देशात इंग्रज राजवटीत चित्रपटसृष्टीचा पाया घालणारे महान विभूती धुंडिराज गोविंद उर्फ आजचे दादासाहेब फाळके यांच्या पहिल्या चित्रपट निर्मितीचे प्रदर्शनाचे १९१३ हे वर्ष! क्षितिजापलिकडची सृजनक्षमता, एकच ध्यास मनाला लावून सत्यात उतरवणारा कुशाग्र बुद्धीचा हरहुन्नरी मराठी माणूस, अशक्यप्राय वाटणारी गोष्ट अस्तित्त्वात उतरवतो, आपली त्यावर मोहर उमटवतो, आज त्याचा उदो उदो होत असला तरी चित्रपट सृष्टीचे शताब्दी वर्ष साजरे केले जात असले, तरी या अवलियाचे जीवन मात्र हलाखीचे होते. अगदी ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ चित्रपट काढून लोकांसमोर परेश मोकाशींनी निर्मितीचा जीवनपट हा मांडला असला तरी त्यांची अनन्यसाधारणतः उरतेच! शेवटी सगळं पैशानंच मोजलं जातं हे त्यांचं अनुभवाधारित वाक्य!
पौराणिक कथानकावर आधारीत असलेला ‘राजा हरिश्चंद्र’ हा आपला पहिला चित्रपट सहा महिन्यांच्या परिश्रमांनी तयार करून दादासाहेबांनी तो १७ मे १९१३ रोजी मुंबई प्रदर्शित केला. हाच तो भारतीय चित्रपट सृष्टीचा जन्मदिन! नंतरच्या २४ वर्षांच्या कालखंडात ९५ मूकपट आणि ‘गंगावतरण’ हा एकमेव बोलपट. साधनसामग्री तुटपुंजी, अपुरे आर्थिक पाठबळ. पण अफाट जिद्द कुटुंबियांची भक्कम साथ या जोरावर या क्षेत्रासाठी तयार केलेल्या पाऊलवाटेचे रूपांतर हजारो कोटी रुपयांच्या उलाढाली असलेल्या उद्योगात झाले आहे. आजपासून सुमारे एकशे पन्नास वर्षांपूर्वी म्हणजे ३० एप्रिल १८७० रोजी नाशिक जवळच्या त्रंबकेश्वर येथील वेदशास्त्रसंपन्न संस्कृतचे गाढे अभ्यासक दाजीशास्त्री फाळके यांच्या घरात हे अपत्य जन्माला आले. पदवीधरसुद्धा नसलेल्या दाजी शास्त्रींना मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात नोकरी मिळाली. त्यामुळे संपूर्ण कुटुंबच मुंबईत राहायला आले. धुंडिराज हे आपल्याप्रमाणेच वेदशास्त्रसंपन्न व्हावे अशी इच्छा असलेल्या दाजींना त्यांची चित्रकलेची आवड लक्षात आली. त्यांनी मॅट्रिकनंतर १८८५ साली जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये त्यांना धाडले. त्यांच्यातील कलाकार, धडपडी वृत्ती आणि कुशाग्र बुद्धीच्या जोरावर उसळी मारून बाहेर आली. नंतर काही वर्ष बडोद्यातील कला दालनात काम करताना त्यांना ऑइल पेंटिंग, जादू, हस्तकला, निसर्गचित्रे या बाबी शिकायला मिळाल्या.
आपल्या चरितार्थासाठी शासनाच्या पुरातत्त्व विभागात दाखल झालेल्या फाळकेंनी फोटोग्राफर ड्राफ्ट्समन पदावर राहून कला, शिल्पकला हे विषय अभ्यासले. पुढे स्वातंत्र्यलढ्याचे आणि स्वदेशीचे वारे अंगात भरल्यावर सरकारी नोकरीवर लाथ मारली. लोणावळ्यात प्रिंटिंग प्रेस काढला आणि पुढे तो आजच्या दादर टी टीवरील फाळके रोडवर आणला. भागीदारीत सुरुवात करत झालेल्या या प्रेससाठी रंगीत छपाईचे तंत्रज्ञान अवगत करावे यासाठी ते जर्मनीला गेले, मशिनरी आणली. त्या काळाच्या मातब्बर प्रेसशी स्पर्धा केली. नंतर काही काळातच भागीदाराबरोबर झालेल्या मतभेदाने त्यांनी एकही दमडी न घेता भागीदारी सोडली. ते होते १९११ साल!
