प्रतिवर्षी श्राद्धविधी करणे हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आचारधर्म असून त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पुराणकाळापासून चालत आलेल्या या विधीचे महत्त्व आपल्या ऋषीमुनींनी अनेक धर्मग्रंथांतून लिहून ठेवले आहे. श्राद्धविधी करण्याचे महत्त्व आणि त्याची आवश्यकता या लेखातून आपण जाणून घेऊया.
1. श्राद्ध करणे, हा धर्मपालनाचाच भाग असणे
देव, ऋषी आणि समाज या तीन ऋणांसह पितृऋण फेडणे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. पितरांविषयी आदर बाळगणे, त्यांच्या नावे दानधर्म करणे आणि त्यांना संतोष होईल अशी कृत्ये करणे, हे वंशजांचे कर्तव्य आहे. श्राद्ध करणे, हा धर्मपालनाचाच एक भाग आहे, असे धर्मशास्त्र सांगते.
2. पितर त्यांच्या पुत्रांनी पिंडोदक (पिंड आणि उदक) दिल्यावरच सुखी आणि संतुष्ट होतात. यासंदर्भात ‘पुत्र कोणाला म्हणावे’, याविषयी महाभारतात दिलेला श्लोक पुढीलप्रमाणे आहे.
पुन्नाम्नो नरकाद्यस्मात् त्रायते पितरं सुतः।
तस्मात्पुत्र इति प्रोक्तः स्वयमेव स्वयम्भुवा।। – महाभारत १.७४.३९
अर्थ: मुलगा हा आपल्या पितरांचे (पूर्वजांचे) पुं नामक नरकापासून रक्षण करतो; म्हणून त्याला स्वतः ब्रह्मदेवानेच ‘पुत्र’ म्हटले आहे. या श्लोकानुसार पितरांना सद्गती लाभावी, त्यांना भोगाव्या लागणार्या अनंत यातनांतून त्यांची सुटका व्हावी आणि पितरांनी पितृलोकातून वंशावर कृपादृष्टी ठेवावी, यासाठी पुत्राने श्राद्धादी विधी करावेत. स्वतःला पुत्र म्हणवणार्यांचे ते कर्तव्यच आहे, हे स्पष्ट होते.
3. देवकार्य आणि पितृकार्य टाळू नये
देवपितृकार्याभ्यां न प्रमदितव्यम्। –तैत्तिरीयोपनिषद् १, अनुवाक ११, वाक्य २
अर्थ: देवकार्य आणि पितृकार्य यात कधीही प्रमाद करू नये. ती कार्ये टाळू नयेत.
4. श्राद्धविधी न करणार्यांच्या संदर्भात गीतेतील पुढील श्लोक चिंतनीय आहे
पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः। – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १, श्लोक ४२
अर्थ: अशांचे (श्राद्धविधी न करणार्यांचे) पितर पिंडश्राद्धतर्पणादी क्रिया न केल्यामुळे नरकात जातात. याचाच परिणाम म्हणून आपला अभ्युदय होत नाही.
5. श्राद्धापेक्षा अधिक श्रेयस्कर अन्य काही नाही
सुमंतुऋषी सांगतात, `श्राद्धात् परतरं नान्यत् श्रेयस्करमुदाहृतम्।’ म्हणजे श्राद्धापेक्षा अधिक श्रेयस्कर अन्य काही नाही. याकरिताच विवेकी माणसाने श्राद्ध कधी टाळू नये.
6. देवकार्यापेक्षा अधिक महत्त्वाचे पितृकार्य
ब्रह्मवैवर्तपुराण सांगते, `देवकार्यापेक्षा अधिक महत्त्वाचे पितृकार्य आहे’; म्हणूनच सर्व मंगल कार्यांतही नांदी श्राद्धाचे विधान सर्वप्रथम असते.
7. प्रत्येकासाठी श्राद्ध करणे हेच योग्य
एखाद्याला ‘श्राद्धामध्ये काही अर्थ नाही; म्हणून आपण निवर्तल्यावर आपल्यासाठी श्राद्ध करायला नको’, असे वाटत असेल आणि मृत्यूनंतर श्राद्ध न केल्याने ‘आपण अडकलो आहोत’, अशी जाणीव झाली, तरी तो तसे सांगू शकत नाही. इच्छा पूर्ण न झाल्याने तो दुःखी होऊ शकतो. हे लक्षात घेऊन प्रत्येकासाठी श्राद्ध करणे हेच योग्य आहे.
8. अतृप्त पूर्वजांच्या लिंगदेहांमुळे त्रास होणे
सध्याच्या काळात पूर्वीप्रमाणे कोणी श्राद्धादी विधी, तसेच साधनाही करत नसल्याने बहुतेक सर्वांनाच अतृप्त पूर्वजांच्या लिंगदेहांमुळे त्रास होतो. आपल्याला पूर्वज त्रास देत आहेत किंवा पूर्वजांमुळे त्रास होण्याची शक्यता आहे, याविषयी उन्नतच (संतच) सांगू शकतात. तसे सांगणारे उन्नत न भेटल्यास पुढे दिल्याप्रमाणे काही त्रास पूर्वजांमुळे होऊ शकतात. घरात सातत्याने भांडणे होणे, एकमेकांशी न पटणे, नोकरी न मिळणे, घरात पैसा फार काळ न टिकणे, एखाद्याला गंभीर आजार होणे, सर्व परिस्थिती अनुकूल असूनही लग्न न होणे, पती-पत्नीचे न पटणे, गर्भधारणा न होणे, गर्भधारणा झाल्यास गर्भपात होणे, अपत्य जन्माला आल्यास मतीमंद किंवा विकलांग जन्माला येणे आणि कुटुंबातील एखाद्याला व्यसन लागणे.
श्राद्धविधी केल्याने पितर संतुष्ट होतात. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद लाभतात. तसेच मर्त्यलोकात अडकलेल्या पूर्वजांना गती मिळाल्याने त्यांच्यामुळे होणार्या त्रासांचे निवारण होते. पूर्वजांना पुढील गती मिळावी आणि अतृप्त पूर्वजांचा त्रास होऊ नये, म्हणून नियमितपणे साधना करणेही आवश्यक आहे. यासाठी श्राद्धविधीला जोडून पितृपक्षात अधिकाधिक वेळ, तसेच अन्य काळात प्रतिदिन किमान 1 ते 2 तास ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप सर्वांनी करायला हवा.
संदर्भ: सनातन संस्थेचा ग्रंथ ‘श्राद्ध’
संपर्क: 9920015949

