नुकत्याच येऊन गेलेल्या ‘वऱ्हाडी वाजंत्री’, या चित्रपटाचे निर्माते कॅप्टन कल्पेश मगर यांचे वडील रविंद्र हरिभाऊ मगर यांचे नुकतेच अल्पशा आजाराने मुंबईत निधन झाले.
गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्यावर मुंबईतल्या कांदिवली येथील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा जाणवल्याने त्यांना घरी नेण्यात आले. मात्र काही दिवसांत पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर २ डिसेंबरला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. तेथेच त्यांना तीव्र ‘ब्रेन स्ट्रोक’चा झटका आल्याने निधन झाले.
उच्च-तंत्रविद्याविभूषित असलेल्या रविंद्र हरिभाऊ मगर यांनी नुकतेच वयाच्या ७०व्या वर्षात पदार्पण केले होते. इंजिनीअरिंग क्षेत्रात व्यावसायिक म्हणून त्यांनी भरीव कार्य केले असून अनेक सामाजिक संस्थांना आर्थिक पाठबळ दिले आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन पुत्र, मुलगी, जावई, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे पुत्र कॅप्टन कल्पेश मास्टर मरिनर असून त्यांनी नुकताच विजय पाटकर दिग्दर्शित ‘वऱ्हाडी वाजंत्री’ चित्रपट निर्माण केला आहे. त्यांचे ज्येष्ठ पुत्र भूषण व्यवसायाने वकील असून बांधकाम आणि वाहतूक व्यवसायात सक्रिय आहेत.

