आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार, यावर्षी 6 एप्रिलला आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या उलटगणनेचा 76वा दिवस आहे. या दिवशी पुण्यातील येवलेवाडी येथील निसर्ग ग्राम येथे केंद्रीय संचार विभाग, महाराष्ट्र आणि गोवा प्रदेश, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार यांनी संयुक्तपणे सामूहिक योग प्रात्यक्षिकाचे आयोजन केले आहे. सकाळी 7.00 वाजता आयुष मंत्रालयाच्या मानक प्रोटोकॉलनुसार सामूहिक योग प्रात्यक्षिकाने कार्यक्रमाची सुरुवात होईल.
यंदा आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाच्या निमित्ताने सर्व सहभागींना एनआयएनकडून भरड धान्यापासून तयार केलेला नाश्ता मोफत दिला जाणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून विनामूल्य आहे. सर्व वयोगटातील लोक यात सहभागी होऊ शकतात आणि योगाभ्यासाचा आनंद घेऊ शकतात. 6 एप्रिल 2023 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या उलटगणनेचा 76वा दिवस तुमच्या कुटुंबियांसह आणि मित्रांसोबत निसर्ग-ग्राम, बंदोरवाला कुष्ठरोग केंद्राच्या मागे, येवलेवाडी, पुणे येथे सामूहिक योग प्रात्यक्षिकात साजरा करा, असे आवाहन आयुष मंत्रालयाने केले आहे.

आपल्याला माहित आहेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने, संयुक्त राष्ट्र आमसभेने 2014 मध्ये 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. योगाभ्यास हा आपल्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वारशाचा अविभाज्य भाग असल्यामुळे योगाला जगभरात मिळालेली मान्यता आपल्या देशासाठी अभिमानाची बाब आहे. योगाभ्यास हे निरोगी जीवन जगण्यासाठी एक प्राचीन शास्त्र आहे आणि दैनंदिन जीवनात त्याचा अवलंब करून आपले जीवन सोपे आणि सुलभ बनवता येते. मानवी जीवनाशी संबंधित सर्व मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि शारीरिक पैलूंवर ते कार्यक्षमतेने काम करते. योग म्हणजे अध्यात्मिक स्तरावर जोडले जाणे म्हणजेच वैयक्तिक जाणिवेचे वैश्विक जाणिवेशी मिलन आहे.