Homeडेली पल्सएफटीआयआयच्या चित्रपट रसग्रहण...

एफटीआयआयच्या चित्रपट रसग्रहण अभ्यास प्रवेशाला मुदतवाढ

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेने (एफटीआयआय) यंदाच्या मध्यात होऊ घातलेल्या चित्रपट रसग्रहण अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याच्या कालावधीत वाढ केली आहे. हा अभ्यासक्रम पुण्यात 23 जून ते 11 जुलै 2025 या कालावधीत घेतला जाणार आहे. यासाठीचे अर्ज आता 15 जून 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत सादर करता येतील.

याआधी जाहीर झालेली 7 जूनची मर्यादा गाठता न आलेल्या अधिकाधिक इच्छुक सहभागींना या अभ्यासक्रमात सामावून घेण्याच्या हेतूने मुदतवाढ देण्यात आली आहे. एफटीआयआय आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ – भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय यांच्यातर्फे संयुक्तपणे घेतला जाणारा हा अभ्यासक्रम आहे. अधिक गहन, पूर्णवेळ स्वरुपात बांधणी केलेला हा अभ्यासक्रम सहभागींना चित्रपटाचे सौंदर्य, इतिहास आणि भाषेचा रचनात्मक परिचय करून देतो. यामध्ये आठवड्याचे शेवटचे दोन दिवस वगळता इतर सर्व दिवस सकाळी साडेनऊ ते रात्री साडेआठ या कालावधीत घेण्यात येणाऱ्या सत्रांमध्ये व्याख्याने, स्क्रिनिंग तसेच चर्चा यांचा समावेश असेल. सहभागींना यावेळी 35 मिमी आणि डिजिटल स्वरूप अशा दोन्ही प्रकारांमध्ये चित्रपटांचा अनुभव घेण्याची संधी हे या अभ्यासक्रमाचे विशेष आकर्षण असेल.

चित्रपट

या अभ्यासक्रमात चित्रपटाच्या एक कलाकृती आणि संवादाचे माध्यम अशा दोन्ही स्वरूपांचा शोध घेतला जाणार असून त्यात भारतीय तसेच जागतिक चित्रपट परंपरांवर अधिक भर दिला जाणार आहे. अभ्यासक्रमातील सहभागी निवडक क्लासिक्स-फिक्शन, नॉन-फिक्शन तसेच माहितीपट प्रकारच्या चित्रपटांच्या रसग्रहणासोबत सखोल विश्लेषणात्मक चर्चेत भाग घेतील. सुप्रसिध्द चित्रपटनिर्मात्यांसोबत सहभागींचा संवाद हा या कार्यक्रमाचा अविभाज्य भाग असेल. या अभ्यासक्रमात एफटीआयआयमधील प्रमुख व्याख्यात्यांसह प्रतिष्ठित पाहुणे प्राध्यापकदेखील व्याख्याने देतील.

एफटीआयआयचे प्राध्यापकगण सदस्य इंद्रनील भट्टाचार्य आणि वैभव आबनावे या अभ्यासक्रमाचे समन्वयक असतील. भारतातील शिक्षक, माध्यम क्षेत्रातील व्यावसायिक, संशोधक, चित्रपट संस्थांचे सदस्य, माध्यमांशी संबंधित सरकारी अधिकारी तसेच चित्रपट रसिकांसाठी हा अभ्यासक्रम घेण्यात येत आहे. दर्शवण्यात आलेले स्वारस्य आणि चित्रपट तसेच माध्यमसंबंधित क्षेत्रांमध्ये असलेला अनुभव यांच्या आधारावर आलेल्या अर्जांची छाननी होईल. परगावी राहणाऱ्या सहभागींसाठी मर्यादित संख्येत वसतिगृहाची सोय उपलब्ध आहे. मात्र ही सोय पुरवताना दिव्यांग आणि महिला उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. उर्वरित उमेदवारांनी पुण्यात त्यांचा प्रवास, निवास आणि जेवण्याचा खर्च स्वतः करणे अपेक्षित आहे.

चित्रपट

इच्छुक उमेदवारांनी खालील लिंकद्वारे उपलब्ध अर्ज भरावा:

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScJXSd_n0o7n5CBo6yVVRODFgQEx4AcpqeBeSIM8d1LsOJrcQ/viewform

अभ्यासक्रमाचे शुल्क, पात्रता तसेच शुल्क भरण्याची प्रक्रिया यांचे तपशील जाणून घेण्यासाठी एफटीआयआयच्या खालील अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी: 

https://ftii.ac.in/p/vtwa/film-appreciation-course-mid-year-2025-23-june-11-july-2025

Continue reading

उद्यापासून सॅन होजे येथे रंगणार ‘नाफा’ मराठी चित्रपट महोत्सव!

राष्ट्रीय सुवर्णकमळविजेत्या 'देऊळ' आणि 'भारतीय' या चित्रपटांचे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त निर्माते अभिजीत घोलप यांच्या संकल्पनेतून 'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोशिएशन' तथा नाफा (NAFA) या संस्थेची स्थापना गेल्यावर्षी अमेरिकेत झाली. हॉलिवूडच्या धर्तीवर मराठी चित्रपटसृष्टीचा भव्य सोहळा प्रथमच त्यांनी आयोजित करून सर्वांचे...

शशांक केतकरच्या ‘मुरांबा’चे ११०० भाग पूर्ण!

स्टार प्रवाहवरील मुरांबा मालिकेने नुकताच ११०० भागांचा टप्पा पार केला. रमा-अक्षय या जोडीसोबतच संपूर्ण मुकादम कुटुंबाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. अक्षय मुकादमची भूमिका साकारणाऱ्या शशांक केतकरने आजवर बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र शशांकच्या करिअरमधली मुरांबा ही सर्वाधिक भागांची...

‘सावली’वर सावली.. तीही कडक ऊन नसताना!

राज्यविधिमंडळाच्या नुकत्याच संपलेल्या अधिवेशनात विधान परिषदेत शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते अनिल परब यांनी महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचा राजीनामा मागताना मुंबईतल्या कांदिवलीत असलेला 'सावली' हा डान्स बार त्यांच्या मातोश्रींचा असल्याचा आरोप केला. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी येथे छापा टाकून...
Skip to content