केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या म्हणजेच सीएपीएफच्या (कॉन्स्टेबल जनरल ड्युटी) परीक्षा आता हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त आणखी १३ प्रांतिक भाषांमध्ये घेण्यासाठी परवानगी दिली आहे. येत्या १ जानेवारी २०२४पासून हा निर्णय अंमलात येणार आहे.
सध्या या परीक्षा फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये घेतल्या जातात. मात्र स्थानिक भाषांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने तसेच विविध राज्यांमधल्या तरुणांना संधी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने आणखी १३ प्रांतिक भाषांमध्ये या परीक्षा घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता या परीक्षा इंग्रजी, हिंदी, याबरोबरच आसामी, बंगाली, गुजराती, मराठी, मल्याळम, कानडी, तमिळ, तेलुगु, उरिया, उर्दू, पंजाबी, मणिपुरी तसेच कोंकणी भाषेतही घेतल्या जाणार आहेत. उमेदवारांनी संबंधित ऑप्शन म्हणजेच पर्याय निवडल्यास त्यांना निवडलेल्या भाषेत प्रश्नपत्रिकाही उपलब्ध होतील आणि उत्तरेही देता येतील.