Homeमाय व्हॉईसनवे पोलीस आयुक्त...

नवे पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पहिली सलामी!

अपेक्षेप्रमाणे ज्येष्ठ अधिकारी देवेन भारती यांच्याच गळ्यात मुंबई पोलीस आयुक्तपदाची माळ पडलीच! आयुक्तपदी विराजमान झाल्याबद्दल आपले अभिनंदन, आयुक्त साहेब! खरंतर माजी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना पोलीस आयुक्त करण्याच्या वेळी सरकारने खळखळ केली हॊती. पण त्यांना डावलले तर पोलीस दलात चुकीचा संदेश जाईल याची भीती वाटल्यानेच सरकारने त्यांना डावलण्याची चूक केली नाही. मात्र काही दिवसांतच देवेन भारती यांची मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी नेमणूक केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याने त्यांनी भारती यांना नेमण्यात मुळीच हयगय केली नाही.

अनेक राज्यात भारतीय पोलीस सेवेतील ज्येष्ठ अधिकाऱ्याची आयुक्तपदी नेमणूक करण्याची प्रथा आहे. सर्वोच्च न्यायालयही ही प्रथा मानते. परंतु काही बाबतीत सरकारला आपल्या पसंतीचा आयुक्त नेमण्यास त्यांनी समंती दिली आहे. येथे तर तब्बल ११ अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता डावलून भारती यांना आयुक्त केले आहे. एकमात्र खरे की, या अकरा ज्येष्ठ अधिकाऱ्यांपैकी दोन-तीन अधिकारी वगळता या अधिकाऱ्यांची ओळख महाराष्ट्राला नाही. म्हणून भारती यांच्या नेमणुकीनंतर कोणी न्यायालयात दाद मागायला जाईल असे वाटत नाही. मात्र गेली तब्बल २० वर्षे भारती मुंबईतच तळ ठोकून कसे बसले याचे आश्चर्यच वाटते. कारण सरकारचाच स्वतःचा नियम आहे की, तीन वर्षांनंतर बदलीचे शहर बदलायचे! या ना त्या कारणाने भारतींनी मात्र मुंबई सोडली नाही हे मानावेच लागेल. मुंबईला त्यांनी जणू फेविकॉलने जोडून घेतलेले होते, असं पोलीस दलात विनोदाने बोलले जात आहे. काहीही असो. आता आयुक्तपदाचा मुकूट त्यांच्या शिरावर आलेला असल्याने सर्व चर्चाना विराम देणे गरजेचे आहे.

आयुक्त

आता राजकीय भाषणे नकोत!

आयुक्त देवेन भारती यांच्याबाबत काही अपवाद असले तरी तपास अधिकारी म्हणून त्यांचे कसब वाखाणण्यासारखेच आहे. कुठलाही जटील गुन्हा असो, भारती थंड डोक्याने तो सोडवणारच, असा विश्वास त्यांनी आपल्या कामाने निर्माण केलेला आहे हे मान्यच करावे लागेल. ‘शेवटच्या घटकापर्यंत पोलीससेवा देणार’ हे आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यावर त्यांनी जे वक्तव्य केले आहे ते मात्र नक्कीच खटकले. जनतेला राजकीय नेत्यांसारखी भाषणे नकोत. आयुक्त साहेब, ‘शेवटच्या’ माणसाला पोलीसठाण्यातून हाकलून दिले जाते याच्या हजारो सत्यघटना दररोज कानावर येत असताना कुठला शेवटचा माणूस पोलीस ठाण्यात जाईल हो? शहराच्या विविध भागाचे एकवेळ मागे ठेवू. आपण पोलीस कार्यालय असलेल्या महात्मा फुले मंडई परिसरच घेऊ! जी टी रुग्णालयाकडून येणारा रस्ता, बोरिबंदरहून येणारा रस्ता व नंतर वळण घेऊन मनीष मार्केटकडे जाणारा रस्ता या तिन्ही रस्त्यावर जास्तीतजास्त काळ ‘किचाट’ असतो. हा ‘किचाट’ काहीसा सहनीय केलात तरी आम्ही मानाचा मुजरा करू तुम्हाला!

पार्किंग स्लॉट देणारी टपोरी पोरं, फेरीवाले, ७० रुपये तासाचे असताना बिनदिक्कत ३०० रुपये मागणारे लुटारू.. त्यांना साथ देणारे काही पोलीस व समाजसेवक या सर्वांनी मिळून जनतेला वेठीलाच धरलेले आहे. महापालिकेशी समन्वय साधून या समाजकन्टकांचे कंबरडेच मोडले पाहिजे. काही फेरीवाले तर महिला व मुली दिसल्या की दूरपर्यंत त्यांची पाठ सोडत नाहीत. एक-दोन दिवसापूर्वीच वाहतूक चौकी आहे त्या परिसरात फोल्डेबल झाडू दाखवण्यासाठी त्यांच्या अंगापर्यंत झाडू घेऊन जाताना मी पाहिलेले आहे. दुसरे उदाहरण पर्फ्यूम विकणाऱ्यांचे.. तो तर इतका मागे लागला होता की शेवटी त्याने सॅम्पलमधून पर्फ्यूम मारून दाखवला. हे फारच झाले तेव्हा मीच आवाज चढवून त्याला बोललो तर तो मला शिव्या देत पुढे चालता झाला. त्या पर्फ्यूममुळे ती महिला बेशुद्ध झाली असती तर, त्याचे फावलेच असते ना?

