Homeमुंबई स्पेशलमुंबईचे फेब्रुवारीतले फुले,...

मुंबईचे फेब्रुवारीतले फुले, फळे, भाज्यांचे प्रदर्शन रद्द!

मुंबई महापालिकेच्या वतीने वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात प्रतिवर्षी फेब्रुवारी महिन्यात फुले, फळे व भाज्यांचे प्रदर्शन भरविण्यात येते. त्यामध्ये देशभरातून प्रतिनिधी सहभागी होतात. तथापि, कोविड-१९च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीमध्ये येणाऱ्या अडचणी तसेच कोविडची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता, फेब्रुवारी-२०२२मधील फुले, फळे व भाज्यांचे प्रदर्शन रद्द करण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेच्या वतीने भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात फुले, फळे व भाज्या, झाडे किंवा रोपे यांचे प्रदर्शन दरवर्षी आयोजित केले जाते. हे प्रदर्शन जानेवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भरवण्यात येते. प्रदर्शनाचा कालावधी तीन दिवसांचा असतो. या तीन दिवसात अंदाजे दोन ते तीन लाख नागरिक व शाळकरी मुले प्रदर्शनाला भेट देतात. त्यासोबत प्रदर्शन पाहण्यासाठी विविध मान्यवर तसेच नामांकित मंडळीदेखील आवर्जून भेट देतात.

या प्रदर्शनात सामाजिक संदेश देणारी व नवनवीन संकल्पनांवर आधारित पुष्परचना व प्रतिकृती तयार करण्यात येते. तसेच विविध फुल झाडे, दुर्मिळ वनस्पती व झाडे, औषधी वनस्पती इत्यादी प्रदर्शित करून त्यांची माहिती दिली जाते. भारतातील विविध ठिकाणावरून रोपवाटिका मालक रोपे विक्रीसाठी या प्रदर्शनात येतात व नामांकीत कंपन्यादेखील लँडस्केप डिझाईनद्वारे त्यांच्या नवनवीन संकल्पना मांडतात.

मुंबई महापालिकेच्या २४ विभागातील उद्यान खात्यातील कर्मचाऱ्यांमार्फत सप्टेंबर महिन्यापासून या प्रदर्शनासाठी पूर्वतयारी सुरू होते. विविध प्रकारच्या शोभेच्या फुलांचे व भाज्यांच्या बिया जमवणे, बियांपासून रोपं तयार करणे, कुंड्या तयार करणे, फळे व फळझाडांची निगा राखणे, तसेच प्रतिकृती तयार करण्याकरिता लागणारे साहित्य, सांगाडे तयार करणे या सर्व बाबींचा यामध्ये समावेश असतो.

पालिकेच्या हद्दीतील सर्व २४ प्रशासकीय विभागातील उद्यान विभागाचे अधिकारी, कर्मचारी, माळी आणि कामगार एकत्र येऊन त्यासाठी कामकाज करतात. प्रदर्शनाची कार्यक्रमपुस्तिका आणि निमंत्रणपत्रके छापून वितरित करणे, प्रदर्शनाचे फलक तयार करणे, प्रचार व प्रसारसाहित्य तयार करुन मुंबईतील सर्व २४ विभागात पोहोचविणे, मान्यवर मंडळींना आमंत्रित करणे इत्यादी कामकाजासाठी प्रत्येक विभागातील सहाय्यक उद्यान अधीक्षक व उद्यान विद्या सहाय्यक सातत्याने कार्यरत असतात.

फुले

सद्यस्थितीत सर्वत्र कोविड–१९चा प्रादुर्भाव कायम असून मुंबईसह देशभराने संसर्गाच्या दोन लाटा अनुभवल्या आहेत. तसेच तिसरी लाट येण्याचा अंदाजही वर्तवला जात आहे. अशा स्थितीत उद्यान विभागातील अधिकारी, सर्व कर्मचारी यांच्यासह खासगी क्षेत्रातील सह-आयोजक, प्रदर्शनात उपस्थित राहणारे प्रतिनिधी या सर्वांनी पूर्वतयारीसह प्रत्यक्ष प्रदर्शनात सातत्याने एकत्र येणे हे संसर्गाच्या दृष्टीने धोक्याचे ठरू शकते. तसेच, प्रत्यक्ष प्रदर्शनाच्यावेळी लाखोंच्या संख्येने नागरिकांनी येणेही धोक्याचे ठरू शकते.

प्रदर्शन कालावधीपर्यंत कोविड संपुष्टात आला नाही आणि त्यामुळे ऐनवेळी प्रदर्शन रद्द करावे लागले तर पूर्वतयारीचे संपूर्ण श्रम आणि खर्च वाया जातील. देशभरातून सहभागी होणाऱ्या रोपवाटीका मालक व प्रदर्शनाशी संबंधीत कंपन्या यांनादेखील अडचणी निर्माण होऊ शकतात. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील उपलब्ध जागेमध्ये लाखोंच्या संख्येने प्रदर्शनात येणाऱ्या नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याचे निर्देशदेखील पाळणे शक्य होणार नाही. परिणामी, संसर्गाचा धोका आणखी वाढू शकतो. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता, फेब्रुवारी २०२२मधील नियोजित फुले, फळे व भाज्यांचे प्रदर्शन रद्द करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content