महाराष्ट्राच्या राजकारणात काही व्यक्तिमत्वे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यात एक आहेत गणेश नाईक. आज जनता दरबार सर्वच मंत्री घेतात. बहुतेक राजकीय पक्ष आपल्या मुख्यालयात तसेच जिल्हा कार्यालयात मंत्र्यांचे जनता दरबार आयोजित करतात. जेव्हा मंत्री तिथे पोहोचत नाहीत तंव्हा अजितदादांसारखे नेते सटकतात. पण गणेश नाईक हे असे पहिले मंत्री आहेत, ज्यांनी मुळात जनता दरबाराचा उपक्रम सुरु केला. मंत्रालयात यायला लोकांना कष्ट पडतात. तिथे पोहोचूनही संबंधित अधिकारी जागेवर नसतात. मंत्री जागेवर नसतात. लोक नाराज होतात. अशा स्थितीत मंत्र्यांनी उठून जनतेमध्ये जावे, त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात, हे नाईकांनी ठाण्याचे पालकमंत्री बनले तेव्हा म्हणजे 1995-96मध्ये सुरु केले. गणेश नाईक तीन वेळा मंत्री व ठाण्याचे पालकमंत्री राहिले तेव्हा त्यांनी हा उपक्रम यशस्वीरीत्या चालवला. 1995 ते 2009 या काळात ते पंधरा वर्षे ठाणे जिल्हा संभाळत होते. त्यांनी जनता दरबारामुळे मोठी लोकप्रियातही मिळवली होती, कारण त्यांच्या या जनतेच्या गाठीभेटींच्या वेळी जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख, मनपाचे अधिकारी अशांनी हजर राहायला हवे हा दंडक त्यांनी ठेवला होता. म्हणूनच मग लोकांच्या लहानमोठ्या प्रश्नांची तड लगेचच लागायला मदत होत होती.
गणेश नाईक यांनी ज्या विभागाचे प्रतिनिधित्व आमदार म्हणून केले तो बेलापूर विधानसभा मतदारसंघ हा, राज्यातीलच नव्हे तर देशातील, लोकसंख्येच्या तसेच भौगोलिक आकारमानाच्याही दृष्टीने, सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ होता. या मतदारसंघाच्या एका टोकाला नवी मुंबई तर दुसऱ्या टोकाला भाईंदरची खाडी असा विशाल भूभाग होता. तो ठाणे महानगराला वळसा घालून मुंब्रा-कळवा येथून जात असे. 2009मध्ये जेव्हा या मतदारसंघाची पुनर्रचना झाली तेव्हा त्यांच्या एका मतदारसंघाचे चार विभाग झाले. बेलापूर, ऐरोली, मुंब्रा-कळवा आणि भाईंदर! इतका मोठा त्यांचा आमदारकीचा मतदारसंघ होता. त्यामुळे मतदरासंघाच्या विविध टोकांच्या भागातल्या जनतेला दर आठवड्याला भेटण्यासाठी ते जात. तेथून जनता दरबार ही संकल्पना पुढे आली. पालकमंत्री हा किती काम करू शकतो याचेही उदाहरण गणेशदादांनी घालून दिले होते.
नवी मुंबई मनपाची स्थापना झाली तेव्हापासून तिथे नाईकांचेच अधिराज्य राहिले. ते शिवेसनेत होते तेव्हा आणि ते राष्ट्रवादीत होते तेव्हाही नाईक म्हणतील तोच तिथे महापौर बसणार, हे ठरले होते. आता ते भाजपाचे नेते बनले आहेत. मंदा म्हात्रेंसारख्या जुन्या भाजपा आमदारांना डावलून ते मंत्रीही बनले आहेत. पालक नाही, तरी पण ठाण्याचे संपर्क मंत्रीही बनले आहेत. आणि मनपा निवडणुका अद्याप व्हायच्या आहेत. तेव्हा तिथे भाजपाचा महापौर ते बसवू शकतील का, हा एक प्रश्न उरणार आहे. पूर्वीही ठाणे मनपा सोडून जिल्ह्यातील बहुतेक सर्व मनपांमध्ये नाईकांचे वर्चस्व राहिले. आता गणेश नाईकांनी ठाणे शहरात आणि मीरा भाईंदरमध्ये जनता दरबार पुन्हा सुरु केले आहेत. ते आज राज्याचे वनमंत्री म्हणूनही जोरादर काम करतच आहेत. महायुतीच्या सरकारमध्ये काही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावरून संघर्ष रंगला आहे. त्यात ठाणे व पालघरचाही समावेश खरेतर आहे. पण नाशिक व रायगडचे पालकमंत्रीपद मोठ्या वादात

रखडले, तसे ठाण्याचे झाले नाही. कारण माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःच ठाण्याचे आमदार व मंत्री असल्याने इतरांनी दावा करण्याचा मुद्दा टिकू शकला नसता तरी भाजपाची कुरबूर स्थानिक स्तरावर सुरुच होती व आजही आहेच. रायगडचा वाद सोडवण्यासाठीच म्हणे, अमित शाह सुनील तटकरेंच्या घरी गेले! पण ते गेले म्हणून शिंदे गटाचे रायगडमधील गोगावले समर्थक नेते, कार्यकर्ते चिंतेत पडले. अर्थात कोणी कोणाकडे जेवायला गेले म्हणून असले वाद संपत नसतात. कारण पालकमंत्रीपद हे शेवटी राजकीय अस्तित्त्वाच्या संघर्षाची परिणती ठरत असते. रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला तर नाशिकमध्ये भाजपाला पालकमंत्रीपद हवे आहे. आणि हे दोन्ही जिल्हे राष्ट्रवादीलाही सोडायचे नाहीत. अशा स्थितीतही गणेश नाईकांनी ठाणे शहरात आपला जनता दरबार सुरु केला आहे. हे एकनाथ शिंदेना आव्हान आहे असे काहींना वाटू शकते. पण नाईकांचे वागणे हे सरळ-धोपट असते. मला पटेल ते मी करणार हा त्यांचा खाक्या असतो.
