिका संघाने आमीरला ३५ लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतले. याच संघाचा कर्णधार मनप्रित सिंग असल्यामुळे आमीर अली खूश आहे. कारण आता त्याला मनप्रितसोबत खेळण्याची प्रत्यक्ष संधी मिळणार आहे. भविष्यात भारतीय सिनियर संघाचे प्रतिनिधित्व करण्याचे आमीरचे स्वप्न आहे. ज्युनियर हॉकी संघाची मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार आणि विश्वातील सर्वोत्तम गोलरक्षक असलेल्या श्रीजेश यांची ही पहिलीच स्पर्धा होती. श्रीजेश यांनी आपल्या नव्या इर्निंगला शानदार सुरुवात केली आहे, असेच म्हणावे लागेल. तेव्हा सध्याच्या घडीला भारतीय हॉकी संघाचे भवितव्य नक्कीच उज्ज्वल आहे. आशिया खंडात आपले वर्चस्व निर्माण करणारा भारतीय हॉकी संघ आता जागतिक हॉकीवरदेखील पुन्हा आपले राज्य सुरु करेल अशी आशा करुया.

Continue reading

ही तर मुंबईला पत्करावी लागलेली नामुष्कीच!

विक्रमी ४२ वेळा भारतीय क्रिकेट विश्वातील मानाची समजली जाणारी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा जिंकणाऱ्या बलाढ्य मुंबई क्रिकेट संघावर यंदाच्या मोसमातील या स्पर्धेतील अ गटातील ६व्या फेरीतील लढतीत दुबळ्या जम्मू काश्मिर संघाविरुद्ध आपल्याच वांद्रे संकुलातील स्टेडियममध्ये लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे...

अखेर जागतिक खो-खो स्पर्धेचे बिगुल वाजले!

गेली अनेक वर्षे भारतीय खो-खो प्रेमी ज्या जागतिक खो-खो स्पर्धेची वाट पाहत होते, अखेर त्याची पूर्तता अखिल भारतीय खो-खो महासंघाने करुन दाखविली. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये पहिल्यावहिल्या जागतिक खो-खो स्पर्धेचे दिमाखदार आयोजन करुन आता या खेळाला जागतिक...

कांबळे कुटुंबियांनी उचलले मर्दानी खेळ जिवंत ठेवण्याचे शिवधनुष्य

पारंपरिक शिवकालीन युद्धकला, मर्दानी खेळ जिवंत ठेवण्याचे मोलाचे कार्य गेली अनेक वर्षे रत्नागिरी येथील कांबळे कुटुंबीय करत आहेत. दिवंगत महादेव व्यायामशाळा वेतोशी, रत्नागिरीच्या माध्यमातून हे कार्य गेली अनेक वर्षे सुरु आहे. सध्या या कार्याचा वारसा वस्ताद सुधीर कांबळे यांनी...
Skip to content