गोव्यात आजपासून सुरू होत असलेल्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील बाल्यावस्थेतील धैर्य, सर्जनशीलता आणि स्वप्नांचा शोध घेणाऱ्या पाच चित्रपटांचे सादरीकरण होणार आहे. यावेळी इफ्फी पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्र बालक निधी (युनिसेफ)बरोबर भागीदारी करणार असून चालत्या-बोलत्या, आव्हान देणाऱ्या आणि प्रेरित करणाऱ्या कहाण्यांच्या माध्यमातून बाल्यावस्थेच्या विविध छटा, त्यातील नवल, संघर्ष प्रेक्षकांसमोर सादर होणार आहे.
युनिसेफ एक्स इफ्फी यांचे सहयोगपूर्ण नाते 2022मध्ये प्रथम सुरु झाले. या सहयोगाच्या चौथ्या वर्षी, लहान मुलांचे हक्क आणि चित्रपट महोत्सव यांच्या जगातील दोन प्रख्यात ब्रँड्स एकत्र येत आहेत. यंदा लहान मुलांचे धैर्य, सर्जनशीलता आणि आशावाद सादर करतानाच, विविध संस्कृतींमध्ये मुलांना भेडसावणाऱ्या वास्तवाला भिडणारे चित्रपट दाखवले जाणार आहेत.
पाच चित्रपट, एक वैश्विक कहाणी
यावर्षी या विभागात जगभरातून कोसोव्हो, दक्षिण कोरिया, इजिप्त आणि भारत या देशांतील पाच चित्रपट सादर होणार आहेत. यापैकी प्रत्येक चित्रपट आपल्यासमोर बालपणातील मालकीचा शोध, सन्मानासाठीचा लढा, प्रेमाची आस आणि स्वातंत्र्याचे स्वप्न, अशा वेगवेगळ्या संकल्पनांचे वास्तव उभे करतो. एका सूत्रात गुंफलेल्या या कथा, युनिसेफ आणि इफ्फीची सामायिक भावना, हृदयाची दारे उघडण्याच्या प्रक्रियेत कथाकथनाच्या सामर्थ्यावरील विश्वास व्यक्त करणाऱ्या आहेत. हे चित्रपट पुढीलप्रमाणेः

1. हॅपी बर्थडे (इजिप्त/इजिप्शियन अरेबिक भाषा)
इजिप्तच्या चित्रपट निर्मात्या सारा गोहर यांचा हॅपी बर्थडे, हा पदार्पणातील चित्रपट त्रिबेका चित्रपट महोत्सव 2025मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. इजिप्ततर्फे तो ऑस्कर पारितोषिकासाठीदेखील नामनिर्देशित झाला आहे. हा चित्रपट आजूबाजूचे विश्व पराकोटीचे प्रतिकूल असूनही, सर्वात आवडती मैत्रीण नेली हिच्या वाढदिवसासाठी एक उत्कृष्ट समारंभ आयोजित करण्याचा निश्चय केलेल्या आठ वर्षांच्या तोहा या घरकाम करणाऱ्या मुलीची गोष्ट सांगतो. आधुनिक काळातील कैरो शहराच्या पार्श्वभूमीवर घडणारा हा चित्रपट विशेष लाभ आणि निष्पापपणा यातील तीव्र विभागणी उघड करतो आणि लहान मुले अनेकदा मोठ्या माणसांपेक्षा मानवतेला अधिक स्वच्छपणे पाहू शकतात, हे दाखवून देतो.

2- कडाल कण्णी (भारत/तमिळ भाषा)
तमिळ चित्रपट निर्माते दिनेश सेल्वराज यांचा कडाल कण्णी हा गीतमय चित्रपट अनाथ मुलांच्या भावविश्वाचे दर्शन घडवतो. या मुलांच्या स्वप्नामध्ये देवदूत आणि जलपऱ्या येतात. प्रेम/काळजी, निवांतपणा कोणाशीतरी जोडल्याची भावना याच्या प्रतीकांची स्वप्ने पाहणारे जग यात रंगवले आहे. वास्तव आणि मनोरथ यांचा मिलाफ घडवून हा चित्रपट अशा कल्पना मांडतो ज्यांच्या बळावर ती बालके कष्टमय जीवनातही तग धरू शकतात. उत्तम काव्य आणि करुणा यांच्या सहाय्याने हा चित्रपट प्रत्येक बालकाचा स्वप्ने बघण्याचा, लोकांचा नजरेत राहण्याचा आणि प्रेम करून घेण्याचा अधिकार व्यक्त करतो.

