मुंबईच्या भायखळा पूर्व परिसरातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाच्या परिसरात आयोजित करण्यात आलेले उद्यान प्रदर्शन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचे सामर्थ्य अधोरेखित करणारे प्रदर्शन असून यामुळे पर्यावरणविषयक जागरूकता वाढविण्यासदेखील निश्चितपणे बळ मिळेल, असा विश्वास मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांनी व्यक्त केला.

त्या काल मुंबई महापालिका व वृक्ष प्राधिकरण यांच्याद्वारे आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक उद्यान प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होत्या. उपायुक्त (शिक्षण) केशव उबाळे, उपायुक्त (उद्याने) किशोर गांधी, ‘इ’ विभागाचे सहाय्यक आयुक्त अजयकुमार यादव, संचालक (प्राणिसंग्रहालय) संजय त्रिपाठी, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्यासह पालिकेचे संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर व पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यंदा ३ ते ५ फेब्रुवारी २०२३ दरम्यान भायखळा पूर्व परिसरातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात आयोजित हे भव्य प्रदर्शन येत्या रविवारपर्यंत म्हणजेच दि. ५ फेब्रुवारी २०२३पर्यंत सकाळी ८ ते रात्री ८ या कालावधीत सर्वांसाठी मोफत खुले असणार आहे. या वार्षिक प्रदर्शनासोबतच उद्यान या विषयाशी संबंधित विविध ११ बाबींवरील कार्यशाळांचे आयोजनही प्रदर्शन कालावधीदरम्यान करण्यात आले आहे. प्रदर्शनासोबतच उद्यानविषयक वस्तुंच्या विक्रींची ४२ दालनेदेखील या ठिकाणी उभारण्यात आली आहेत, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.

दरवर्षीच्या वार्षिक उद्यान प्रदर्शनामध्ये पानाफुलांचा वापर करुन वैविध्यपूर्ण रचना सादर करण्यात येतात. या रचनांनादेखील मुंबईकर नागरिकांचा आणि विशेष करुन लहान मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असतो. यंदाच्या प्रदर्शनात पेपा पिग फॅमिली, माशा अँड द बियर, ब्लुई, ट्विटी आणि सिल्व्हेस्टर यांच्यासह नानाविध ‘कार्टून्स’च्या रचना पानाफुलांपासून साकारण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर पानाफुलांपासून साकारलेले ‘जी २०’चे बोधचिन्ह आणि ‘जी २०’ सदस्य देशांमधील झाडे-फुले आणि भाज्या यांचादेखील समावेश यंदाच्या उद्यान प्रदर्शनात आहे.

यासोबतच कुंड्यांमध्ये वाढविलेली फळझाडे व फुलझाडे, फळभाज्यांची झाडे, मोसमी फुलझाडे, औषधी वनस्पती, बोनसाय यांचे अक्षरशः शेकडो प्रकार मुंबईकरांना या प्रदर्शनात पाहायला मिळत आहेत. तसेच मुंबई परिसरात अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या कृष्णवडासारख्या अनेक दुर्मिळ देशी प्रजातींची झाडेदेखील यंदाच्या प्रदर्शनात बघता येतील.
कोविड प्रादुर्भावामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर होत असलेले यंदाचे उद्यान प्रदर्शन हे अधिक संस्मरणीय व्हावे, यासाठी पालिकेच्या उद्यान खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अक्षरशः दिवसरात्र मेहनत घेतली असून ही मेहनत प्रदर्शन बघताना प्रत्येक ठिकाणी जाणवत आहे, अशी प्रतिक्रिया प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

