Wednesday, July 3, 2024
Homeमाय व्हॉईसराहुलजींनी आपल्या आईचे...

राहुलजींनी आपल्या आईचे ऐकले असते तर..

आत्याबाईला मिशा असत्या तर.. मी म्हणेन ती पूर्व दिशा झाली तर.. राजकारणात जरतरला काही किंमत नाही. प्रत्येक नेता हेच सांगत असतो. आता बघा ना.. काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांनी दिलेला सल्ला जर, आता त्यांची चालते त्या खासदार राहुल गांधींनी मानला असता तर महाराष्ट्रात काँग्रेसची एक जागा निश्चितच वाढली असती. पुण्यात काँग्रेसच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर लोकसभा निवडणुकीत आपटले. सोनिया गांधींनी पुण्यामधून काँग्रेसचे ज्येष्ठ निष्ठावंत नेते माजी आमदार अनंत गाडगीळ यांना उमेदवारी देण्याचा सल्ला दिला होता. मात्र महाराष्ट्र काँग्रेसमधल्या ओबीसी नेत्यांनी पक्षातले डिसिजनमेकर राहुल गांधी यांच्यावर असा काही दबाव टाकला की राहुलजींनी सोनिया गांधींचा म्हणजे आपल्या आईचा सल्ला न मानता रवींद्र धंगेकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. परिणामी काँग्रेसला महाराष्ट्रात एक जागा गमवावी लागली.

पुण्यातून यावेळी रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्याचे मुख्य कारण होते की ते ओबीसी समाजातून येतात आणि भारतीय जनता पार्टीच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत त्यांनी भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा पराभव केला होता. पुण्यातला कसबा विधानसभा मतदारसंघ पुणे लोकसभा मतदारसंघात येतो. याचा अर्थ असा नाही की संपूर्ण लोकसभा मतदारसंघ कसबा आहे आणि या मतदारसंघाचे बादशाह धंगेकर आहेत. जसे काँग्रेसच्या हायकमांडला हे कळले नाही तसेच धंगेकरांनाही कळले नाही. त्यांनाही असेच वाटले की मी रवींद्र धंगेकर.. काँग्रेस काय, भाजपा काय आणि इतर कोणताही पक्ष. मी रवींद्र धंगेकर.. बस याच मुद्द्यावर ते निवडणुकीच्या आखाड्यात उतरले. प्रचारात त्यांच्याकडून लावण्यात आलेल्या बॅनर्समध्येही काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना थारा नव्हता. ना सोनियाजींचे छायाचित्र ना राहुल गांधींचे. नाना पटोले ना कोणी अन्य काँग्रेस नेत्याचे. त्यांनी निवडणूक चिन्हाला स्थान दिले होते जे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे होते. बाकी सर्व काही रवींद्र धंगेकर. याचाच परिणाम लोकसभा निवडणुकीच्या निकालात दिसला. प्रत्येक जण पंतप्रधान नरेंद्र मोदी होऊ शकत नाही. यावेळच्या लोकसभा निवडणुकीत भाजपा स्वतःच्या नावावर नाही तर नरेंद्र मोदींच्या नावावर निवडणूक लढला. पूर्ण बहुमतात आला नाही. पण बहुमताच्या जवळ पोहोचला. ते नरेंद्र मोदी आहेत आणि तुम्ही धंगेकर.. हे ते विसरले आणि परिणाम समोर आला.

राहुल

मग आता विचार असा येतो की रवींद्र धंगेकरांच्या डोक्यात इतकी हवा का गेली? तर त्याचेही कारण तसेच आहे. धंगेकर पाच वर्षे महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसेचे पुणे महापालिकेतले नगरसेवक होते. नंतर ते शिवसेनेचे पाच वर्षे नगरसेवक राहिले. त्यानंतर अपक्ष म्हणून त्यांनी आणखी पाच वर्षे नगरसेवकपद भूषवले. हे करत असतानाच अखेरच्या टप्प्यात त्यांनी स्वतःला काँग्रेसशी संलग्न केले. अपक्ष म्हणून आपण निवडून येऊ शकतो याच एका मुद्द्यावर त्यांना स्वतःबद्दल इतका कॉन्फिडन्स निर्माण झाला की ते पक्ष विसरले, संघटना विसरले आणि मी म्हणजेच आय स्पेशालिस्ट झाले. तिथेच सगळा गेम फिरला. टांगा पलटी आणि घोडे पसार.. 