.. आणि येशूचा आशीर्वाद!
दादासाहेब फाळके आणि येशूचा आशीर्वाद हे काहीसे विचित्र वाटले तरी सत्य आहे. त्याचं झालं असं.. चौपाटीवरील इजरायल इमारतीत राहणाऱ्या दादासाहेबांनी आपला लेक भालचंद्र याच्याबरोबर सिनेमा बघितला. त्याचे वर्णन घरी येऊन त्याने करताच त्यांच्या पत्नी सरस्वती यांची उत्सुकता ताणली गेली. दुसऱ्या दिवशी दादासाहेब थेट पत्नीसह आज गिरगावात उभे असलेल्या हरकिसनदास हॉस्पिटलच्या ठिकाणी आले. त्याकाळी तिथे सुशोभित असा ‘अमेरिका इंडिया सिनेमा’ तंबू होता. ख्रिश्चन युरोपियन यांची गर्दी असलेल्या सिनेमाचे प्रथम वर्गाचे तिकिट होते आठ आणे. चित्रपटाचे नाव ते ‘द लाईफ ऑफ ख्रिस्त’! प्रभू येशूच्या खडतर जीवनाचे आणि हृदयद्रावक मृत्यूचे चित्रण पाहून लोक अक्षरशः रडत होते तर सरस्वतीबाईसारख्यांची उत्सुकता क्षणाक्षणाला ताणली जात होती. खेळ संपल्यावर त्यांनी चित्र हलतात कशी, हा प्रश्न केल्यानंतर दादासाहेबांनी थेट प्रोजेक्शन रूममध्ये येऊन सर्व समजावले. रस्त्याने जाता जाता अचानक त्यांनी पुढे तुला या गोष्टी लवकरच समजतील असे सांगितले. ख्रिस्ताप्रमाणेच आपल्या राम, कृष्ण यांच्या गोष्टींवर सिनेमा बनवावा असे मला वाटत असल्याचे सांगितले. प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय बंद झाल्याने त्यांच्या मनात सिनेमा बनवण्याचे विचार त्याक्षणीच घोळू लागले. बाईंना त्यांच्या चिट्टी स्वभावाची कल्पना असल्याने त्यांनी न बोलणे पसंत केले. ईस्टर संडेच्या दिवशी त्यांनी म्हणजे एप्रिलमध्ये हा निश्चय केला. त्यांच्या जन्माचा महिनादेखील एप्रिल, तेव्हाच चित्रपटाची पाळेमुळे डोक्यात रुजणे हा विलक्षण योगच नाही का? देशात कोणाला सुचले नाही ते आपल्या महाराष्ट्राच्या माणसाला सुचले अशी मराठी माणसाची भावना हवी. त्याचा अभिमान वाटायला हवा, त्यांच्या कामाची ओळख आपणच नेहमी सर्वत्र द्यायला हवी.
झालं, दादासाहेब कामाला लागले. ध्यास-ध्येयवेड कसे असते याचे मूर्तिमंत उदाहरण. इतर ठिकाणी आलेले असलेले चित्रपट पाहताना येशूच्या जीवनावरील चित्रपट तिकीट काढून त्यांनी वारंवार पाहिला. त्याचे विश्लेषण घरात, मनात चालू होते. नोकरी नाही. घरात आर्थिक तंगी, सहा मुले, तीन मुली अशी त्या काळाला अनुसरून नऊ अपत्ये. अशा परिस्थितीत हे केवढे धाडस! जवळपास वर्षभर या विषयातील माहिती जमविण्याचा त्यांनी सपाटा लावला. चित्रपटविषयक सामग्री, त्याबाबतची दरपत्रके, पुस्तके जमा करणे, विविध फिल्म्सचे टाकलेले तुकडे जमा करणे, प्रयोग करण्यासाठी खेळण्यातला सिनेमा आणून त्याचे सादरीकरण घरातील प्रेक्षकांसमोर मेणबत्तीचा प्रकाश लेन्सवर पाडून पहिला चित्रपट शो त्यांनी भिंतीवर सिद्ध केला. अथक परिश्रम, अवघी तीन तासांची झोप याचा परिणाम त्यांच्या दृष्टीवर झाला. जवळपास आंधळेपण आले. मात्र, वेळीच उपचार मिळाल्याने वर्षभरात त्यांच्या दृष्टीत सुधारणा झाली. पुढे याच दृष्टीने आजची भारतीय सिनेमा सृष्टी उभी केली!