पोलीस ठाणी साफ करा!

मुंबई पोलीस दलाकडे त्यामानाने व शहराच्या आकारमानानुसार मनुष्यबळ कमी आहे याची जाणीव आहे. आता मुख्यमंत्री आपल्या मर्जीतील किंवा मुख्यमंत्र्याच्या मर्जीतील तुम्ही आहात तर मनुष्यबळ वाढवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करा. आयुक्त साहेब, पोलिसठाणी साफसूफ करायची वेळ आलेली आहे. केरकचऱ्याबाबत म्हणत नाही तर अनेक पोलीसठाण्यांच्या आवारात वा परिसरात अनेक भंगार गाड्या व बाईक्स गेली अनेकवर्षे पडून गंजलेल्या अवस्थेत आहेत. टनवारी धूळ जमली आहे त्यावर.. उदाहरण म्हणून दोन ठाणी देतो. एक जवळचे यलोगेट पोलीसठाणे व दुसरे चेंबूर पोलीसठाणे. चेंबूर पोलीसठाण्याचा परिसर मोठा आहे. हेवा वाटावा इतका आहे. पण तेथे धूळ खात पडलेल्या सुमारे १५०हून अधिक गाड्या तसेच तसेच बाईक्स आहेत. सरकार व न्यायालयाशी बोलून त्यावर कायमचा तोडगा काढण्याची वेळ आलेली आहे. “Before you are a leader, success is all about giving yourself. When you become a leader success is all about giving others” या भावनेतून काम केल्यास यश दूर नाही हे सांगायला मी नको, ते प्रत्यक्षच दिसेल.

अंमली पदार्थांनी वेढले आहे!

आयुक्त साहेब.. आपण गुन्हे शाखेत अव्वल अधिकारी होतात वा आहात. या शहराला अंमली पदार्थांच्या व्यसनाने वेढलेले आहे. तरुण आणि मध्यमवयीन व्यक्ती अंमली पदार्थांच्या जाळ्यात अलगद येत आहेत. इतकेच नव्हे तर आता शाळाही त्यांच्या नजरेतून सुटलेल्या नाहीत. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी शाखेला आळस झटकून कामाला लावायची वेळ आलेली आहे. ही शाखा काम चांगले करते, पण माणसांची कमतरता आहे. पश्चिम बांद्रा, चेंबूर, घाटकोपर, फिल्मसिटी, आरे कॉलनीतील फिल्टरपाडा, रे रोड, डोंगरी, साकीनाका, लोखंडवाला, बोरिवली आदी अनेक भागात त्यांचे छुपे अड्डे आहेत. या अड्डयांवर सतत धाडी घालून त्यांना बेजार करण्याची गरज आहे. या शहरातील बहुसंख्य नागरिकांना अजूनही पोलीसयंत्रणेवर विश्वास आहे. “People sleep peacefully in their beds because rough men stand ready to do violence on their behalf!” ही जनतेची भावना तशीच राहू दे. म्हणूनच या भावनेचा आदर व्हावा, देवेनजी! बस्स.. जास्त काही नाही. आता अधूनमधून भेट होतच राहील. पुन्हा एकदा अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा!

छायाचित्र व मांडणीः प्रवीण वराडकर

Continue reading

बिहारमध्ये विरोधकांचे ‘जंगलराज’ तर सत्ताधाऱ्यांचे काय ‘मंगलराज’?

"Criticism may not agreeable but its necessary. It fulfils the same function as pain in the human body. It calls attention to an unhealthy state of things" असंच काहीस राजकारणात सत्तारूढ पक्ष व विरोधी पक्ष यांचे नाते असावे, असं...

ठाणे.. ती गाडी आणि त्यावरचे स्टिकर.. गौडबंगाल तर नाही ना!

नेहमीप्रमाणे ठाणे शहरातील कोर्टनाका परिसरात फेरफटका मारून ढोकाळी नाक्यानजिक असलेल्या घरी जायला बस घेतली. तुम्ही विचाराल की तुम्ही दररोज किंवा आलटूनपालटून कोर्टनाक्याला का जाता? उत्तर सोपं आहे. राजकीय नेत्यांच्या पंटर्सची या परिसरात उठबस असते. जिल्हाधिकारी कार्यालय आहे. समोरच जिल्हा...

आता कळेलच धडधाकट कोण आणि कुबड्यांची गरज कुणाला?

आजच्या दैनिक लोकसत्तेच्या अग्रलेखाचा मथळा इतका बोलका आहे की, त्यावर काही लिहिणे अन्यायकारक ठरेल! आपल्या देशात हे नेहमीच घडत आलेले आहे व पुढेही घडणार आहे. राष्ट्रीय पक्ष मग तो भारतीय जनता पक्ष (भाजप) असो वा काँग्रेस, त्यांनी नेहमीच असे...
Skip to content