भाजपा हा काही साधासुधा पक्ष नाही. भाजपाचे नेते जितके वरच्या स्तरावर काम करतात तितके ते जास्त बेरके असतात. मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने पुण्याच्या कोथरूडच्या तेव्हाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापून तेव्हाचे प्रदेशाध्यक्ष आणि विधान परिषदेचे सदस्य कोल्हापूरवासीय चंद्रकांतदादा पाटील यांना कोथरूडमधून उमेदवारी दिली. मेधा कुलकर्णी या ब्राह्मण समाजाच्या. पुणे लोकसभा मतदारसंघांमध्ये ब्राह्मण समाज साधारणतः ३० टक्के आहे. कोथरूडमध्ये तो सर्वाधिक आहे. हा भाजपासाठी अत्यंत सुरक्षित मानला जाणारा मतदारसंघ दादांसाठी मोकळा केला गेल्याने पुण्यातला संपूर्ण ब्राह्मण समाज अस्वस्थ झाला. तो राग त्यांनी गिळला. चंद्रकांतदादा आमदार म्हणून निवडून आले. नंतरच्या काळात विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुका झाल्या. यामध्ये आमदारांना मतदान करायचे होते. भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप तसेच मुक्ता टिळक कॅन्सरने गंभीर आजारी होते. मात्र त्यांना ॲम्बुलन्समधून पुण्याहून मुंबईला आणून या दोघांकडूनही भाजपाने मतदान करवले. इतकेच नव्हे तर पुण्याचे तेव्हाचे लोकसभेचे खासदार गिरीश बापट यांना त्यांच्या नाकातोंडात ऑक्सिजनच्या नळ्या असताना त्यांना दोन वाक्याची स्टेटमेंट करण्यासाठी याच भाजपाने मैदानात उतरवले.

मुक्ता टिळक तसेच गिरीश बापट हे दोन्हीही भाजपाचे नेते ब्राह्मण समाजाचे होते. कालांतराने मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप आणि गिरीश बापट यांचे निधन झाले. त्यामुळे विधानसभेच्या पोटनिवडणुकाही लागल्या. मुक्ता टिळक यांच्या परिवारातले सदस्य कसबा मतदारसंघासाठी उमेदवारी मिळावी म्हणून आग्रही होते. पुण्यातल्या संपूर्ण ब्राह्मण समाजाचेही तेच मत होते. मात्र भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्याचा आग्रह धरला आणि मोहोळ कसब्यात भाजपाचे उमेदवार झाले. त्याचवेळी काँग्रेसने धंगेकर या ओबीसी चेहऱ्याला मैदानात उतरवले. धंगेकरांचा पूर्व राजकीय इतिहास आणि त्यांचे टिळक कुटुंबाशी असलेले संबंध पाहतच काँग्रेसच्या नेत्यांनी हा निर्णय घेतला. त्याचा रिझल्ट मिळाला. ब्राह्मण समाजाने भाजपाला आपले महत्त्व पटवून दिले. कोणत्याही परिस्थितीत भाजपाला मत द्यायचे नाही या मानसिकतेतून ब्राह्मण समाजाची एकगठ्ठा मते धंगेकरांच्या बाजूने पडली. आणि धंगेकर ११ हजार मतांनी निवडून आले. गेल्या वर्षाचीच ही गोष्ट होती. त्यामुळेच यावेळी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून धंगेकरांच्या नावाचा आवर्जून विचार केला गेला.