3- पुतुल (भारत/हिंदी भाषा)
भारतीय चित्रपट निर्माते राधेश्याम पिपलवा यांचा पुतुल चित्रपट, आई-वडिलांच्या घटस्फोटाच्या भावनिक वादळात सापडलेल्या सात वर्षांच्या मुलीचे दर्शन घडवतो. दुखावलेल्या आणि गोंधळलेल्या त्या मुलीला तिच्या लाडक्या आजोबांमध्ये आणि ‘डॅमेज्ड गँग’ नावाच्या मित्रमैत्रिणींच्या गटामध्ये विसावा मिळतो. ती नाहीशी झाल्यावर तिच्या पालकांना त्यांच्या भीतीचा आणि स्वतःच्या अंतरंगातील कच्च्या दुव्यांचाही सामना करावा लागतो. दुभंगलेल्या कुटुंबातील बालकांचे मूकपणे सहन करत राहणे ‘पुतुल’मधून परिणामकारकपणे समोर येते. प्रेम, समजून घेतले जाणे आणि सुरक्षा याचा प्रत्येक बालकाला असलेला अधिकार या चित्रपटातून जाणवतो.

4- द बीटल प्रोजेक्ट (कोरिया/कोरियन भाषा)
कोरियन चित्रपट निर्माते जिन क्वांग-क्यो यांच्या हृदयस्पर्शी अशा ‘द बीटल प्रोजेक्ट’ चित्रपटाचा पहिला खेळ, शिकागोमध्ये ‘द एशियन पॉप अप’मध्ये झळकला होता. चित्रपट सुरू होतो तोच एका प्लास्टिकच्या पिशवीतील ढेपक्यापासून. उत्तर कोरियातील हा ढेपका (बीटल) दक्षिण कोरियातील एका मुलीच्या हाती लागतो. त्या ढेपक्यामुळे कोरियन सीमेच्या दोन्ही बाजूच्या बालकांमध्ये कुतूहल आणि एकमेकांशी जोडल्याची भावना उत्पन्न होते. तो ढेपका देशकालाच्या सीमा भेदून दोन्हीकडे वाटणाऱ्या नवलाईचे प्रतीक बनतो. काहीशा स्नेहभावनेने आणि विनोदी अंगाने उलगडत जाताना हा चित्रपट कुतूहल, सहभावना आणि अतिशय दूरवरच्या ‘अंतरांना’ जोडणारी निरागस आशा यांचे उदात्त रूप मांडतो.

5. द ओडिसी ऑफ जॉय (Odiseja e Gëzimit) (फ्रान्स, कोसोव्हो/अल्बेनियन, इंग्रजी, फ्रेंच, रोमानी भाषा)
कोसोवन चित्रपट निर्माते झजिम तेर्झिकी यांचा ‘ओडिसी ऑफ जॉय’ हा चित्रपट कैरो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कथा नवीन सहस्रकाच्या पहाटे उलगडते. 11 वर्षांचा लिस, त्याचे वडील युद्धात बेपत्ता आहेत, ते दुःख आणि जगण्याचा संघर्ष या दुहेरी आव्हानांचा सामना करत आपली वाट शोधत आहे. आणि जेव्हा तो युद्धानंतरच्या कोसोवोमधून स्थानिक मुलाचं मनोरंजन करण्यासाठी प्रवास करणाऱ्या फ्रेंच विदुषकांच्या गटात सामील होतो, तेव्हा लिसचा मानसिक उभारीच्या दिशेने एक शांत प्रवास सुरू होतो. त्याला उमगतं, की एकदा गमावलेली आशा परत मिळवता येते. सौम्य, पण गहन विचार मांडणारा हा चित्रपट संघर्षातही बालपण जपणारी चिकाटीची भावना टिपतो.

