कोरोनाला रोखण्याबाबत आवश्यक असलेली महाराष्ट्रातली कामे संथ गतीने सुरू असून त्याची गती वाढवणे गरजेचे आहे असे सांगत केंद्राने दिलेल्या राष्ट्रीय आरोग्य निधीपैकी किती खर्च झाला याची माहिती राज्य सरकारकडून दिली जावी, अशी मागणी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज एका पत्रकार परषदेत केली.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज मुंबई आणि राज्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि ओमायक्रॉन याबाबत राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांबरोबर आढावा बैठक घेतली. त्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी त्या बोलत होत्या.
महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांतील रुग्ण्संख्या अतिशय वेगाने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव सातत्याने सर्व राज्यातील आरोग्य सचिवांशी चर्चा करत आहेत आणि बदलत्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. राज्यातील चाचण्यांची संख्या वाढवण्याच्या सूचना दिल्या असून चाचणी किट्स खरेदी करण्यासाठी राज्यांना निधी दिला आहे. याशिवाय केंद्राने लसींसह इतरही सर्व मागितलेली मदत दिलेली आहे. त्याचा सुयोग्य वापर आणि अंमलबजावणी करणे हे राज्याचे काम आहे, असे त्या म्हणाल्या.
मुंबईमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे ही काळजीची गोष्ट असून हा व्हायरसविरोधातील लढा आहे हे लक्षात घेऊन सर्वांनी सतर्क राहायला हवे, मार्गदर्शक सूचनाचे पालन करायला हवे, असेही डॉ. पवार यांनी सांगितले.
राज्यात कोविडचे रुग्ण मागच्या काही आठवड्यात वाढत आहेत. त्याबरोबरच ओमायक्रॉनचे रुग्णदेखील वाढत आहेत. आताच काळजी घेतली तर आणखी होणारा प्रसार रोखता येईल. रुग्णांची संख्या वाढली तर काय काळजी घ्यायला हवी तसेच त्या-त्या राज्यांनी काय निर्णय घ्यावे यासंदर्भात तसेच आयसीयु आणि अन्य बेडस यांची उपलब्धता याबाबत केंद्राने यापूर्वीच मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, असेही त्या म्हणाल्या.