पुणे लोकसभा मतदारसंघात ब्राह्मण समाजाचे वर्चस्व आणि महत्त्व किती आहे हे काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना चांगलेच ठाऊक आहे. काँग्रेसमधल्या निष्ठावंत घराण्याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. काकासाहेब गाडगीळ, बॅ. विठ्ठलराव गाडगीळ आणि त्यांचे सुपुत्र अनंतराव गाडगीळ यांचे घराणे काँग्रेसशी किती एकनिष्ठ आहे हे त्यांना चांगलेच माहित आहे. त्यामुळेच जेव्हा त्यांच्या अधिकारात होते तेव्हा त्यांनी अनंतरावांना विधान परिषदेचे सदस्यत्व दिले होते. या सदस्यत्वाच्या काळात गाडगीळांनीही आपल्या पदाला पूर्ण न्याय दिला. ज्या ठिकाणी आमदारांचा निधी पोहोचू शकत नाही अशा अनेक ठिकाणी आपल्या निधीचा वापर करत त्यांनी कोरोनाच्या काळात असंख्य लोकांना मदत केली. त्यामुळे जेव्हा लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांचा विचार झाला त्यावेळी सोन्याजींनी अनंत गाडगीळ यांचे नाव सुचवले. मात्र त्यावेळी महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या ओबीसी नेत्यांनी, मग त्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आले, अशा नेत्यांनी ओबीसी उमेदवाराचा आग्रह धरला आणि धंगेकराना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली.

आता पुणे लोकसभा मतदारसंघाची रचना पाहा. यामध्ये वडगाव शेरी, कोथरूड, शिवाजीनगर, कसबा, पर्वती, कॅन्टोन्मेट असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यातल्या कोथरूड, शिवाजीनगर, कसबा आणि पर्वती यामध्ये ब्राह्मण समाजाची संख्या लक्षात घेण्यासारखी म्हणजे साधारण ३० टक्के आहे. धंगेकर ज्या कसब्यातून निवडून आले तेथे १० टक्के ब्राह्मण समाज आहे. त्यामुळेच या निवडणुकीआधी धंगेकरांनी कसब्यात २२ जानेवारीला अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा जंगी कार्यक्रम केला. हा कार्यक्रम पाहता धंगेकर हिंदुत्ववादी नेते आहेत की काँग्रेसचे, असा प्रश्न अनेकांना पडला.

कसब्यातच पुर्णेश्वर मंदिर हे छोट्या स्वरूपातले अयोध्येतले श्रीराम मंदिर आहे. तिकडे बाबरी मशीद आणि राम मंदिर याचा वाद रंगला होता. तसाच वाद येथेही आहे. तो राष्ट्रव्यापी होता. हा कसबाव्यापी आहे. साधारण सहा महिन्यांपूर्वी येथे दोन्ही बाजूंच्या समाजाचे कार्यकर्ते समोरासमोर आले. दंगलीकडे वाटचाल होणारच होती. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि प्रकरण पुढे चिघळले नाही. या काळात दोन्ही समाजाच्या नेत्यांनी स्थानिक आमदार धंगेकर यांच्याशी सातत्याने संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु धंगेकर साहेब आपला मोबाईल स्विच ऑफ करून बसले होते. याची परतफेड दोन्ही बाजूंच्या मतदारांनी या निवडणुकीत केली गेली, असे या परिसरात बोलले जाते.

पुणे लोकसभा मतदारसंघातल्या वडगाव शेरी विधानसभेत मोहोळ यांना एक लाख १९ हजार ७३८ मते मिळाली तर धंगेकर यांना एक लाख चार हजार ७५३ मते मिळाली. मोहोळना १४९८५ मतांचा लीड मिळाला. कोथरूडमध्ये मोहोळ यांना एक लाख ४१ हजार ९२८ मते मिळाली तर धंगेकरांना ६७ हजार ६७१ मते मिळाली. येथे मोहोळ यांना तब्बल ७४२५७ मतांचा लीड मिळाला. शिवाजीनगरमध्ये मोहोळ यांना ६८ हजार १५२ मते मिळाली तर धंगेकरांना ६४ हजार ८१५ मते मिळाली. येथे मोहोळ यांना फक्त ३३३७ मतांचा लीड मिळाला. कसब्यात म्हणजे जेथून धंगेकर निवडून आले तेथे मोहोळ यांना ८७ हजार ५६५ मते मिळाली तर धंगेकरांना ७३ हजार ८२ मते मिळाली. आपण आमदार असलेल्या मतदारसंघातही धंगेकरांना लीड घेता आला नाही. तेथे ते १४४८३ मतांनी पिछाडीवर राहिले. पर्वतीत मोहोळ यांना एक लाख ३५४२ मते मिळाली तर धंगेकरांना ७४५४५ मते मिळाली. येथे मोहोळ यांना २८९९७ मतांचा लीड मिळाला. कॅन्टोन्मेंटमध्ये मोहोळ यांना ६३ हजार२४३ मते मिळाली तर धंगेकर यांना ७६ हजार ५४३ मते मिळाली. फक्त याच विधानसभा मतदारसंघात धंगेकर यांना लीड मिळाला. तोही १३३०० मतांचा. त्यामुळे या निवडणुकीत मोहोळ यांनी धंगेकर यांचा तब्बल एक लाख २३ हजार ३८ मतांनी पराभव केला. 

