मुंबईतल्या अंधेरीतील गोपाळकृष्ण गोखले पुलाच्या उंचीशी सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाच्या जोडणीचे काम वेळापत्रकानुसार प्रगतिपथावर असून नियोजित वेळेनुसार येत्या ३० जूनपर्यंत हे काम पूर्ण होईल, असा विश्वास मुंबई महापालिकेने व्यक्त केला आहे.
अंधेरी पूर्व–पश्चिमेचा महत्त्वाचा दुवा असलेला गोपाळकृष्ण गोखले पुलाची उंची पश्चिमेला सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाशी जोडण्याचे काम वेगाने आणि ठरवलेल्या वेळापत्रकानुसार सुरु आहे. बर्फीवाला पूल हा गोखले पुलाच्या उंचीसोबत जोडण्याच्या अनुषंगाने पालिकेकडून वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हिजेटीआय) तसेच तांत्रिक सल्लागाराच्या देखरेखीखाली कामे प्रगतिपथावर आहेत. अस्तित्त्वात असलेल्या सी. डी. बर्फीवाला पुलाची पातळी उंचावून ती नवीन बांधलेल्या गोखले पुलाच्या पातळीला जोडण्याचे काम १४ एप्रिल २०२४पासून सुरू करण्यात आले आहे.
सी. डी. बर्फीवाला पुलाची पातळी उचलण्याची कार्यपद्धती व सर्वसाधारण आराखडा हा भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (आयआयटी) तसेच व्हिजेटीआय यांचेद्वारे आरेखित केला गेला. ही कार्यपद्धती वीरमाता व्हिजेटीआयद्वारे बनवण्यात आली तर आयआयटी, मुंबईनी या कार्यपद्धतीची पडताळणी करुन त्यात काही सुधारणा सुचवल्या. सदर सुधारित कार्यपद्धतीची अंमलबजावणी पालिकेमार्फत व्हिजेटीआयच्या निरीक्षणाखाली करण्यात येत आहे.
या कामांचा तपशील असा-
१. सी. डी. बर्फीवाला पुलाच्या शेवटच्या दोन तुळई (गर्डर) म्हणजेच पी ९ ते पी १० आणि पी १० ते पी ११ हे वेगळे करणे. सदर तुळई वेगळी करण्यासाठी पीलर – पी ९ आणि पीलर – पी १० येथील आर. सी. सी. जॉईंट नियंत्रित पद्धतीने व पुलाच्या संरचनेला कोणताही धोका न पोहोचवता तोडणे.
२. गर्डर पी ९ ते पी १० तसेच पी १० ते पी ११ हे समक्रमित (synchronized) प्रणालीद्वारे उचलणे व गोखले पुलाच्या पातळीशी जुळवणे.
३. गोखले पुलाशी सी. डी. बर्फीवाला पुलाची पातळी जुळाल्यानंतर तोडलेले जॉइंट पुनश्च एकदा काँक्रिटिंग करणे.
४. नवीन बेअरिंग व जोडणी सांधे (एक्स्पांशन जॉइंट) बसविणे.
कामांची प्रगती अशी-
१. बर्फीवाला पुलाची पातळी ही पीलर पी १० येथे सुमारे ७५० मिलीमीटर इतकी उचलण्याचे प्रस्तावित होते. त्यानुसार ही पातळी जुळवण्याचे काम पूर्ण झाले आहे.
२. पीलर पी-११ येथे सुमारे १,३५० मिलीमीटर इतकी पातळी उचलण्याचे प्रस्तावित होते. त्यापैकी सुमारे १,२५० मिलीमीटर इतके उचलण्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित १०० मिलीमीटर पातळी उचलण्याचे काम येत्या २ ते ३ दिवसांत पीलर ११ येथे जुळवण्याचे नियोजित आहे.
३. नवीन बेअरिंगसाठी कार्यादेश देऊन त्या आणण्यात आल्या. नवीन बेअरींगची चाचणी काल पूर्ण झाली. हे नवीन बेअरींग प्रकल्पस्थळी तत्काळ आणण्यात येतील.
४. उर्वरीत काम म्हणजे पी ९, पी १० आणि पी ११ येथील आर. सी. सी. काँक्रिट करणे, नवीन बेअरिंग बसविणे हे काम ५ जून २०२४पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित आहे. काँक्रिटच्या क्युरिंगनंतर हे काम पूर्णत्वास जाईल. हे काम सुरु करताना ते ३० जून २०२४पर्यंत पूर्ण करावे, असे नियोजित करण्यात आले आहे. त्या वेळापत्रकानुसार सध्या कामे सुरु आहेत.