ख्यातनाम वृत्तनिवेदक प्रदीप भिडे स्वर्गवासी झाले आणि मनात त्यांच्यासंबंधीच्या अनेक आठवणींनी रुंजी घातली. मोठ्या पदावर काम करूनही अत्यंत साधे, निगर्वी प्रदीपजी आदर्श वर्तनाचा वस्तुपाठ होते. दूरदर्शनवर वृत्तसंपादनाच्या निमित्तानं (जी संधी त्यांच्याचमुळे मिळाली) एक वेगळंच विश्व अनुभवता आलं. त्याचं श्रेय भिडे यांना जातं.
सन १९९०चा बहुधा सप्टेंबर महिना. मी तेव्हा ‘मुंबई सकाळ’मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत होतो. वेतन तुलनेनं खूपच कमी. मग उत्पन्नवाढीसाठी इतर मार्ग शोधले जात असत. अशीच एकदा चर्चा सुरू असताना, दूरदर्शनवर बातम्या संपादित आणि भाषांतर करायला महिन्यातून एकदा किंवा दोनवेळा कंत्राटी काम देतात, असं समजलं. तेव्हा आमचे वृत्तसंपादक होते, प्रभाकर नेवगी. अतिशय सज्जन. सहकाऱ्यांचे कायम हितरक्षण करणारे. ते म्हणाले, ‘तुझं काम करतो. फक्त त्यापायी इथल्या Duty Disturb नको करू’.
त्यावेळी नेवगी यांच्याकडे ‘मुंबई सकाळ’मधलं ‘कामगार विश्व’ हे सदर होतं आणि प्रदीप भिडे या सदरानिमित्त नेवगी यांना भेटायला नेहमी येत असत. तेव्हा भिडे बहुधा ‘हिंदुस्थान लिव्हर’ कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होते. अत्यंत हसतमुख व्यक्तिमत्त्व, उंच गोरेपान, असे रूबाबदार प्रदीप भिडे नेहमी सगळ्यांबरोबर माझ्याशीही थोड्या गप्पा मारून जात असत. एक दोनवेळा समोरच्या उडप्याकडे आम्ही संध्याकाळचा नाश्ता केल्याचंही आठवतं. तर त्या काळात असेच भिडे एकदा आले असता, ‘दूरदर्शन’च्या वृत्त विभागात शक्य झाल्यास अधूनमधून अभयला काम देता आल्यास पाहा’, अशी विनंती नेवगी यांनी भिडे यांना केली. क्षणाचाही विलंब न करता, त्यांनी ती मान्य करून मला विशिष्ट दिवशी दूरदर्शनवर यायला सांगितलं. त्यांचं कार्डही त्यांनी दिलं. मी हरखूनच गेलो. कारण भरीव उत्पन्नाबरोबरच एका वेगळ्या अनुभवाचं दालन माझ्यासाठी खुलं व्हायचा मार्ग मोकळा झाला. दूरदर्शनवर काम करता यावं, यासाठी नेवगी यांनी तेव्हा तशा Duty मला आपल्या अधिकारात बदलून दिल्या.
ठरल्याप्रमाणं दूरदर्शनवर गेलो. प्रदीप भिडे यांना भेटल्यावर त्यावेळचे वृत्तसंपादक मोहन चांडक यांच्यासह अनेक ज्येष्ठ मंडळींशी माझी ओळख करून दिली आणि वृत्त विभागाच्या Panel वर घेण्यासंबंधी त्यांना विनंती केली. मी लगेचच बातमीपत्राच्या कामासाठी तयार झालो. ‘काही अडचण आली तर मला भेट’, या शब्दांत भिडे यांनी मला आश्वस्त केलं. पण तशा अडचणी काहीच आल्या नाहीत. वृत्तपत्रीय आणि माध्यमातील पत्रकारितेच्या कार्यपद्धतीतच बदल असला तरी तिथं रुळायला जराही वेळ लागला नाही.
त्या काळात दूरदर्शन ही एकमेव वाहिनी. त्यामुळे तिथल्या बातम्यांना एक वेगळंच महत्त्व होतं. दोन्ही बातमीपत्रांच्या इतर बातम्यांच्या निवडीची जबाबदारी आमच्यावरच विश्वासानं सोपवली जात असे. या निमित्तानं प्रदीप भिडे यांच्यसह अनंत भावे, कल्पना राव, वासंती वर्तक, अंजली पाठारे, चारुशीला पटवर्धन, अरविंद विंझे, शोभा तुंगारे आदी वृत्तनिवेदकांशी चांगला परिचय झाला. मी त्यांना मधल्या वेळेत ‘मुंबई सकाळ’मधले अनेक अनुभव सांगत असे. या सगळ्यांमध्ये प्रदीप भिडे हेही उत्साहानं सहभागी होत असत. आता गप्पांचे तसे तपशील आठवत नाहीत, पण अनुभवसंपन्न भिडे अनेक किस्से सांगत असत.
नंतर जवळपास ७/८ महिने दूरदर्शनवर काम केलं. तिथली कार्यपद्धती जवळून बघता आली. एका बुलेटिनवेळी बहुधा अनंत भावे यांच्या अगदी शेजारी बसून मुख्य बातमीपत्र स्टुडिओत बसून बघता आलं. तेव्हा स्टुडिओत किती शिस्त पाळावी लागते, याचाही अनुभव घेतला. हे सगळं साधलं, प्रदीप भिडे यांच्याचमुळे!
नंतरच्या वर्षी ‘लोकसत्ता’मध्ये गेल्यावर दूरदर्शनवर जाणं थांबवावं लागलं. तिथंही प्रदीप भिडे अधूनमधून येत असत. बोलणं होत असे. पण नंतर संपर्क कमी झाला. मीही पत्रकारितेपासून दुरावलोच आणि काल आली प्रदीप भिडे यांच्या स्वर्गवासाची बातमी… मला दूरदर्शनच्या वेगळ्या जगात घेऊन जाणाऱ्या प्रदीप भिडे यांना मनःपूर्वक आदरांजली!