Homeकल्चर +रसिकांना आज दिसणार...

रसिकांना आज दिसणार संत तुकाराम!

बहुचर्चित आणि प्रत्येकाच्या हृदयात वसलेले महाराष्ट्राचे लाडके संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘तुकाराम’ या भव्य चित्रपटाचा प्रीमियर शो, आज रविवारी फक्त मराठी वाहिनीवर होणार आहे.

या चित्रपटातून तुकारामांचा ‘माणूस ते संत’ असा प्रवास पाहयला मिळणार आहे. तुकारामांच्या जीवनातील अनेक पदर चित्रपटातून उलगडून दाखविण्याचा प्रयत्न केला गेला आहे. रविवारी सकाळी ११:०० वा. आणि संध्याकाळी ६:३० वाजता, फक्त मराठी प्रिमीयरमध्ये हा शो बङता येईल.

चंद्रकांत कुलकर्णी यांनी पुन्हा एकदा जगाला संत तुकाराम नव्याने समजावेत या भावनेने ‘तुकाराम’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आणि हीच भावना फक्त मराठीची असल्याने आम्ही या चित्रपटाचा प्रीमियर रविवारी करण्याचे ठरविले, असे फक्त मराठी वाहिनीचे बिझनेस हेड श्याम मळेकर यांनी सांगितले.

व्ही. शांताराम यांनी ८५ वर्षांपूर्वी ‘संत तुकाराम’ हा चित्रपट पडद्यावर आणला होता. १९३६मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानंतर मात्र तुकारामांच्या आयुष्यावर काहीही निर्मिती झाली नाही. मी जेव्हा या माणूसपण जागवणाऱ्या महान संताच्या आयुष्यावर चित्रपट काढायचे ठरवले तेव्हा मनात एक धागा पक्का होता की, केवळ जुना काळ उभा करण्यापेक्षा, पिरियड सिनेमा म्हणून तो काळ सजवण्यापेक्षा त्या काळातील कालसापेक्ष असे घटक, चिरंतन राहिलेले संस्कार आणि आधुनिक युगातल्या म्हणवणाऱ्यांनी तुकारामांचा लावलेला अन्वयार्थदेखील चित्रपटात दाखवायचा. आधुनिक पिढीसमोर संत तुकाराम उभे करताना ते केवळ अभंगांपुरते मला नको होते, असे तुकाराम, या चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी सांगतात.

महाराष्ट्रासह जगभरात संत तुकाराम महाराजांच्या विचारांनी प्रभावित मोठा समुदाय आहे. मराठी समजणाऱ्यांना ‘तुकाराम’ माहित नाही अशी व्यक्ती सापडणं दुर्मिळ आहे. त्यामुळे हा चित्रपट मराठीसह अमराठी प्रेक्षकांनाही समजेल असा, तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचा बनविण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, असे निर्माते संजय छाब्रिया यांचे म्हणणे आहे.

अभिनेते जितेंद्र जोशी यांनी तुकारामांची अप्रतिम भूमिका साकारली आहे. तुकारामांच्या पत्नीची भूमिका राधिका आपटे यांनी केली असून बालकलाकार पद्मनाभ गायकवाड, वीणा जामकर, शरद पोंक्षे, प्रतीक्षा लोणकर, यतीन कार्येकर यांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत. अजित दळवी, प्रशांत दळवी लिखित ‘तुकाराम’ चित्रपटाचे संगीतकार आहेत अशोक पत्की व अवधूत गुप्ते.

चित्रपटातली काही गाणी कवी दासू वैद्य यांनी लिहिली आहेत. कलादिग्दर्शक एकनाथ कदम यांनी या चित्रपटातील १६०९ ते १६५०चा कालावधी उभा केला आहे. ‘तुकाराम’ चित्रपटासारख्या दर्जेदार कलाकृती अभावानेच निर्माण होतात. त्यामुळे हा अनुभव आपल्या प्रेक्षकांनी आवर्जून घ्यावा.

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content