‘तौक्ते’ वादळाचा तडाखा बसलेल्या दांडी, वायरी, तारकर्ली (मालवण) येथील ९ आणि मांडकुली (कुडाळ) येथील २ नागरिकांना ‘घुंगुरकाठी, सिंधुदूर्ग’ सेवाभावी संस्थेमार्फत पस्तीस हजार रूपयांच्या रोख रकमेचे वाटप करण्यात आले. मालवणचे सुपुत्र व निवृत्त नौदल अधिकारी कमांडर राजीव कुबल यांच्या ‘उर्जा’ संस्थेच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.
सरकारची मदत येण्याआधी स्वयंसेवी संस्था मदतीला धावून आल्याबद्दल वादळग्रस्तांनी समाधान व्यक्त केले. पुढच्या टप्प्यात अन्य ठिकाणच्या वादळग्रस्तांनाही जमेल तशी मदत करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘घुंगुरकाठी’चे अध्यक्ष सतीश लळीत व सामाजिक कार्यकर्ते प्रा. श्रीधर पेडणेकर यांनी दिली.
कमांडर राजीव कुबल यांनी भारतीय सेनादलातील आपल्या निवृत्त सहकाऱ्यांकडे, मित्रपरिवाराकडे सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वादळग्रस्तांसाठी निधी उभारण्याची कल्पना मांडली. या मदतीचे योग्य लाभार्थ्यांना वितरण व्हावे, यासाठी प्रा. श्रीधर पेडणेकर यांच्यामार्फत ‘घुंगुरकाठी’ संस्थेशी संपर्क साधला. संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांनी त्यांना पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. यानंतर पहिल्या टप्प्यात जमा झालेली रक्कम त्यांनी संस्थेकडे सुपूर्द केली. या रकमेचे वाटप गरजू नागरिकांना करण्यात आले.
निधीसंकलनाचे काम अद्याप सुरू असून यापुढेही अन्य ठिकाणच्या वादळग्रस्तांना यथाशक्ती मदत करण्यात येणार आहे. देण्यात आलेली रक्कम अगदी छोटी असली तरी निसर्गाच्या कोपाचा फटका बसलेल्या नागरिकांना धीर देण्यासाठी फुल ना फुलाची पाकळी देण्याचा हा उपक्रम आहे. या रकमेमुळे त्यांच्या दैनंदिन गरजा काही प्रमाणात पूर्ण होतील, असे लळीत यांनी सांगितले.
मदतीची रक्कम स्वीकारताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. आतापर्यंत अनेकजण येऊन गेले, पण रोख रक्कम स्वरुपात मदत घेऊन येणारे तुम्ही पहिलेच, अशी कृतज्ञतेची भावना त्यांनी व्यक्त केली. नीतिन प्रदीप लोणे (५०००), सतीश चांदेरकर (२०००), शुभांगी चांदेरकर (२०००) (सर्व रा. दांडी), दत्ताराम कद्रेकर (३०००), राजश्री बांदिवडेकर (२०००), महेंद्र मयेकर (४०००), कृष्णा गोसावी (५०००) (सर्व रा. वायरी), सुमन तावडे (३०००), भिसाजी मिठबावकर (३०००) (सर्व रा. तारकर्ली), संजय मोरजकर (३०००), आनंद नाईक (३०००) (सर्व रा. मांडकुली, ता. कुडाळ) यांना त्यांच्या घरी जाऊन ही मदत पोच करण्यात आली. या उपक्रमात सामाजिक कार्यकर्ते प्रसाद जळवी (तेर्सेबांबर्डे), अक्षय रेवंडकर (वायरी, मालवण), शुभेन्दू लळीत यांनी सहकार्य केले.