या लोकसभा निवडणुकीत प्रथमच काँग्रेसने महाराष्ट्रात एकाही ब्राह्मण चेहऱ्याला उमेदवारी दिली नाही. मग ते पुणे असो. नागपूर असो. ठाणे, डोंबिवली असो. नाशिक असो की मुंबईतला गिरगाव पार्ले परिसर असो. जेथे ३० ते ३५ टक्के ब्राह्मण वा उच्चवर्णीय समाजाचे मतदार आहेत अशा ठिकाणीही काँग्रेसने या समाजाची अवहेलना केली. मागच्या १६ लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने असे कधीच केले नाही. काकासाहेब गाडगीळ, विठ्ठलराव गाडगीळ, सुरेश कलमाडी, वसंत साठे, एच. आर. गोखले, र. के. खाडिलकर, आबासाहेब कुलकर्णी असे अनेक चेहरे काँग्रेसने दिले. महाराष्ट्रातल्या विधान परिषदेचे बराच काळ सभापतीपद भूषविलेले जयंतराव टिळक काँग्रेसचेच. तेव्हाच्या नेतृत्त्वाने कधीच ब्राह्मण समाजाचा रोष पत्करला नव्हता. मात्र यावेळी बहुजन समाजाचे आपणच तारणहार आहोत हे दाखविण्याच्या प्रयत्नात काँग्रेसने ही भूमिका घेतली. आणि त्याचा फटका काँग्रेसला बसला. भाजपा अजूनही ब्राह्मण वा तत्सम उच्चवर्णीय समाजाला पुरेसे स्थान देतो. जेव्हा तेही बहुजन समाजाचेच आम्ही पाईक असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करतील तेव्हा हा समाज भाजपालाही त्यांची जागा दाखवून देईल ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

Continue reading

बाहेर आरडणे वेगळे आणि घटनात्मक पद सांभाळणे वेगळे!

लोकसभेतल्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी नुकताच संपन्न झाला. या शपथविधीत शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य रवींद्र वायकर यांनी खासदारकीची शपथ घेतली. वायकर पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून गेले, तेही फक्त 48 मतांनी! त्यानंतर जे काही रामायण महाराष्ट्रातल्या जनतेने काही ठराविक वृत्तवाहिन्यांवर पाहिले, अनुभवले ते...

वायकरांची शपथ आणि सारेकाही चिडीचूप..

उत्तर पश्चिम मुंबईच्या निवडणूक अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी फोन केल्यानंतर त्यांनी वायकरांना विजयी जाहीर केले. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी सर्वात भ्रष्ट अधिकारी आहेत. वायकरांच्या मेव्हण्याने निवडणूक कर्मचाऱ्याच्या फोनच्या मदतीने ईव्हीएम मशीन हॅक केले. आम्ही वायकरांना लोकसभेत सदस्यत्वाची शपथ घेऊ...

राहुल गांधी, ठाकरेंना जायचंय कुठे? आदमबाबाच्या काळात??

मुंबईतला उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चेचा विषय झाला आहे की काय, असा प्रश्न पडतो. कारण फक्त एकच, की येथे शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर अवघ्या 48 मतांनी विजयी झाले. वायकर यांचा विजय अगदी निसटता झाला असला तरी...
error: Content is protected !!