अक्षरशः बीज रोवले!
कुठल्याही गोष्टीचा आरंभ, सुरुवात करणे, याला आपल्या भाषेत बीजारोपण करणे, बीज रोवले असे शब्दप्रयोग आहेत. दादासाहेब फाळके यांनी अक्षरशः तसे केले. चित्रपट तयार करण्यासाठी आजच्या काळासारखा ‘फायनान्सर’ शोधण्यासाठी त्यांनी युक्ती केली. एका कुंडीत झाड लावले, त्याची होणारी वाढ चित्रित केली. त्याचा लघुपट बनवून त्यांनी संबंधितांना विश्वास देत पैसा उभा केला. तत्पूर्वी, यासाठी आपल्या मित्र व फिल्म डीलरकडून पैसे उसने घेतले. या प्रयोगाने आपली कल्पना प्रत्यक्षात आणून दाखवली. यातून आणि विमा पत्रावर कर्ज काढले. त्याचा उपयोग इंग्लंडमध्ये चित्रपट तयारीसाठी जाऊन प्रत्येक विभागाचा अभ्यास केला. एप्रिल १९१२मध्ये मुंबईत परतलेल्या फाळकेंनी कुटुंबाच्या मदतीने जवळपास शंभर फूट लांबीची फिल्म्स तयार केली. अनेक वित्तपुरवठादारांना त्यांनी आपली मागणी सादर केली. त्यापूर्वी त्यांच्या पत्नीने आपले सर्व दागिने विकू दिले, पैसे जमवले. पण कलाकारांचे काय? सिनेमात काम करण्यास फारसे कोणी उत्सुक नव्हते. त्यामुळे त्यांना बरेच कष्ट घ्यावे लागले. दादरमधील ज्या मथुरा भुवन येथे ते राहात तिथेच त्यांनी स्टुडिओ उभारला. सहा महिन्यांत त्यांनी ३७०० फुटांचा ‘राजा हरिश्चंद्र’ हा भारताचा पहिला कथा चित्रपट सबकुछ दादासाहेब फाळके असा तयार केला. त्यानंतरच्या १९१३-१९३७ या काळात त्यांनी चलतपटांची जवळपास शंभरी गाठली. आपल्या ७४ वर्षांच्या अनुभवाने शेवटी पैशाने सगळं मोजलं जातं, हे त्यांनी अनेकदा म्हटलेलं वाक्य!
.. एकमेव सन्मान!
भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या या जनकास जिवंतपणे एकमेव सन्मान लाभला तो म्हणजे १९३९मध्ये देशी-चित्रपट सृष्टीच्या रोप्य महोत्सवाबद्दल पाच हजार रुपये. अशी थैली देऊन झालेला सत्कार! नंतरच्या काळात ही सृष्टी स्वप्नांचा कारखाना झाली. त्यावरून ‘सपनों का सौदागर’ हे नाव घेत एक चित्रपटही तयार झाला. प्रेक्षकांना स्वप्न दाखवण्यापूर्वी त्यात काम करणाऱ्यांनाही ती दाखवली जातात. आशा-निराशेचा एक जीवघेणा इथे चालू असतो. यशाची चटक, पैसा-वैभवाची धुंदी चढते, सारासार विचार-विवेक यांची फारकत, वास्तवाशी काही देणेघेणे नसलेले अनेक जण इथे सापडतात. दादासाहेब फाळके या द्रष्ट्या माणसाची यंदा दिडशेवी जन्मशताब्दी सुरू होतेय! याचे औचित्य साधत नुकत्याच, जानेवारीच्या १७-१८ दरम्यान गोव्यात, पणजीत पार पडलेल्या इफ्फीच्या सोहळ्यात त्यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर यांना आमंत्रित करण्यात आले होतं. यावेळी ५१व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात फाळकेंना अभिवादन करण्यात आलं. त्यासाठी त्यांचे नातू पुसाळकर यांची मुलाखत घेण्यात आली. त्यांच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी भारत सरकार नि इफ्फी करत असलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. दादासाहेबांची कन्या मालती यांचे चंद्रशेखर पुत्र होत.
