नमो सिने टीव्ही निर्माता संघटनेच्या वतीने चित्रसृष्टीतल्या मान्यवरांचा ‘मेड इन इंडिया आयकन्स: महाराष्ट्र सन्मान’ देऊन मंगळवारी (दि. २०) राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.


हिंदी चित्रपट सृष्टीतील पार्श्वगायक कुमार शानू, उदित नारायण, भजनसम्राट अनुप जलोटा, अभिनेत्री दीपिका चिखलीया यांसह विविध क्षेत्रातील ४२ व्यक्तींना महाराष्ट्र सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आले. मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे, अभिनेते प्रशांत दामले, भरत जाधव व स्वप्नील जोशी यांचाही यात समावेश होता. नमो सिने टीव्ही निर्माता संघटनेचे अध्यक्ष संदीप घुगे व्यासपीठावर उपस्थित होते.



भारत ही ‘बहुरत्ना वसुंधरा’ असून या देशात वेळोवेळी प्रतिभासंपन्न व्यक्ती निर्माण झाल्या आहेत. पोर्तुगिझ, ब्रिटीश, मुघल आदी परकीय आक्रमकांच्या काळातदेखील या देशातील प्रतिभा तसूभरही कमी झाली नाही. प्रतिभासंपन्न व्यक्तींनी आपल्या कलागुणांचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी केल्यास देश अधिक प्रगती करेल, असे प्रतिपादन राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी केले.




