Homeडेली पल्समुंबई विमानतळावर 11...

मुंबई विमानतळावर 11 कोटींचा माल जप्त!

सीमा शुल्क विभागाच्या मुंबई शाखेने शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये 11 कोटींहून अधिक किंमतीचा गांजा (हायड्रोपोनिक वीड), परदेशी वन्यजीव आणि सोने जप्त केले.

सीमा शुल्क विभागाच्या मुंबई शाखेतल्या झोन-3 च्या अधिकाऱ्यांनी विमानतळ आयुक्तालय इथे केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये पहिल्या प्रकरणात 9.662 किलोग्रॅम वजनाचा, 9.662 कोटी रुपये किंमतीचा गांजा (हायड्रोपोनिक वीड) जप्त केला. दुसऱ्या प्रकरणात वन्यजीव (जिवंत आणि मृत प्राणी) जप्त करण्यात आले. यात रॅकून (1 जिवंत, 3 मृत), 3 मृत काळ्या खारी (ब्लॅक फॉक्स स्क्विरल) आणि 29 जिवंत तसेच 8 मृत हिरवे सरडे (ग्रीन इग्वाना) यांचा समावेश आहे. तिसऱ्या प्रकरणात 1.650 किलोग्रॅम वजनाचे, 1.49 कोटी रुपये किंमतीचे सोने जप्त करण्यात आले. या प्रकरणांमध्ये अंमली पदार्थविरोधी कायदा, वन्यजीव संरक्षण अधिनियम आणि सीमाशुल्क कायद्यानुसार कारवाई केली गेली. या सर्व प्रकरणांमध्ये मिळून 4 प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.

पहिल्या प्रकरणात सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर, बँकॉकहून मुंबईत आलेल्या एका भारतीय नागरिकाची तपासणी केली. या प्रवाशाच्या सामानाची आणि वैयक्तिक झडती घेतली असता, त्याच्याकडे 9662 ग्रॅम वजनाचा (अंदाजे बाजार मूल्य 9.662 कोटी रुपये) गांजा (हायड्रोपोनिक वीड) सापडला. हा गांजा प्रवाशाने स्वतःसोबत आणलेल्या सामानात लपवण्यात आला होता. अंमली पदार्थ विरोधी कायद्याखाली या प्रवाशाकडील मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.

दुसऱ्या प्रकरणात सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बँकॉकहून मुंबईत आलेल्या एका प्रवाशाची झडती घेतली. यावेळी त्याच्याकडे असलेल्या सामानात वन्यजीव (जिवंत आणि मृत प्राणी) आढळून आले. जप्त केलेले प्राणी भारतातील स्थानिक प्रजातीचे नसल्यामुळे, त्यांच्या जीविताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने हे सर्व प्राणी विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देऊन, त्यांना पुन्हा त्यांच्या मूळ देशात पाठवले गेले. या प्रवाशाविरुद्ध सीमाशुल्क तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियमाखाली कारवाई करण्यात आली. या   प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.

तिसऱ्या प्रकरणात सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी दुबईहून मुंबईत आलेल्या 2 प्रवाशांची तपासणी केली. त्यांच्याकडे तस्करी केले जात असलेले आणि मेणाने झाकून ठेवलेले एकूण 1.650 किलोग्रॅम वजनाचे आणि 1.49 कोटी रुपये मूल्याचे, भुकटीच्या स्वरूपातील (Gold Dust) तसेच तुकड्यांच्या स्वरुपातील 24 कॅरेट सोने आढळले. हे प्रवासी शरीरात (body cavity) तसेच खिशात लपवून या सोन्याची तस्करी करत होते. याप्रकरणी दोघाही प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.

Continue reading

राज्यात पाइप गॅसच्या जोडण्यांसाठी 31 मार्चपर्यंत विविध सवलती!

जागतिक स्तरावर ऊर्जा पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे राज्यात घरगुती पाइप गॅस (PNG) जोडण्यांचे काम वेगाने पूर्ण व्हावे, यासाठी राज्य सरकारने गॅस कंपन्यांना दिलेल्या विविध सवलतींची मुदत 31 मार्च 2027पर्यंत वाढवली आहे. यामध्ये परवानग्या 24 तासांत देणे, काही शुल्क माफ...

उपसभापती सचिन अहिर दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर

राज्य विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर सध्या दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर असून, दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी कर्नाटक विधान भवनाला भेट दिली. कर्नाटक राज्याच्या विधान परिषद कामकाजानिमित्त आयोजित या अभ्यासदौऱ्यात उपसभापती अहिर यांनी कर्नाटक विधान परिषदेचे सभापती सलिम अहमद आणि...

महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी ‘झिरो चलन’ सुविधा उपलब्ध

महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांतल्या विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने परीक्षाशुल्क माफीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर आतापर्यंत तब्बल २ लाख ४० हजार ३६५ विद्यार्थ्यांनी परीक्षाशुल्काचा एकही रुपया न भरता ‘झिरो चलन’ सुविधेद्वारे परीक्षाअर्ज दाखल केले आहेत,...
Skip to content