Wednesday, February 5, 2025
Homeकल्चर +गुलमोहरः एक हृदय...

गुलमोहरः एक हृदय पिळवटून टाकणारा कौटुंबिक चित्रपट!

गोवा येथे आयोजित 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘भारतीय पॅनोरमा’ विभागामध्ये राहुल व्ही. चित्तेला लिखित, दिग्दर्शित ‘गुलमोहोर’ हा चित्रपट सादर झाला. हा चित्रपट, बात्रा कुटुंबातील विविध सदस्यांच्या वैयक्तिक कथांच्या गुंफणीतून कुटुंब आणि घर यांचे अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतो.

यानिमित्ताने पत्र सूचना कार्यालयातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत संवाद साधताना, ‘गुलमोहोर’ या चित्रपटात मुख्य भूमिका करणारे अभिनेते मनोज बाजपेयी म्हणाले की दिग्दर्शकाने चित्रपटाच्या सेटवर निर्माण केलेले घरगुती वातावरण ‘कुटुंब’ या विषयावर आधारित हृदयस्पर्शी चित्रपटाचे चित्रीकरण करताना एखाद्या कार्यशाळेसारखे उपयुक्त ठरले. कुटुंब ही संकल्पना आणि त्यातील भावना चित्रीकरणाच्या पल्याड पोहोचली होती. कॅमेऱ्यासमोर आम्ही वडील, मुलगा, मुलगी, आई अशी पात्रे रंगवत होतो आणि चित्रीकरण संपल्यानंतर आम्ही एखाद्या कुटुंबाप्रमाणेच एकत्र येऊन आपापल्या कल्पना, हास्य आणि जेवण यांचीही देवाण-घेवाण करत होतो. या वातावरणाने सर्व तरुण कलाकारांना आपापल्या भूमिकेत शिरण्यास आणि त्या भूमिकेचे बारकावे समजून घेण्यास मदत केली. एक कुटुंब, त्यातील सदस्य आणि त्यांचे आपापसांतील नातेसंबंध हा चित्रपट दर्शवतो. या घरगुती वातावरणाशिवाय हे शक्य झाले नसते, असे बाजपेयी म्हणाले. 

रंगभूमीकडून चित्रपटांच्या दिशेने झालेल्या स्थित्यंतराबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मनोज बाजपेयी म्हणाले की ते सर्वप्रथम स्वतःला रंगभूमीवरील कलाकार मानतात. ‘बँडीट क्वीन’ या चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर कपूर यांनी, भविष्यात रंगभूमीवरील कलाकारांना आर्थिक अडचणींमुळे ज्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकेल अशा समस्या अधोरेखित केल्या आणि आपल्याला चित्रपटांचा मार्ग स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन दिले, अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली. “रंगभूमी हे अभिनेत्याचे माध्यम आहे तर चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे”, अशा शब्दात रंगभूमीचे महत्त्व अधोरेखित करत ते म्हणाले, मी जेव्हा एखाद्या चित्रपटाचा भाग असतो तेव्हा त्यातील माझ्या कामगिरीचे श्रेय घेणे मला कठीण जाते कारण आत खोलवर कुठेतरी मला हे ठाऊक असते की हे काम दिग्दर्शकाच्या कल्पनेतून साकार झालेले आहे.

‘गुलमोहोर’ या कौटुंबिक चित्रपटामागची संकल्पना विषद करताना चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल व्ही. चित्तेला यांनी सांगितले की कुटुंब आणि घर यांच्या व्याख्या काळासोबत बदलत जातात आणि आपले वय झाले की त्या बदलतात. मात्र याच दोन गोष्टी नेहमीच महत्त्वाच्या असतात. “हा चित्रपट तीन पिढ्यांच्या संदर्भात कुटुंब आणि घर यांच्या अर्थाबद्दल भाष्य करतो. ‘गुलमोहोर’ या शीर्षकाबद्दल माध्यम प्रतिनिधींना अधिक माहिती देताना ते म्हणाले, ‘गुलमोहोर’ हा काव्यात्मक शब्द आहे आणि तो मला गुलजार यांच्या अर्थवाही गाण्यांची आठवण करून देतो. गुलमोहोराची फुले पटकन उमलतात आणि पटकन गळूनही पडतात आणि त्यांची प्रतिमा, मी चित्रपटाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत असलेल्या कथेशी चपखल जुळते. हा चित्रपट दिल्लीमध्ये चित्रित केला आहे आणि दिल्ली शहर हे या चित्रपटातील एका पात्राप्रमाणे आहे.

Continue reading

‘इंद्रायणी’चे ३०० भाग झाले प्रदर्शित!

कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. इंदूचे कीर्तन, तिचे निरागस प्रश्न, आंनदीबाई आणि तिच्यातील संघर्ष, इंदूचे मार्गदर्शक म्हणजेच व्यंकू महाराजांनी तिला दिलेली शिकवण, तिला शिकवलेले आदर्श सगळंच रसिकांच्या मनाला भिडणारं आहे. आजवर मालिकेत...

पुराणिक स्मृती क्रिकेटः वेंगसरकर फाउंडेशन, राजावाडी, एमआयजीची आगेकूच

मुंबईतल्या माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब व शिवाजी पार्क जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेल्या क्रिकेटपटू प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिलीप वेंगसरकर फाउंडेशन, राजावाडी क्रिकेट क्लब, एमआयजी क्रिकेट क्लब संघांनी सलामीचे सामने जिंकले. सलामी फलंदाज पूनम राऊत (३९...

चेंबूरमध्ये शुक्रवार-शनिवार मराठी साहित्य संमेलन

मराठी साहित्य रसिक मंडळ चेंबूर आणि ना. ग. आचार्य व दा.कृ. मराठे महाविद्यालय, चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवारी ७ व शनिवारी ८ फेब्रुवारीला दुपारी ३ ते ७ या वेळेत मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनात प्रसिद्ध लेखिका प्रतिभा सराफ...
Skip to content