Tuesday, February 4, 2025
Homeटॉप स्टोरीमहावितरणच्या अभय योजनेला...

महावितरणच्या अभय योजनेला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या महावितरण अभय योजना २०२४ला येत्या ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत वीजबिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होत असल्यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले आहे.

राज्यातील महावितरणच्या ३१ मार्च २०२४पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या (पीडी) ग्राहकांसाठी १ सप्टेंबरपासून अभय योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा कालावधी ३० नोव्हेंबरला संपल्यानंतर तिला ३१ डिसेंबरपर्यंत एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु राज्यातील ग्राहकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन ही योजना ३१ मार्च २०२५पर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे या योजनेत अजूनही सहभागी होऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. मात्र ३१ मार्च २०२५नंतर या योजनेला मुदतवाढ न देण्याचा निर्णय महावितरणने घेतला असून थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही महावितरणने दिला आहे.

अभय

राज्यातील ९३८४८ वीज ग्राहकांनी आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतला असून त्यांच्याकडून १३० कोटी रुपयांचा भरणा झाला असून त्यांना ५७ कोटी ३६ लाख रुपयांचे व्याज व २ कोटी १२ लाख रुपयांचा विलंब आकार माफ झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कोणत्याही जागेचा मालक किंवा खरेदीदार किंवा ताबेदार यांनी वीजबिलाची थकबाकी रक्कम भरणे बंधनकारक आहे. रक्कम न भरल्यास  कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे वीज ग्राहकांनी सवलतीचा लाभ घेऊन चिंतामुक्त व्हावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

अभय योजनेत मूळ बिलाच्या ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम सहा हप्त्यात भरण्याची सवलत ग्राहकांना देण्यात आली आहे. जे घरगुती, व्यावसायिक व इतर लघुदाब ग्राहक एकरकमी थकीत बिल भरतील त्यांना दहा टक्के तर उच्चदाब औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना पाच टक्के सवलत आहे. भिवंडी, मालेगाव, मुंब्रा, शीळ व कळवा या महावितरणच्या फ्रँचायझी क्षेत्रातील वीज ग्राहकांनाही ही योजना लागू आहे. संबंधित वीज ग्राहकांना www.mahadiscom.in/wss/wss या वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अभय योजनेचा लाभ घेता येईल. महावितरणच्या मोबाईल ॲपवरून योजनेचा लाभ घेता येईल. वीजग्राहक १९१२ किंवा १८००२३३३४३५ किंवा १८००२१२३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून या योजनेची माहिती घेऊ शकतात. योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नियमित वीज कनेक्शन घेता येईल. त्याच पत्त्यावर योग्य पुरावे सादर करून नव्या नावाने वीज कनेक्शन घेण्याचीही सुविधा असेल.                                     

Continue reading

जॅकी श्रॉफ, श्वेता बच्चन आदींनी लुटला पुष्पोत्सवाचा आनंद!

मुंबई महापालिकेचा उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात (पूर्वीच्या राणीच्या बागेत) ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या पुष्पोत्सवाला साधारण दीड लाख मुंबईकरांनी भेट दिली. यामध्ये अभिनेता जॅकी...

श्री मावळी मंडळाच्या खो-खो स्पर्धेत ज्ञानविकास,विहंग विजयी

ठाण्यातील श्री मावळी मंडळ संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित प्रथम विभागीय खो-खो स्पर्धेच्या महिला गटात ज्ञानविकास फाउंडेशन संघ (ठाणे) व पुरुष गटात विहंग क्रीडा केंद्र (ठाणे) या संघांनी विजेतेपद पटकावले. महिला गटातील अंतिम सामन्यात ठाण्याच्या ज्ञानविकास फाउंडेशन संघाने ठाण्याच्या रा....

महाराष्ट्रात सुरू होणार देशातले पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठ

महाराष्ट्रात देशातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे, असे राज्याचे तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले. नवे विद्यापीठ AI आणि संबंधित क्षेत्रातील संशोधन आणि विकासाला...
Skip to content