भारत सरकारने १९६९मध्ये त्यांच्या नावाने पुरस्कार सुरू केला. यासाठी सरकारने पुढाकार घेतला नसता तर त्यांचे कार्य किंवा जीवन दोन पानांची कहाणी बनले असते. त्यांनी भारतीय चित्रपट क्षेत्रात दिलेल्या असामान्य योगदानाबद्दल लोक त्यांचा आदर करतात नि त्यांना ओळखतात. आजोबांनी केलेल्या धडपडीचा पट त्यांनी उलगडला. माझे आजोबा महान द्रष्टेच नव्हते तर देशभक्त होते. त्यांनी ‘आत्मनिर्भरता’ याचा वापर त्या काळात केला. स्थानिक कलाकार, चित्रिकरण स्थळे, देशात उपलब्ध तांत्रिक पाठबळ याचा उपयोग केला. त्यांची चिकाटी, दूरदृष्टी याचा आज गौरव होत आहे. त्यामुळे भारतीय चित्रपट उद्योगाने आजची उंची गाठली आहे. त्यांच्याविषयी अधिक माहिती लोकांना व्हावी म्हणून ‘दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय जागरूकता मिशन’ सुरू केले असून या विषयाशी संबंधित htpp://www.dpiam.org.in ही वेबसाईट तयार केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यांची १५०वी जयंती ही त्यांच्या कार्याचा उचित गौरव होण्याची वेळ असून त्यांना भारतरत्न मिळणे हीच खरी आदरांजली ठरेल असे ते याप्रसंगी म्हणाले. त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मितीच्या या उद्योगाने गांभीर्याने विचार करावा असंही ते म्हणाले.
नाही म्हणायला मुंबई गोरेगावच्या फिल्मसिटीला दादासाहेब फाळके चित्रनगरी नाव देण्याचे औदार्य मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने दाखवले. इतकाच काय तो गौरव महाराष्ट्र राज्याकडून झाला. भारतात चित्रपट निर्मिती जी होते त्यात मुंबईच्या चित्रपट उद्योगाचा वाटा ३०% इतका आहे. पश्चिम द्रूतगती महामार्गालागत गोरेगाव इथे फिल्म सिटीची उभारणी झाली. व्ही.शांताराम, दिलीपकुमार, बी आर चोपडा आदी दिग्गजांच्या पुढाकाराने कंपनी अधिनियमांतर्गत महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ याची स्थापना २६ सप्टेंबर १९७७ रोजी झाली. पुढे २००१ साली ‘दादासाहेब फाळके नगरी’ असे त्याचे नामकरण झाले. हा चित्रपट महर्षी निवृत्तीनंतर नाशकात स्थायिक झाला. पण त्यांचे कर्तृत्व विसरले गेले. शेवटचे दिवस हलाखीत जगणाऱ्या या गुरुवर्याच्या मदतीला अन्य दिग्गज व्ही. शांताराम म्हणजे शांताराम वणकुद्रे धावले. भारतीय चित्रपटसृष्टीच्या संस्थापकाची अंत्ययात्रा १६ फेब्रुवारी १९४४ रोजी गोदा तीरावर पोहोचली, तेव्हा फक्त घरचेच-जवळचे लोक होते. शेवटी जाने कहा गये वो दिन..! आता पुढे यांचा गौरव राज्य सरकार कसा वाढवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. राज्यातील नाट्य, चित्रपट कलावंतांना शासनाने त्यांच्या नावाने पुरस्कार दयावा, ज्याचा निकष महाराष्ट्र राज्याच्या कलावंतापुरताच असेल..