त्यात दुसरा भाग असाही आहे की, सत्तेतील पक्षांनी जिथे आपला पालकमंत्री नाही तिथे एखाद्या स्वपक्षीय वरिष्ठ मंत्र्यांकडे संपर्कमंत्री म्हणूनन जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे असे संपर्कमंत्री हेही त्या जिल्ह्यात सभा बैठका घेत असतात. नाईकांचा ठाण्यातील परवाचा जनता दरबार हा संपर्कमंत्री या नात्याने घेतला गेला होता. तिथे त्यांच्यासमवेत ठाण्यातील भाजापा नेते संजय वाघुले आदी हजर होते. येणाऱ्या काही महिन्यांत ठाण्यासह सर्वच मनपांमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यामुळे भाजपाच्या त्या निवडणूक तयारीचाही एक भाग म्हणून नाईकांच्या उपक्रमाकडे पाहिले जात आहे. अर्थात त्यांनी पत्रकार परिषदेत तत्संबंधीचे प्रश्न उडवून लावले. महापौर कोणाचा होणार, कोणाकडे नेतृत्त्व राहील, निवडणुका एकत्र लढाल का, असल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली नाहीत. गणेश नाईक राज्याचे वनमंत्रीही आहेत. कोणत्याही विकासकामामध्ये वन खात्याची जमीन मध्ये असेल तर अडचणी येतात. विशेषतः धरणे, रस्ते, रेल्वे, वीजयंत्रणा अशा पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये थोडीफार जंगल जमीन जातच असते. त्याच्या परवानग्यांची प्रक्रिया ही पुष्कळ किचकट व वेळकाढू आहे. गणेश नाईकांनी नागपुरात दोन दिवस सर्व अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन अशा अडलेल्या प्रकल्पांचा विचार केला. पंतप्रधानांनी आखलेल्या योजना, मुख्यमंत्र्यांनी भर दिलेल्या विकासाच्या योजना या वनखात्याच्या परवानगीसाठी अडून राहणार नाहीत, रखडणार नाहीत याची ग्वाही त्यांनी परवाच्या पत्रकार परिषदेतून जनतेला दिली, ही बाबही लक्षणीय आहे.
नाईकांनी आणखी एका मोठ्या प्रकल्पाचे सूतोवाच केले. गुजरातेतील वनतारा हा प्रकल्प अलिकडे चर्चेत आला आहे. तिथे हत्ती, सिंह अन्य प्राणी खुल्या जागेत मुक्तपणाने वावरत आहेत, ही दृष्येपण वृत्तवाहिन्यांवरून पाहिली. रिलायन्स उद्योग समुहाचे धाकटे मालक अनंत अंबानी यांनी प्राणी प्रेमापोटी जखमी तसेच पोरक्या झालेल्या हत्ती, वाघ, सिंहांना वाचवण्यासाठी वनतारा हा प्रकल्प स्वतःच्या खाजगी जागेत सुरु केला. जामनगर परिसरात अंबांनीचे तेल शुद्दीकरण प्रकल्प, रसायन उद्योग असे मोठे साम्राज्य आहे. त्या परिसरात तीन हजार एकरांवर हा प्रकल्प केला आहे. पंतप्रधान मोदींनी मध्यंतरी तिथे भेट दिली होती. विशेषतः जखमी हत्तींवरील उपचार तसेच जंगलातील पोरकी झालेली हत्तींची लहान पिले यांना जगवण्यासाठी उपचार करण्यासाठी या, “रेस्क्यु व रिहॅब केंद्रा”ची स्थापना झाली. अंबानींनी तिथे भरपूर पैसा व मनुष्यबळ लावले आहे. त्यामुळे हत्तींच्या संदर्भात ते एक जागतिक दर्जाचे व पंचतारंकित असे प्राणी रुग्णालय स्थापन झाले आहे. अन्य वन्य जखमी व भरकटलेल्या प्राण्यांचीही देखभाल करण्याची सोय तिथे आहे. हा वनतारा प्रकल्प जनतेसाठी मात्र खुला नाही. तिथे व्हीव्हीआयपी मंडळींना थोड्या अवधीसाठी सफर करता येते. गणेश नाईकांचे व रिलायन्स समुहाचे जिव्हळ्याचे संबंध आहेत. अनंत आंबानींचे आजोबा धिरुभाई यांच्या काळापासून नाईक अंबानींच्या निकट वर्तुळात वावरले आहेत. वनमंत्री या नात्याने गणेश नाईकांनी आपल्या खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन वनताराची पाहणी केली. वनतारा धर्तीवर महाराष्ट्रात एखादा मोठा ओपन झू करावा व तिथे पर्यटकांनाही प्रवेश देता यावा अशी त्यांची संकल्पना आहे. त्यासाठी त्यांनी ठाणे जिल्ह्यात सूर्या प्रकल्पाखालची मोठी जमीन राखून ठेवली आहे. आता त्यांनी अंबानींना पत्र लिहून विनंती केली आहे की, तुम्ही या. इथे आम्ही जमिनी व बाकी सुविधा देऊ. खाजगी सरकारी भागिदारीतून वनताऱ्याच्या धर्तीवरचा सूर्यतारा प्रकल्प तुम्ही सुरु करा. बघुया, या दादांच्या कल्पनेतील या प्रकल्पाला सूर्यप्रकाश दिसतो का ते!