गेले वर्षभराच्या कोरोनामुळे आपल्याच देशाची नव्हे तर जगभराच्या देशांच्या अर्थव्यवस्थेत घसरण झालेली दिसून येते. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत उणे २३ इतकी घट झाल्याने अनेकांनी टीकेची झोड उठवली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अलिकडच्या ताज्या अहवालानुसार भारतीय अर्थव्यवस्था ११ टक्क्यांनी वाढेल जी जगात सर्वोत्तम असेल. गेल्या वर्षी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जवळपास अडीच तास आपलं भाषण केलं. हे पाहता सोमवारी सादर होणारा अर्थसंकल्प कसा असेल याची उत्सुकता केवळ देश-परदेशासह गुंतवणूकदार, व्यापारी कारभारी यांच्यातच नव्हे तर सर्वत्र आहे.
वास्तविक पाहता अर्थसंकल्प हा शब्द मराठीत फारसा वापरला जात नाही. सर्रास बजेट अशीच त्याची ओळख आहे. आपण बहुतांश प्रणाली आपले ब्रिटिश शासक यांच्याकडून उचलली असली तरी बजेट हा शब्द मात्र फ्रेंच भाषेशी निगडित आहे. यामागे इतिहास असा सांगितला जातो, १७३३ साली ब्रिटिश पंतप्रधान नि अर्थमंत्री (चान्सलर ऑफ एक्सचेकर) रॉबर्ट वॉलपोल देशाच्या आर्थिक स्थितीचा लेखाजोखा मांडण्यासाठी आपल्या भाषणासाठी संबंधित कागदपत्रे चामड्याच्या एका थैलीत घेऊन आले. अशा प्रकारच्या बॅगेला फ्रेंच भाषेत बुजेट म्हटले जाते. इतकेच बस.. यावरूनच या परंपरेला प्रारंभी बुजेट संबोधले गेले नि पुढे कालांतराने बजेट या अपभ्रंशित शब्दाची योजना झाली. हेच ते आपले बजेट!
भारतीय संविधानच्या अनुच्छेद ११२नुसार केंद्र सरकारला संसदेच्या दोन्ही सभागृहात दरवर्षी वार्षिक वित्तीय विवेचन ठेवणं बंधनकारक आहे. या वार्षिक विवरणात तीन स्वतंत्र भागात सरकारच्या आवक नि खर्चाचा तपशील सादर करावा लागतो. ते या प्रकारे भारताचा संचित निधी, आपत्कालीन निधीची तरतूद, लोकलेखा संसदीय वित्तीय कामकाजात सर्वसाधारण बजेट, पुरवणी मागण्या, अनुदान, लेखानुदान, विनियोजन विधेयक आणि वित्त विधेयक. देशभर ज्या बजेटची चर्चा जोरजोरात होत असते त्या बजेट शब्दाची, वास्तविक पाहता देशाच्या संविधानात कुठेही तरतूद, उल्लेखही नाही. तरीही आपण याचा धोशा लावतो!
देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री म्हणून गेल्या वर्षी पहिले बजेट २०२० सादर करणाऱ्या निर्मला सीतारामन यांनी तेव्हा १७ वर्षे जुने रेकॉर्ड मोडीत काढले. त्यांनी दोन तास ४१ मिनिटे भाषण ठोकले. सर्वाधिक मोठ्या भाषणाची नोंद त्यांनी केली. याआधी ही नोंद २००३ सालात तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री असलेल्या जसवंतसिंह यांच्या नावे होती. वित्तमंत्री म्हणून त्यांनी २ तास १३ मिनिटे भाषण केले. शाब्दिक संख्येचा विचार करता सर्वाधिक लांबीचे भाषण करण्याचा विक्रम १९९१ सालात वित्तमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या नावे आहे. त्यावेळेस त्यांनी १८ हजार १७७ शब्दांचा वापर केला होता. कमी शब्दांचा विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कालावधीत अर्थमंत्री झालेल्या अरुण जेटली यांनी केला. २०१४ सालात आपलं पहिलं बजेट सादर करताना त्यांनी १३० मिनिटे घेतली होती. तर सर्वात कमी शब्दांचे म्हणजे केवळ आठशे शब्दात अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम १९७७मध्ये अंतरिम बजेट सादर करताना एच एम पटेल यांनी आपल्या नावे केला, जो आजपर्यंत कोणी मोडला नाही नि पुढे कोणी मोडेल असे दिसत नाही!
आतापर्यंत देशाच्या इतिहासात सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम मोरारजी देसाई यांनी स्वतःच्या नावे करून ठेवला आहे. तोही अबाधित राहणार हीच शक्यता जास्त आहे. त्यांनी दहावेळा वित्तीय विवरण पत्र संसदेला सादर केले. त्यांच्या नावे दुसराही एक रेकॉर्ड आहे. त्यांचा जन्म लीप वर्षात म्हणजे २९ फेब्रुवारी रोजी झाला असल्याने त्यांनी दोन वेळा आपल्या जन्मदिनी बजेट मांडले आहे. स्वतंत्र भारताच्या पहिल्या बजेटची मांडणी आर के शनमुखम यांनी केली. हे अंतरिम बजेट होते. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधीदेखील वित्तमंत्री पदावर होते. इंदिराजींनी पंतप्रधान असताना १९६९ सालात हा प्रभाग हाताळला होता. दुसऱ्या स्थानी पी. चिदंबरम आहेत. त्यांनी नऊ वेळा संसदेला अर्थसंकल्प सादर केला. तर अलिकडेच राष्ट्रपती राहिलेले प्रणब मुखर्जी यांनी आठ वेळा, यशवंतराव चव्हाण, यशवंत सिन्हा, सी डी देशमुख यांनी सात वेळा, डॉ. मनमोहन सिंग यांनी सहा वेळा, अरुण जेटली यांनी पाच वेळा याचं सादरीकरण केले आहे. देशात बदलते राजकारण, मोदी सरकारविरुद्ध निर्माण केला जात असलेला आक्रोश, सीमांवरील तणावाची स्थिती, आंतरराष्ट्रीय राजकारण, उद्योगधंद्यांची स्थिती, पेट्रोल डिझेलचे भडकते भाव, अशा अनेक बाबी याची सांगड घालून अर्थव्यवस्थेवर होणारे दृश्य-अदृश्य परिणाम याचा विचार करून हा अर्थसंकल्प कसा असू शकेल याची उत्सुकता आर्थिक राजकीय तज्ज्ञांना लागली आहे. तो कसाही असला तरी विरोधक टीका करणारच हे गृहीत धरावेच लागेल. अलीकडच्या राजकारणात चांगल्याला चांगले म्हणण्याची प्रथा, दानत दिसत नाही हे देश ओळखून आहे. तूर्त थांबा नि वाट पाहा इतकेच!